नवी दिल्ली, 03 मार्च: गेल्या काही वर्षांत डिजिटल पेमेंट (Digital Payment) या संकल्पनेचा वेगानं विस्तार होताना दिसत आहे. सध्या ग्राहकांना डिजिटल पेमेंटची सुविधा देणारे अनेक अॅप्स (Online Payment Apps) उपलब्ध आहेत. पेटीएम, फोनपे, गुगल पे, भारत पे हे त्यापैकी काही महत्त्वाचे अॅप्स म्हणता येतील. यातील भारत पे हे अॅप सध्या विशेष चर्चेत आहे. ‘भारत पे’चे (Bharat Pe) सहसंस्थापक अश्नीर ग्रोव्हर (Ashner Grover) हे या चर्चेचं प्रमुख कारण ठरले आहेत. काही कारणांमुळे त्यांना या कंपनीचा राजीनामा (Ashner Grover Resigns from Bharat Pe) द्यावा लागला आहे. सध्या टेलिव्हिजनवर गाजत असलेल्या शार्क टॅंक या रिअॅलिटी शोमधलं कठोर वर्तन आणि हजरजबाबीपणा यामुळेदेखील अश्नीर चर्चेत आहेत. त्यातच वाद-विवाद आणि राजीनामानाट्यामुळे फिनटेक कंपनी (Fintech Company) भारत पे आणि अश्नीर ग्रोव्हर यांनी सर्वसामान्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भारत पेचे सहसंस्थापक अशनीर ग्रोव्हर यांचा फिनटेक उद्योगातला प्रवास विलक्षण असा म्हणावा लागेल. सध्या बाजारात अनेक फिनटेक कंपन्या असताना भारत पे ला अल्पावधीत मिळालेलं यश, भारत पेनं पेटीएम (Paytm) आणि फोन पेला (PhonePe) दिलेली टक्कर या सर्व गोष्टी खास बिझनेस स्ट्रेटेजीमुळे (Business Strategy) शक्य झाल्याचं बोललं जातं. भारत पे ही कंपनी 2018 मध्ये तीन मित्रांनी एकत्र येत सुरू केली होती. त्यानंतर या कंपनीनं मोठं यश मिळवलं. या सर्व पार्श्वभूमीवर फिनटेक कंपनी म्हणजे काय?, भारत पे आणि अश्नीर ग्रोव्हर यांची वाटचाल नेमकी कशी राहिली, याविषयी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हे वाचा- पीएम मानधन योजनेत सरकार दर महिना देतंय 1800 रुपये? वाचा काय आहे प्रकरण फायनान्शियल टेक्नॉलॉजी या शब्दाचा फिनटेक हा शॉर्ट फॉर्म आहे. पैशांच्या ऑनलाइन देवाणघेवाणीकरता प्रामुख्याने या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. या माध्यमातून एखाद्या अॅपद्वारे तुम्ही पैशांची देवाण-घेवाण, डिजिटल कर्ज, बॅंकेशी संबंधित कामं, क्रिप्टोकरन्सीशी निगडीत कामं केली जातात. भारताचा विचार करता, देशात स्मार्टफोन युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने डिजिटल पेमेंट सुविधा देणाऱ्या गुगल पे, पेटीएम आणि भारत पे सारख्या कंपन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या फिनटेक कंपन्या जाहिरातींच्या तसंच, ई-वॉलेट (E-Wallet) आणि सब्सक्रिप्शनच्या माध्यमातून उत्पन्न मिळवतात. त्याचप्रमाणे अॅपचा वापर आणि ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातूनही कंपन्यांना उत्पन्न मिळतं. भारत पे या कंपनीची रचना आणि कंपनीद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधा अशाच स्वरूपाच्या आहेत. कशी झाली भारत पे ची स्थापना? भारत पे या कंपनीच्या स्थापनेचा किस्सा अतिशय मनोरंजक आहे. ‘भारत पे’चे सहसंस्थापक म्हणून भूमिका बजावलेले अश्नीर ग्रोव्हर 2017 मध्ये पीसी ज्वेलर्स लिमिटेडमध्ये बिझनेझ हेड म्हणून काम करत होते. या दरम्यान त्यांचा शाश्वत नकरानी आणि भाविक कोलाडिया यांच्याशी परिचय झाला. यावेळी शाश्वत यांनी ऑनलाइन ट्रान्झॅक्शनसाठी अॅप निर्मिती करण्याची संकल्पना अश्नीर यांच्याशी शेअर केली. अमेरिकन एक्सप्रेस, ग्रोफर्ससारख्या कंपन्यांमधला कामाचा अनुभव असलेल्या अश्नीर यांना ही संकल्पना आवडली. शाश्वत यांना तांत्रिक बाबींची माहिती असल्याने, भारत पेचं रजिस्ट्रेशन, मार्केटिंग आणि बिझनेसशी निगडीत जबाबदाऱ्या अश्नीर यांनी शाश्वत नकरानींवर सोपावल्या. अशा पद्धतीनं या तिघांनी भारत पे कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. जून 2018 सुरू होताच अल्पावधीतच भारत पे अॅपचा वापर एक हजारांहून अधिक लोक करू लागले. काही कालावधीत हे अॅप वापरणाऱ्यांची संख्या लाखांवर पोहोचली. सध्या गुगल प्ले स्टोअरवरून (Google Play) हे अॅप डाउनलोड करणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये या कंपनीचं मूल्यांकन 21 हजार कोटी रुपयांहून अधिक होतं. कोरोना काळात अॅप युजर्स आणि कंपनीची कमाई मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसलं. भारत पे कंपनीच्या यापूर्वीच्या फंडानुसार, कंपनीत अश्नीर ग्रोव्हर यांची हिस्सेदारी 9.5 टक्के म्हणजेच 1800 ते 1900 कोटी रुपये होती. हे वाचा- स्वस्तात सोनं खरेदीची संधी, 4 मार्चपर्यंत पाहा काय आहे ही योजना भारत पे कंपनी यशस्वी ठरण्यामागे विशेष बिझनेस स्ट्रॅटजी कारणीभूत आहे. भारत पेनं बिझनेस सुरू करण्यासाठी काही महत्वाच्या मुद्द्यांवर विशेष भर दिला. त्यात यूपीआय क्यूआर कोडच्या (QR Code) माध्यमातून ग्राहक दुकानदाराला पेमेंट करु शकतात, भारत पेच्या एका क्युआर कोडच्या माध्यमातून वेगवेगळी पेमेंट करता येतील, दुकानदार या अॅपच्या माध्यमातून निशुल्क पेमेंट स्वीकारू शकतील आणि या अॅपच्या माध्यमातून लोकांना कर्जही मिळेल अशा सुविधांचा समावेश होता. यामुळे हे अॅप अल्पावधीतच लोकप्रिय ठरलं. सध्या रोज 50 लाखांहून अधिक ट्रान्झॅक्शन्स या अॅपच्या माध्यमातून होतात. कंपनीने आता दुकानदारांनाही त्यांच्या व्यवसायाच्या आधारे कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. डिसेंबर 2021 पर्यंत भारत पेनं 3 हजार कोटींचं कर्ज दुकानदार आणि व्यापाऱ्यांना वितरित केलं आहे. काय आहे कंपनीतील वाद? एकीकडे भारत पे यशस्वी होत असताना, दुसरीकडे मात्र गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीचे सहसंस्थापक अश्नीर ग्रोव्हर हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला अश्नीर यांचा एक व्हायरल झालेला व्हिडीओ (Viral Video) यासाठी कारणीभूत ठरला आहे. या व्हिडीओत ते कोटक महिंद्रा बॅंकेच्या एका कर्मचाऱ्याला अपशब्द बोलताना दिसत आहेत. याशिवाय कंपनीच्या नियमांविरुद्ध वर्तन केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अश्नीर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर यांच्या विरोधात तक्रार आल्याने कंपनीने चौकशी करण्याचा निर्णय घेतला. या तपासात त्यांची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर यांनी पैशाची अफरातफर केल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर त्यांना कंपनीतून बडतर्फ करण्यात आलं. त्यामुळे ग्रोव्हर यांनी आपल्याच कंपनीच्या निर्णयाविरोधात सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटरकडे (Singapore International Arbitration Center) अपील केले. परंतु, तिथं त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर अशनीर यांना कंपनी सोडावी लागली. हे वाचा- देशात कोरोना संकटातही अतिश्रीमंतांच्या संख्येत वाढ, जगात भारत तिसऱ्या स्थानावर याबाबत ग्रोव्हर यांनी सांगितलं की, भारत पे मधले माझे सर्व शेअर्स विक्री करण्याचं माझं नियोजन आहे. राजीनाम्यातही याबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे. सध्या अशनीर हे कंपनीच्या सर्वात मोठ्या शेअर होल्डर्सपैकी एक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.