मुंबई, 1 डिसेंबर : आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी काहीतरी तरतूद करून ठेवावी असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. आपल्या देशात अजूनही मुलींना जन्म दिला की खर्च वाढतो असं मानून गर्भात त्यांना संपवलं जातंय. मुलींचा जन्मदर (Girl Child) वाढावा यासाठी अनेक प्रयत्न सर्वच स्तरावर केले जात आहेत. मुलींचं शिक्षण हा आर्थिक बोजा वाटू नये यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. खास मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही त्यापैकीच एक महत्त्वाची योजना आहे.
सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेअंतर्गत आणण्यात आली आहे. अगदी छोट्या बचतीतून (Small Investment) सगळ्यांत चांगलं व्याज देणारी ही योजना आहे असं म्हटलं जातं.
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कोणतंही पोस्ट ऑफिस किंवा कमर्शियल ब्रँचच्या अधिकृत शाखेत तुम्ही अकाउंट उघडू शकता. मुलीचा जन्म झाल्यानंतर ती दहा वर्षांची व्हायच्या आत कमीत कमी 250 रुपये भरून या योजनेसाठी अकाउंट उघडलं जाऊ शकतं. एका आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त दीड लाख रुपये खात्यात जमा केले जाऊ शकतात. सध्या या योजनेअंतर्गत दर वर्षाला 7.6 टक्के व्याज मिळतं. या योजनेअंतर्गत कुणीही आपल्या दोन मुलींसाठी अकाउंट उघडू शकतं. 21 वर्षं पूर्ण झाल्यानंतर मुलगी स्वत: या अकाउंटमधून पैसे काढू शकते. या योजनेमध्ये 9 वर्ष 4 महिन्यांत रक्कम दुप्पट होते.
कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करताय? डिसेंबरमध्ये बँकांना 'इतके' दिवस सुट्ट्या
सुकन्या समृद्धी योजनेत खातं उघडल्यानंतर मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षांची झाल्यानंतर तिचं लग्न होईपर्यंत हे खातं खुलं राहू शकतं. तुम्ही या योजनेअंतर्गत दर महिना तीन हजार रुपये गुंतवले तर दर वर्षीच्या एकूण 36,000 रुपयांवर तुम्हाला 14 वर्षांनंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाउंड इंटरेस्ट रेटच्या हिशोबाने 9,11,574 रुपये मिळतील. 21 वर्षं म्हणजेच मॅच्युरिटीनंतर ही रक्कम जवळपास 15,22,221 रुपये इतकी होईल. तुम्ही जर रोज 416 रुपयांची बचत केली तर तुमच्या मुलीसाठी 65 लाख रुपये जमा होऊ शकतात.
मुलगी घराची लक्ष्मी असते असं म्हणतात. तिचं शिक्षण, लग्न हे आपल्यावरचं ओझं नसतं, तर त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठीची गुंतवणूक असते असं मानणं महत्त्वाचं आहे. त्यासाठीच सुकन्या समृद्धी योजना महत्त्वाची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Post office saving, Save girl life, Savings and investments