मुंबई, 01 डिसेंबर: दर वर्षी आपल्या देशातून लाखो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी (Higher Eduacation) देशांतर्गत विद्यापीठं, आयआयटी, आयआयएम यासारख्या नामांकित संस्था, तसंच परदेशांतल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात. या ठिकाणी शिक्षणाचा खर्च खूप महाग असतो. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी शैक्षणिक कर्ज (Education Loan) घेतात आणि आपलं शिक्षण पूर्ण करतात. आजकाल देशातल्या सर्व मान्यताप्राप्त बँका, वित्तीय संस्था हे कर्ज (How to apply for education laon) देतात. त्यामुळे एकदा प्रवेश निश्चित झाला, की विद्यार्थ्यांची कर्जासाठी अर्ज करण्याची धावपळ सुरू होते. अनेक जण पहिल्यांदाच अर्ज करत असल्याने अनेक गोष्टी माहीत नसतात. त्याविषयीची सविस्तर माहिती या लेखातून घेऊया.
उच्च शिक्षणाचा महागडा खर्च भागवण्यासाठी कर्ज मिळतं हे आता सर्वांना माहीत आहे. त्यामुळे दर वर्षी उच्च शिक्षणासाठी लाखो विद्यार्थी बँका किंवा वित्तीय संस्थांकडे कर्जासाठी अर्ज करतात. गेल्या काही वर्षांपासून या कर्जांची मागणी वाढत असल्याने बँका (Banks which offers education loans) आणि वित्तीय संस्थांच्या (Financial Institutes) कर्ज व्यवसायाचा मोठा हिस्सा शैक्षणिक कर्जाचा असतो. दर वर्षी यात वाढच होत आहे. शैक्षणिक कर्ज बुडण्याची शक्यता तुलनेने कमी असल्याने बँका अगदी सहजपणे हे कर्ज देतात. याची प्रक्रियाही अगदी सहजसोपी आहे. या कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी काही कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक असतं.
अर्ज करताना आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, ज्या संस्थेत प्रवेश घेणार आहात त्यांचं पत्र, उत्पन्नाची माहिती, वयाचा पुरावा इत्यादी कागदपत्रं आवश्यक असतात. ही सगळी कागदपत्रं तयार असतील तर कर्ज प्रक्रिया जलद पूर्ण होते. अलीकडच्या काळात सर्वत्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने बँका आणि इतर वित्तीय संस्था आता त्यांच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी डिजिटल पद्धतींचा अवलंब करत आहेत. कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही ऑनलाइन उपलब्ध आहे. त्यामुळं अर्ज करण्याची प्रक्रिया आणखी सुलभ झाली आहे. ऑफलाइन म्हणजे प्रत्यक्ष बँकेत जाऊनही अर्ज करता येतो.
loan tips : जर आली पैशाची अडचण? मग Car Loan वर घेता येते टॉप-अप कर्ज
असा करा ऑफलाइन अर्ज
एज्युकेशन लोन अर्थात शैक्षणिक कर्जासाठी (How to apply for education loan offline) तुम्ही कोणत्या बँकेतून किंवा वित्तीय संस्थेतून कर्ज घ्यायचं हे निश्चित केलं, की त्या बँकेच्या किंवा वित्तीय संस्थेच्या जवळच्या शाखेत जाऊन कर्जासाठी अर्ज करू शकता. त्यापूर्वी अन्य बँका, वित्तीय संस्था यांच्या कर्जाचा व्याजदर, अटी, नियम यांची माहिती करून घेऊन, त्यांची तुलना करून तुम्हाला कुठे कर्ज घेणं फायद्याचं ठरेल हे निश्चित करावं आणि त्या ठिकाणी कर्जासाठी अर्ज करावा. कर्ज प्रक्रियेसाठी बँकेच्या शाखेत गेल्यानंतर अर्ज भरण्यापूर्वी कर्जाच्या अटींबद्दल बँक प्रतिनिधीशी चर्चाही करू शकता. सर्व बाबी स्पष्ट झाल्यानंतर अर्ज भरावा. त्यात आवश्यक असलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी. आवश्यक असलेली कागदपत्रं सोबत जोडावीत आणि अर्ज जमा करावा. यानंतर बँक पुढील प्रक्रिया करील आणि तुमचा कर्जाचा अर्ज मंजूर करील.
असा करा ऑनलाइन अर्ज
आजकाल सर्वत्र ऑनलाइन सुविधा (How to apply for education loan online) उपलब्ध झाल्याने बहुतांश विद्यार्थी ऑनलाइन सेवेचा लाभ घेतात. यामुळे घरबसल्याही कर्जाचा अर्ज करता येतो. कोविड साथीच्या काळात लॉकडाउन लागू झाल्याने घराबाहेर पडण्यावर निर्बंध असताना या सुविधेचा मोठा फायदा झाला. ऑनलाइन अर्ज करणं हा सर्वांत सोपा आणि सोयीस्कर मार्ग आहे. ऑनलाइन अर्ज करण्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे बँकेच्या वेबसाइटवर जाऊन योग्य अर्जाची निवड करून तो ऑनलाइन भरता येतो. आवश्यक कागदपत्रंही स्कॅन करून त्यासोबत अपलोड करावी लागतात आणि अर्ज सबमिट करावा लागतो.
याचा दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही सर्व तपशील भरून अर्ज करता आणि त्यानंतर कर्जाच्या अटींवर चर्चा करण्यासाठी बँकेचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधतात. सर्व अटी, नियम पटल्यानंतर तुम्ही संमती दर्शवल्यानंतर कर्जमंजुरीची पुढील प्रक्रिया केली जाते.
त्याचप्रमाणे, बँका आणि इतर वित्तीय संस्था ग्राहकांना त्यांच्या शंका दूर करण्यासाठी आणि अर्ज प्रक्रियेत मदत करण्यासाठी व्हर्च्युअल असिस्टंट (Virtual Assistant) उपलब्ध करतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभ असल्याने ती पूर्ण होण्यासाठी फक्त 15 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागतो; मात्र अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुमची कागदपत्रं आधीच गोळा करून ठेवणं उपयुक्त ठरतं.
Recurring Deposit चे फायदे आणि तोटे; RD करण्यापूर्वी तुम्हाला हे माहिती हवं
समजा, तुम्ही अर्ज भरण्यास सुरुवात केली आणि तुमच्या लक्षात आलं की एखादं कागदपत्र नाही आहे, तर तुम्ही अर्ज सेव्ह करू शकता आणि नंतर पुन्हा त्यावर काम करू शकता. ऑनलाइन प्रक्रियेमुळे ही सुविधा मिळते. अर्ज केल्यानंतर त्यावर काय कार्यवाही झाली आहे, याची माहितीही ऑनलाइन मिळू शकते.
अर्ज मंजूर झाल्यानंतर बँक किंवा वित्तीय संस्था पुढील प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करतील आणि अल्पावधीतच कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा होऊ शकते. लाखो रुपयांच्या या कर्जाचा व्याजदर अगदी कमी असल्याने, तसंच कर्ज परतफेडीसाठी प्रदीर्घ कालावधी मिळत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षणाचं स्वप्न सहजगत्या पूर्ण होऊ शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.