मुंबई, 10 नोव्हेंबर : देशी-विदेशी ब्रँड्सची सौंदर्यप्रसाधनं (Cosmetics) ऑनलाईन (Online) उपलब्ध करून देणारी नायका (Nykaa) ही देशातली एक प्रसिद्ध ई-कॉमर्स (E-Commerce) कंपनी असून, आज या कंपनीनं शेअर बाजारात (Stock Market) पदार्पण केलं आहे. कंपनीनं दाखल केलेल्या आयपीओला (IPO) ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 89 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ फाल्गुनी नायर (Falguni Nayar) यांची संपत्ती 6.5 बिलियन डॉलर्सवर गेली आहे. त्यामुळे 58 वर्षीय नायर आता भारतातल्या सर्वांत श्रीमंत महिला आहेतच; पण इंडिया ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्समधल्या (India Bloomberg Index) जगातल्या सहा महिला अब्जाधीशांमध्ये (World's Billionare Women) त्यांचा समावेश झाला आहे. नायर यांच्याकडे कंपनीचे जवळपास निम्मे शेअर्स आहेत.
एका महिलेच्या नेतृत्वाखालच्या या युनिकॉर्न कंपनीनं 10 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात पदार्पण केलं. आयपीओला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कंपनीच्या संपत्तीत भरघोस वाढ झाली आहे. 2012 मध्ये सुरुवात करून अल्पवधीतच यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करणाऱ्या या कंपनीच्या मुकुटात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
नायका कंपनीचा शेअर मुंबई शेअर बाजारात (BSE) 2001 रुपयांवर उघडला, इश्यू किमतीच्या तुलनेत त्याची किंमत 77.87 टक्क्यांनी वाढली, तर राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) या शेअरच्या किमतीत तब्बल 79.83 टक्क्यांनी वाढ होऊन तो 2018 वर नोंदला गेला. कंपनीने 28 ऑक्टोबर ते नोव्हेंबर 1 या कालावधीत 1085-1125 रुपये किंमत पट्ट्यात हा शेअर आयपीओद्वारे विक्रीसाठी खुला केला होता. या आयपीओद्वारे 5352 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना होती.
14,500 रुपयांची गुंतवणूक करून उभा करा 23 कोटींचा फंड, वाचा सविस्तर
कोटक महिंद्रा बँकेत (Kotak Mahindra Bank) व्यवस्थापकीय संचालक म्हणून यशस्वी कारकीर्द करणाऱ्या फाल्गुनी नायर यांनी आपल्या 50 व्या वाढदिवसाच्या काही महिने आधी, 2012 साली नायका कंपनीची पायाभरणी केली. देशातल्या महिला आणि पुरुषांना ऑनलाईन सौंदर्य उत्पादनं पोहोचवणं हा त्यामागचा उद्देश होता.
नायका हा संस्कृत शब्दापासून तयार झालेला शब्द असून, त्याचा अर्थ नायिका असा आहे. आतापर्यंत आपल्या देशात बहुतेक सौंदर्यप्रसाधनं, उत्पादनं दुकानातच खरेदी करण्याची पद्धत रूढ होती. सौंदर्यप्रसाधनं, उत्पादनं ऑनलाईन खरेदी करण्याचं प्रमाण खूप कमी होतं. नायकाने सौंदर्यप्रसाधनं ऑनलाईन उपलब्ध करून ग्राहकांचा विश्वास जिंकला. अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय ब्रँड्स, ज्यांच्याबद्दल कधीच ऐकलं नव्हतं, असे ब्रँड्सही उपलब्ध केले. त्यामुळे बॉलिवूड कलाकार (Bollywood Artist) आणि सेलिब्रिटीजही नायकाचे ग्राहक बनले. बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रिटींच्या डेमो व्हिडिओमुळे ऑनलाईन विक्रीला चांगलीच चालना मिळाली. तसेच कंपनीची 70 हून अधिक प्रत्यक्ष दुकानेदेखील आहेत. सुरुवातीला स्टार्टअप असणारी ही कंपनी आता देशातल्या आघाडीच्या ब्युटी रिटेलरमध्ये विकसित झाली असल्याचं ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटलं आहे.
खूशखबर! RBI देत आहे 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, वाचा काय करावं लागेल काम
मेबेलाईन, लॅक्मे, लॉरियलसह मॅक (MAC), हुडा ब्युटी आणि एस्टी लॉडरसारख्या लक्झरी ब्रँडसह 300 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची उत्पादनं इथं उपलब्ध असतात. वधूच्या मेक-अपसाठी आवश्यक वस्तू, लिपस्टिक, फाउंडेशन, नेल कलर अशा असंख्य गोष्टी उपलब्ध करणारी नायका कंपनी गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने देशातली टॉप ऑनलाईन ब्युटी रिटेलर बनली आहे. आता नायका कंपनीने स्वतःची कॉस्मेटिक, स्किनकेअर, हेअरकेअर आणि इंटिमेट वेअर लाइनदेखील बाजारात आणली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मार्चमध्ये संपलेल्या वर्षात कंपनीच्या उत्पादनांची विक्री 35 टक्क्यांनी वाढून $330 दशलक्ष झाली आहे.
नायकाला प्रचंड यश मिळालं असलं, तरीही कंपनीला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, असं फाल्गुनी नायर म्हणतात. त्याकरिता कंपनीने फॅशन उद्योगात काम सुरू केलं असून, नायर यांची उच्चशिक्षित मुलगी आणि मुलगा त्याचं व्यवस्थापन सांभाळत आहेत. 'वयाच्या 50व्या वर्षी मी कोणताही अनुभव नसताना नायका कंपनीची सुरुवात केली. आज नायका यशस्वी ठरली आहे. नायकाचा हा प्रवास तुमच्यापैकी अनेकांना प्रेरणा देईल,' अशी प्रतिक्रिया फाल्गुनी नायर यांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Share market, Success story