नवी दिल्ली, 20 सप्टेंबर: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय (State Bank of India) ने ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. ज्यामध्ये एसबीआयने असे म्हटले आहे की, जर तुम्ही परवानगीशिवाय एखाद्या रजिस्टर्ड ब्रँडचे नाव किंवा LOGO वापरत असाल तर हा दंडनीय अपराध आहे. असे काम केल्यास कठोर कारवाई केली जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. जर तुम्ही एखादा छोटा व्यवसाय किंवा कोणतेही काम सुरू करणार असाल आणि अशावेळी एखाद्या प्रसिद्ध ब्रँडचा किंवा त्यांच्या लोगोचा वापर परवानगीशिवाय केला तर तो दंडनीय अपराध आहे. असे वागणाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जाऊ शकते. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. एसबीआयच्या अधिकाऱ्यांच्या नावाचा आणि ब्रँड हँडलचा वापर केला जात असल्याचे या ट्वीट मध्ये म्हटले आहे. हा दंडनीय अपराध असून त्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे यामध्ये म्हटले आहे.
The brand has noticed several accounts impersonating the brand handle and top executives. This is a punishable offense and strict action will be taken for the same. #StaySafe #BeVigilant #SBI #StateBankOfIndia pic.twitter.com/NUyT3F5lyK
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 19, 2020
एसबीआयने वेळोवेळी त्यांच्या ग्राहकांना अलर्ट पाठवले आहेत. विविध बँकिंग फ्रॉडबाबत अलर्ट केले आहे. कोरोना काळात (Coronavirus) बँकिंग फ्रॉडची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक भामट्यांनी बँक ग्राहकांची फसवणूक केली आहे. (हे वाचा- आयकर विभागाने 40 लाख करदात्यांच्या खात्यामध्ये पाठवले 1.36 लाख कोटी,वाचा सविस्तर ) काही दिवसांपूर्वी देखील एसबीआयने एक ट्वीट शेअर करत त्यांच्या ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. एसबीआयने त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांना वेळोवेळी असे अलर्ट पाठवले आहेत की, बँकेकडून कोणतेही मेसेज त्यांची वैयक्तिक किंवा बँकिंग डिटेल्स विचारण्यासाठी पाठवले जात नाहीत. त्याचप्रमाणे बनावट मेल न उघडण्याचा सल्ला देखील बँकेने दिला आहे. दरम्यान एसबीआयने या ट्वीटमध्ये असे म्हटले होते की, ‘बँक ग्राहकांना अशी विनंती आहे की, सोशल मीडियावर त्यांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही भ्रामक किंवा बनावट मेसेजना बळी पडू नये.’ बँकिंग सेवांसाठी अधिकृत पोर्टलचा वापर करा एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना अशी माहिती दिली आहे की, घरबसल्या विविध बँकिंग सेवा मिळवण्यासाठी बँकेच्या अधिकृत पोर्टलचाच वापर करा. याशिवाय YONO अॅप वापरून देखील तुम्ही विविध सेवा मिळवू शकता. SBI वेबसाइट किंवा योनो व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्या पोर्टलचा वापर केल्यास तुम्ही फसवणुकीची शिकार होण्याची शक्यता अधिक आहे.