नवी दिल्ली, 04 सप्टेंबर: तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेच्या सेवा आज शनिवारी काही तासांसाठी बंद असणार आहेत. या दरम्यान एसबीआय ग्राहकांना काही व्यवहार करताना अडथळा येऊ शकतो. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटरवर एक अलर्ट (State Bank of India Alert) जारी केला आहे. शनिवारी रात्री 3 तास बँकेच्या सेवा प्रभावित होणार आहेत. एसबीआयने काय केलं ट्वीट? SBI ने केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की 4 सप्टेंबर रात्री 10.35 वाजल्यापासून 5 सप्टेंबर रात्री 01.35 पर्यंत अर्थात एकूण 180 मिनिटं ऑनलाइन बँकिंग सेवा बंद राहणार आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार मेंटेनन्ससाठी या सेवा ठप्प असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला एखादे काम पूर्ण करायचे असेल तर ते आज रात्री साडेदहापूर्वी पूर्ण करा. हे वाचा- स्वत:चं घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी!8 सप्टेंबरला ही बँक विकतेय स्वस्त प्रॉपर्टी
एसबीआयने ग्राहकांची याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार या तीन तासाच्या काळात इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट, योनो बिझनेस, आयएमपीएस, यूपीआय या सेवा उपलब्ध नसतील. यासंबंधित काम असेल तर आताच पूर्ण करून घ्याल. ग्राहकांना उत्तम बँकिंगचा अनुभव मिळावा याकरता मेंटेनन्स प्रक्रिया केली जाते. या आधी देखील अनेकदा बँकेने अशाप्रकारे नेटबँकिंग सेवा बंद ठेवल्या आहेत.