नवी दिल्ली, 08 जुलै: सध्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी ऑनलाइन (Online) किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्राधान्य दिलं जात आहे. अशाप्रकारे व्यवहार वाढावेत यासाठी सरकार आणि बॅंकिंग क्षेत्र देखील नागरिकांना प्रोत्साहन देत आहे. कोरोनाच्या काळात असे व्यवहार लक्षणीय प्रमाणात वाढले आहेत. एकीकडे डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढत असताना, दुसरीकडे ऑनलाइन फ्रॉड, फसवणूक, हॅकिंग अशा घटनांमध्ये देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने बॅंका, सरकार नागरिकांचे सुरक्षित व्यवहारांबाबत प्रबोधन करत आहे. असे असले तरी हॅकिंगच्या नवनवीन प्रकारांमुळे काही प्रमाणात असुरक्षितता कायम आहे. मीडिया अहवालाच्या मते, चिनी हॅकर्स (Chinese Hackers) स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एसबीआयच्या ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी हे हॅकर्स अनेक प्रकारच्या स्कॅमचा (Scams) वापर करत आहेत. हे हॅकर्स ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी त्यांना व्हॉट्सअॅपवर मेसेज (Whatsapp Message) किंवा एसएमएस (SMS) पाठवत आहेत. व्हॉट्सअॅप मेसेज किंवा एसएमएस पाठवून एसबीआय ग्राहकांना केवायसी अपडेट (KYC Update) करण्याबाबत सांगितले जात आहे. यासाठी या मेसेजेसमध्ये एक वेबसाईट लिंकही (Link) हॅकर्सकडून दिली जात आहे. ही वेबसाईट एसबीआयच्या वेबसाईटशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे ग्राहक फसले जात आहेत. आज तक ने याबाबत वृत्त दिले आहे. हे वाचा- यादिवशी येणाऱ्या IPOमध्ये पैसे गुंतवून व्हा मालामाल! 72-76 रुपयात खरेदी करा शेअर नवी दिल्ली येथील सायबर पीस फाऊंडेशन (Cyber Peace Foundation) आणि ऑटोबोट इन्फोसेक प्रा.लि. (Autobot Infosec Pvt.Ltd.) ने यांनी संयुक्तपणे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नावावर होणाऱ्या फसवणुकीबाबत अभ्यास केला आहे. त्यांच्या पथकाने सांगितले की ज्या वेबसाईटची लिंक हॅकर्स देत आहेत, त्या सर्व लिंकचे डोमेन नेमचे रजिस्ट्रेशन चीनमध्ये झाले आहे. काही मेसेजेस मध्ये ग्राहकांना 50 लाखांचे गिफ्ट देऊ असेही सांगितले जात आहे. अशा स्कॅम्सपासून ग्राहकांनी सावध राहावे असा सल्ला सायबर सिक्युरिटी रिसर्चरने दिला आहे. हॅकर्स एसबीआयच्या ग्राहकांना केवायसी व्हेरिफिकेशन (KYC Verification) करण्यास सांगत आहेत. यासाठी ते एका वेबसाईटचा पत्ताही देत आहेत. ही वेबसाईट एसबीआयच्या अधिकृत वेबसाईट प्रमाणेच दिसते. यात युजरला लॉगिन आयडी, पासवर्ड टाकून लॉगिन करायला सांगितले जाते. अभ्यासकांनी सांगितले की ही प्रक्रिया केल्यानंतर एक ओटीपी (OTP) ग्राहकाच्या मोबाईलवर येतो. ओटीपी दिल्यानंतर ग्राहकाला अजून एका पेजवर नेत त्यात अकाऊंट होल्डर नेम, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ आदी तपशील भरायला सांगितला जातो. असा डेटा दिल्यावर ग्राहकाला पुन्हा ओटीपी पेजवर रिडायरेक्ट केले जाते. हे वाचा- तुम्ही शुद्ध सोनं खरेदी करत आहात का? जाणून घ्या काय आहे सरकारचा नियम दुसऱ्या प्रकारात हॅकर्स ग्राहकाला व्हॉटसअप मेसेजच्या माध्यमातून ट्रिक करायचा प्रयत्न करतात. यात गिफ्ट देऊ असे हॅकर्सकडून सांगितले जाते. या मेसेजमधून दुसऱ्या लिंकवर नेले जाते. येथे फसवणुकीच्या उदेदशाने ग्राहकाकडून सर्व माहिती मागितली जाते. त्यामुळे अशा कोणत्याही लिंकवर ग्राहकांनी क्लिक करु नये, असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.