नवी दिल्ली, 26 जुलै : गेल्या काही वर्षापासून ऑनलाइन बॅंकिंग (Online Banking) किंवा डिजीटल बॅंकिंगकडे (Digital Banking) ग्राहकांचा कल वाढतो आहे. सध्याच्या कोरोनाकाळात बहुतांश लोक बॅंकिंगसाठी ऑनलाइन किंवा डिजीटल सेवांचा वापर प्राधान्याने करत आहेत. नेमक्या याच गोष्टीचा फायदा सायबर गुन्हेगार (Cyber Criminal) घेत असून, ग्राहकांची आर्थिक फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या वाढत्या घटनांची दखल घेत एसबीआय (SBI) आपल्या ग्राहकांमध्ये सातत्याने विविध माध्यमांतून जनजागृती करत असते. ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी सायबर गुन्हेगार अनेक अमिषं दाखवतात. अशा कोणत्याही अमिषांना बळी पडू नका, आपली गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तीसोबत किंवा लिंकवर शेअर करु नका अशा सूचना एसबीआयकडून दिल्या जात असतात. एसबीआयच्या एका ग्राहकाला लॉटरीबाबत (Lottery) एक मेसेज आला. त्याने याबाबत बॅंकेला कळवलं असता एसबीआयने प्रतिसाद देत त्या ग्राहकाला योग्य मार्गदर्शन केले.
एसबीआय ग्राहक संरक्षणाला प्राधान्य देत कस्टमर केअर (Customer Care) व्यतिरिक्त ट्विटरच्या (Twitter) माध्यमातूनही याबाबत प्रबोधन करत असते. जर एखाद्या ग्राहकाने आपली समस्या ट्विटरवर शेअर केली तर एसबीआयदेखील ट्विट करुन त्यावर उत्तर देते. केवळ समस्या सोडवणंच नाही, तर सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात आपले ग्राहक अडकू नयेत, यासाठी ट्विटरच्या माध्यमातून एसबीआय मार्गदर्शन करते. याबाबतचा अनुभव एका ग्राहकाला नुकताच आला. बॅंकेने असे अर्थिक फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी संबंधित ग्राहकाला ट्विटच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन केलं.
एसबीआयच्या एका ग्राहकाने ट्विटवरुन पोस्ट केलं, की मला व्हॉटसअॅपवर (WhatsApp) एक मेसेज आला असून, त्यात मला 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे आणि ही रक्कम माझ्या एसबीआय अकाऊंटवर जमा करण्यात येणार आहे, असं म्हटलं आहे. या ग्राहकाने ट्विटमध्ये या मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर केला. अशा कोणत्याही मेसेजला प्रतिसाद देऊ नये. तसंच ग्राहकांनी आपली वैयक्तिक माहिती शेअर करु नये, असं या ग्राहकाला उत्तर देताना एसबीआयने सांगितलं.
मुझे 25 लाख की लॉटरी लगी है WhatsApp की तरफ से, दिल्ली से मुझे फोन आया है और mumbai के SBI से मुझे पैसे मिलेंगे। Please take necessary action against these fraud people.@WhatsApp@TheOfficialSBI@DelhiPolice Rcvd audio Link-https://t.co/t48B2RLhUs Valid until: 26 Jul 2021 pic.twitter.com/WLhqs8YD1g
— PRADEEP GUPTA (@PRADEEP_PKG) July 25, 2021
तुमच्या वैयक्तिक बॅंक अकाऊंटची माहिती, तसंच युजर आयडी, पासवर्ड, डेबिट कार्ड नंबर, पिन, CVV, ओटीपी अपडेट करण्यास सांगणाऱ्या कोणत्याही ई-मेल, टेक्स्ट मेसेज, कॉल्स किंवा एम्बेड लिंकला ग्राहकांनी प्रतिसाद देऊ नये. फिशिंग (Phishing), स्मिशिंग, विशिंग सारख्या घटना घडल्यास संबंधितावर तात्काळ कारवाई व्हावी याकरता याबाबतची माहिती ई-मेलच्या माध्यमातून report.Phishing@sbi.co.in वर कळवावी. तसंच नजीकच्या कायदा अंमलबजावणी एजन्सीलाही ही माहिती कळवावी, असं बॅंकेने ट्विट करुन सांगितलं आहे.
त्याचप्रमाणे ग्राहक सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून बॅंकेकडे तक्रार करताना आपली वैयक्तिक माहिती देखील त्यात शेअर करतात. मात्र ग्राहकांनी आपली वैयक्तिक आणि बँकिंग विषयीची माहिती सुरक्षेच्या कारणास्तव सोशल मीडियावरुन शेअर करु नये. यामुळे ग्राहकांचं नुकसान झाल्यास त्यास बॅंक जबाबदार नाही. तुम्ही ही पोस्ट तातडीने हटवावी आणि बॅंकेशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे बॅंकेने या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SBI, Sbi account, Sbi alert