नवी दिल्ली, 26 जून: गेल्या काही वर्षांपासून आर्थिक व्यवहारांसाठी ऑनलाइन (Online) पद्धतीचा वापर करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. सरकार देखील ऑनलाइन व्यवहारांना (Online Transactions) प्रोत्साहन देत आहे. या प्रणालीचे फायदे आहेत, तसे काही प्रमाणात तोटेही अनुभवायला येतात. एखाद्या वेळी तुम्ही ऑनलाइन प्रणालीद्वारे एखाद्या व्यक्तीस काही रक्कम पाठवता. परंतु, ती रक्कम तुमच्या खात्यातून डेबिट तर होते, पण त्या व्यक्तीच्या खात्यावर जमा होत नाही. अशा वेळी नेमकं काय करावं हे सुचत नाही; पण असं झाल्यास काळजी करण्याचं कारण नाही. स्टेट बॅंक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय (SBI) याबाबत आपल्या ग्राहकांमध्ये सातत्याने जागृती करत आहे. तसंच, या बॅंकेनं अशा वेळी काय करावं याचं मार्गदर्शन करताना ग्राहकांच्या सुरक्षेलाही महत्त्व दिलं आहे. जाणून घेऊ या याविषयी...
स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank of India) ग्राहकांना ऑनलाइन माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ग्राहकांनी सुरक्षेच्या दृष्टीने घरी राहूनच बॅंकेसंदर्भात महत्त्वाची कामं आणि व्यवहार ऑनलाइन पद्धतीनं करावेत, यासाठी एसबीआय आग्रही आहे. त्यामुळे या बॅंकेने बरेच व्यवहार ऑनलाइन करता येतील अशी सोय केली आहे. यात नवं अकाउंट सुरू करण्याची सुविधादेखील समाविष्ट आहे. त्यामुळे बरेच ग्राहक पैसे ट्रान्स्फर करण्यासाठीही आणि अन्य व्यवहारांसाठीही बॅंकेचं अॅप वापरत आहेत.
हे वाचा-विजय मल्ल्याला मोठा झटका! SBI कंसोर्टियमने वसुल केलं 5824.5 कोटींचं कर्ज
ऑनलाइन बॅंकिंग (Online Banking) करताना एखाद्या वेळी तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठवता त्या व्यक्तीला ते मिळत नाहीत, अशी तक्रार ऐकायला मिळते. पैसे तर तुमच्या खात्यातून डेबिट झालेले असतात, परंतु बेनिफिशियरी अकाउंटमध्ये (Beneficiary Account) ते जमा झालेले नसतात. असं झाल्यास घाबरण्याचं काहीही कारण नाही. कारण एक तर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात किंवा ते बेनिफिशियरी अकाउंटमध्ये जमा होतात. तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल आणि तुमच्याबाबत असा प्रसंग घडल्यास काय करावं, याबाबत बॅंकेकडे कशी तक्रार करायची, त्याची प्रक्रिया बँकेने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
अशा प्रसंगी काय कराल?
नुकताच असा प्रसंग एका ग्राहकासोबत घडला. त्याने या तक्रारीबाबत ट्विट केलं असता, एसबीआयकडून त्याला उत्तर देण्यात आलं. असा प्रसंग घडल्यास काय करावं, कुठे आणि कशी तक्रार करावी याबाबत बँकेनं मार्गदर्शन केलं.
Dear Customer, we regret the inconvenience caused to you. Please register a complaint at https://t.co/FQRPosCATK under Existing Customer >> TECHNOLOGY: INTERNET BANKING//ONLINE PAYMENT/TRANSFER// IMPS FUNDS TRANSFER category. We will look into the matter.
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 24, 2021
अशी करा तक्रार दाखल
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, पैसे जमा न झाल्यास तक्रार दाखल करण्यासाठी https://crcf.sbi.co.in//ccf या संकेतस्थळावर जावं. त्यानंतर Existing Customer>> TECHNOLOGY : INTERNET BANKING//ONLINE PAYMENT/TRANSFER//IMPS FUND TRANSFER Category यावर जाऊन आपली तक्रार दाखल करावी. त्यानंतर बॅंक तुमच्या तक्रारीची दखल घेईल आणि ती सोडवेल.
हे वाचा-Gold Outlook: भविष्यात सोनं महागणार की स्वस्त होणार? काय म्हणतायंत तज्ज्ञ
पैसे भलत्याच व्यक्तीच्या खात्यात जमा झाले तर?
तुम्ही एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन पैसे पाठवत असाल आणि तुमच्या चुकीने ते दुसऱ्याच व्यक्तीला पाठवले गेले, तर काय करावं असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. याबाबत तुम्ही तातडीने बॅंकेशी संपर्क साधून तक्रार दाखल करू शकता. परंतु, अशा प्रकरणाची जबाबदारी बॅंकेची नसते. तुम्ही चुकून दुसऱ्याच व्यक्तीला पैसे पाठवले, तर त्यात बॅंकेचा दोष नसतो. बॅंक तुम्हाला तुमचे पैसे मिळवून देण्यासाठी मदत मात्र करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SBI, Sbi account, SBI bank, State bank of india