नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank Of India-RBI) संपूर्ण देशातील बँकामध्ये चेक क्लिअरन्स अर्थात धनादेश वठण्याची (Cheque Clearance) प्रक्रिया वेगवान पद्धतीनं व्हावी यासाठी येत्या सप्टेंबरपर्यंत सर्व बँकामध्ये सीटीएस म्हणजेच चेक ट्रंकेशन सिस्टिम (Cheque Truncation System- CTS) लागू करण्याची घोषणा केली आहे. यामुळं चेक क्लिअरन्स अर्थात धनादेश वठवण्याची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होणार आहे. व्यापार, व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांसाठी ही फार महत्त्वाची बाब आहे.
टाईम्स नाउनं दिलेल्या वृत्तानुसार, 2010 मध्ये भारतात सर्वप्रथम सीटीएस म्हणजेच चेक ट्रंकेशन सिस्टम सुरू करण्यात आली. आतापर्यंत एक हजार 219 क्लीअरिंग हाउसेसमध्ये (Clearing Houses) सीटीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, दीड लाख बँक शाखांमध्ये (Bank Branches) याचा वापर केला जात आहे, तरीही अद्याप 18 हजार बँक शाखांमध्ये या प्रणालीबाहेर आहेत. आता सप्टेंबरपर्यंत या सर्व शाखांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित करणं अनिवार्य असेल. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना येत्या महिन्याभरात जारी केल्या जातील, असं रिझर्व्ह बँकेने नुकत्याच काढलेल्या विकास आणि नियामक धोरणाबाबतच्या (Development And Regulatory Policy) निवेदनात स्पष्ट केलं आहे.
(
हे वाचा - Good News: आठवड्यातून 4 दिवसच करावं लागणार काम, मोदी सरकार आखतंय अशी योजना)
सीटीएस प्रणालीचे फायदे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिलेल्या माहितीनुसार, सीटीएस प्रणालीअंतर्गत चेक प्रत्यक्ष एका बँकेतून दुसर्या बँकेत नेण्याऐवजी त्याची इलेक्ट्रॉनिक प्रतिमा पाठविली जाते. त्याबरोबरच एमआयसीआर बँड (MICR Band), तारीख, बँक खाते तपशील इत्यादी आवश्यक माहितीही पाठवली जाते. यामुळे वेळ तर वाचतोच; पण त्याचबरोबर चेक गहाळ होणे, त्याचा गैरवापर होणं यासारखे धोके दूर होतात.
(हे वाचा- खूशखबर! या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता)
ही अतिशय सुरक्षित आणि कार्यक्षम यंत्रणा आहे. सीटीएस प्रणाली नसल्यास बँकांना त्यांच्या ग्राहकांचे चेक जमा करून क्लिअरिंग हाउसकडे पाठवावे लागतात. या सगळ्या प्रक्रियेत वेळ जातोच; पण यासाठी खर्चही अधिक येतो. सीटीएस प्रणाली वापरल्यास या सगळ्या अडचणी दूर होतात. देशातील कोठेही, कोणत्याही बँकेत क्लिअरिंग सुविधा उपलब्ध असल्यानं चेक क्लिअरन्स अर्थात धनादेश वठण्याची प्रक्रिया अगदी जलद होईल. एका दिवसात चेक क्लिअर होतील. याचा फायदा ग्राहकांना होईल. त्यामुळं सीटीएस प्रणाली सर्वच दृष्टीनं फायद्याची आहे, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.