रिलायन्स इंडस्ट्रीज करणार तेल-रसायन व्यवसायाची पुनर्रचना; स्थापणार नवी उपकंपनी

रिलायन्स इंडस्ट्रीज करणार तेल-रसायन व्यवसायाची पुनर्रचना; स्थापणार नवी उपकंपनी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं (आरआयएल - RIL) तेल-ते-रसायनांच्या (Oil to Chemicals - ऑईल टू केमिकल्स-O2C Business) व्यवसायाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी एक स्वतंत्र उपकंपनी (Independent Subsidiary) निर्माण करण्यात येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं (आरआयएल - RIL) तेल-ते-रसायनांच्या (Oil to Chemicals - ऑईल टू केमिकल्स-O2C Business) व्यवसायाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी एक स्वतंत्र उपकंपनी (Independent Subsidiary) निर्माण करण्यात येणार आहे. या स्वतंत्र कंपनीचे संपूर्ण व्यवस्थापन रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच करणार आहे, असंही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अर्थात आरआयएलनं स्पष्ट केलं आहे.

याबाबत शेअर बाजाराला (Stock Exchanges) दिलेल्या माहितीत, पुनर्रचनेनंतर या ‘ओ 2 सी’ व्यवसायात प्रवर्तक गटाचा (Promotor Group) 49.14 टक्के भागभांडवल हिस्सा असेल. यामुळे कंपनीच्या भागधारकांच्या प्रमाणात कोणताही बदल होणार नाही. सध्या या व्यवसायाचं व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गटच नव्या कंपनीचं व्यवस्थापन करेल, त्यामुळे उत्पन्न किंवा खेळत्या भांडवलावर कोणतेही निर्बंध येणार नाहीत, असं आरआयएलनं म्हटलं आहे.

सौदी अरेबियातील (Saudi Arab) सर्वांत मोठी तेल कंपनी असलेल्या सौदी अरामकोबरोबरच्या (Saudi Aramco) करारासह आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी करत व्यवसायवृद्धी करण्याच्या दृष्टीनं रिलायन्स समूहानं हे पाऊल उचललं आहे. अर्थात, सौदी अरामकोशी अद्याप चर्चा सुरू आहे. क्रूड तेलाची निर्यात करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी असलेली सौदी अरामको रिलायन्सच्या तेल आणि रसायन व्यवसायात 20 टक्के भागीदारी करण्याच्या विचार करत आहे. दरम्यान, रिलायन्सनं आपल्या या व्यवसायासाठी 25 अब्ज डॉलर्सचं कर्ज घेतलं आहे. स्टेट बँकेच्या (SBI) एमसीएलआर दराशी निगडीत फ्लोटिंग व्याजदरानुसार रिलायन्स या कर्जासाठी व्याज देणार असून, धोरणात्मक भागीदारीद्वारे गुंतवणूकदारानं या व्यवसायात गुंतवणूक केल्यानंतर आरआयएलला हे कर्ज देण्यात येणार आहे.

तेल आणि रसायन व्यवसायाच्या पुनर्रचनेसाठी रिलायन्सला यापूर्वीच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आणि दोन्ही प्रमुख शेअर बाजारांकडून (Stock Exchanges) मान्यता मिळाली आहे. मात्र प्राप्तिकर विभाग (Income Tax Authority) आणि राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या (NCLT) मुंबई आणि अहमदाबादमधील खंडपीठांकडून यासाठी अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याचं रिलायन्स इंडस्ट्रीजनं स्पष्ट केलं आहे.

आर्थिक वर्ष 2022 च्या दुसर्‍या तिमाहीपर्यंत या पुनर्रचनेसाठी आवश्यक विविध मंजुरी मिळतील अशी रिलायन्सला अपेक्षा आहे. या पुनर्रचनेनंतर रिलायन्स रिटेल व्हेंचर्समध्ये (Reliance Retail Venture) ‘आरआयएल’ची भागीदारी 85.1टक्के, तर जिओमधील हिस्सा 67.3 टक्के असेल. प्रस्तावित ‘ओ 2 सी’ उपकंपनीत फ्युएल रिटेल कंपनीचाही समावेश असेल. ज्यात ‘आरआयएल’ची 51 टक्के भागीदारी आहे आणि उर्वरित 49 टक्के बीपी पीएलसीची आहे.

2035 पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि नवी ‘ओ2सी’ कंपनी शून्य कार्बन उत्सर्जनाचं (Zero Carbon Emission) उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संयुक्तपणे काम करतील, असं कंपनीनं म्हटलं आहे. यासाठी कंपनी ‘ओ2सी’ व्यवसायात कार्बन डाय ऑक्साईडचं उपयुक्त उत्पादनं आणि रसायनांमध्ये रूपांतर करणाऱ्या अत्याधुनिक कार्बन कॅप्चर आणि स्टोरेज तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करणार आहे. यामुळे पारंपरिक कार्बन-आधारित इंधनांमधून हायड्रोजन इंधन आधारीत अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असं आरआयएलनं म्हटलं आहे.

या नवीन घडामोडीचा कंपनीची एकत्रित आर्थिक स्थिती, भांडवली खर्च, कर्ज, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक-दर्जा आणि देशांतर्गत एएए पत मानांकन यावर कोणताही परिणाम होणार नाही, असं कंपनीनं म्हटलं आहे.

मॉर्गन स्टेनलीच्या (Morgan Stanley) अहवालानुसार, या नवीन व्यावसायिक पुनर्रचनेमुळं वैविध्यपूर्ण विस्तार आणि नवीन गुंतवणूक योजनेचे संकेत मिळत आहेत. हायड्रोजन बॅटरीमध्ये नवीन ऊर्जा आणि साहित्य निर्मिती, नवीकरणीय ऊर्जा, कार्बन कॅप्चर यासह अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या योजनेला गती देण्यासाठी कंपनीनं हे पाऊल उचललं आहे.

‘या व्यावसायिक पुनर्रचनेचा कंपनीच्या एकत्रित आर्थिक स्थितीवर परिणाम होण्याची शक्यता दिसत नसल्याचं मॉर्गन स्टेनलीनं म्हटलं आहे. यावर्षी जानेवारीपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अर्थात ‘आरआयएल’कडे 5 अब्ज डॉलर्सचं निव्वळ कर्ज आणि स्पेक्ट्रमसह अन्य क्षेत्रात 11 अब्ज डॉलर्सच्या नॉन-करंट लायबिलिटीज होत्या, असंही मॉर्गन स्टेनलीनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: February 23, 2021, 12:29 PM IST

ताज्या बातम्या