मराठी बातम्या /बातम्या /मनी /RBL बँकेचे शेअर 20 टक्के कोसळले, ब्रोकरेज हाऊसेसनेही रेटिंग घटवली; रिझर्व्ह बँकेने म्हटलं...

RBL बँकेचे शेअर 20 टक्के कोसळले, ब्रोकरेज हाऊसेसनेही रेटिंग घटवली; रिझर्व्ह बँकेने म्हटलं...

मुंबई, 27 डिसेंबर : खासगी क्षेत्रातील आणखी एक बँक संकटात सापडली असल्याची उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. RBL बँकेत मोठ्या घडामोडी सध्या घडत आहेत. त्यामुळे आरबीएल बँकेच्या शेअर्समध्ये (RBL bank Share) मोठी घसरण आज पाहायला मिळाली. RBL बँकेचे शेअर्स आज 27 डिसेंबर रोजी 18.10 टक्के घसरून 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आले. शेअर बाजार बंद झाला त्यावेळी शेअर 31.30 रुपयांनी घसरून 141.60 रुपयांवर ट्रेड करत होते. यापूर्वी 26 डिसेंबर रोजी आरबीआयने योगेश कुमार दयाल (YOGESH DAYAL) यांची आरबीएल बँकेच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली. तर राजीव आहुजा (RAJEEV AHUJA) यांची अंतरिम MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली.

रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, रिझर्व्ह बँकेने योगेश कुमार दयाल यांची पुढील दोन वर्षांसाठी आरबीएल बँकेचे अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. म्हणजेच ते 24 डिसेंबर 2021 ते 23 डिसेंबर 2023 या कालावधीत अतिरिक्त संचालक असतील.

दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी, आरबीएल बँकेच्या संचालक मंडळाने विश्ववीर आहुजा (VISHWAVIR AHUJA) यांचा सीईओ पदाचा राजीनामा स्वीकारल्यानंतर, त्यांना रजेवर जाण्याची परवानगी दिली आणि राजीव आहुजा यांची नवीन अंतरिम सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली गेली. तेव्हापासून बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

केंद्र सरकारकडून मिळतोय 10 हजारांचा थेट लाभ, मार्चआधी 'ही' कामं करुन घ्या; काय आहे योजना?

RBI ने RBL बँकेबाबत काय म्हटलं?

आरबीएल बँकेवर आरबीआयने स्टेटमेंट जारी केलं आहे, जे आरबीएल बँकेसाठी दिलासा देणारे आहे. या निवेदनात मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, आरबीएल बँकेची आर्थिक स्थिती समाधानकारक आहे. यासोबतच बँकेकडे पुरेसे भांडवल आहे. आरबीआयने ठेवीदार आणि भागधारकांना अफवांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. आरबीआयच्या निवेदनानंतर बँकेच्या शेअरमध्ये खालच्या स्तरावरून सुधारणा दिसून आली आहे.

RBI ने सांगितले की RBL बँकेची आर्थिक स्थिती समाधानकारक आहे कारण नियामकानुसार LCR 100 टक्के पर्यंत असला पाहिजे तर RBL बँकेचा LCR 153 टक्के आहे, त्यामुळे तिच्या भागधारकांनी आणि ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. RBI चं स्टेटमेंट RBL बँकेसाठी उत्साहवर्धक असल्याचे दिसून आले.

RBL बँकेवर ब्रोकरेज हाऊसेसचं मत काय?

CLSA ने RBL बँकेवरील आऊटपरफॉर्म रेटिंग कायम ठेवले आहे आणि टार्गेट 230 वरून 200 रुपये केले आहे. CLSA ने म्हटलं की अतिरिक्त संचालकांची नियुक्ती हा आरबीआयचा धक्कादायक निर्णय आहे. आरबीआय सहसा संकटाच्या वेळी असे निर्णय घेते. या निर्णयामुळे अल्पावधीत अनिश्चिततेत भर पडणार आहे. यानंतर पुढील 6 महिने महत्त्वाचे असून व्यवस्थापनाच्या कामगिरीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

31 डिसेंबरआधी 'हे' काम करुन घ्या, अन्यथा सीज होईल बँक अकाऊंट

ICICI SEC ने RBL बँकेचे रेटिंग कमी करून आणि त्याचे टार्गेट 180 वरून 130 रुपये कमी करून विक्रीचा सल्ला दिला आहे. आरबीआयच्या निर्णयामुळे अनिश्चितता वाढली असल्याचे त्याचं मत आहे.

INVESTEC ला RBL बँकेवर बाय रेटिंग दिली आहे आणि स्टॉकसाठी त्यांचे लक्ष्य 295 रुपये केले आहे. ते म्हणतात की ताज्या घडामोडी गुंतवणूकदारांच्या विश्वासासाठी नकारात्मक आहेत. मात्र Q3 च्या निकालांनंतर आम्ही रेटिंगचे पुनरावलोकन करू असं INVESTEC ने म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Finance, Money, Rbi