नवी दिल्ली, 4 जून : RBI ने बँक व्यवहारांविषयी एक मोठी घोषणा केली आहे. नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस अर्थात NACH ही सेवा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार आहे. सध्या बँकेच्या सुट्ट्यांच्या दिवशी ही सेवा बंद असे. आता मात्र बँक हॉलिडेलाही ही सेवा सुरू राहणार असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी (4 जून) जाहीर केलं. यामुळे आता तुमचा पगार, पेन्शन फक्त बँकेला सुट्टी म्हणून अडून राहणार नाही. शिवाय SIP चा आणि कर्जाचा हप्तासुद्धा (EMI) ठरलेल्या तारखेलाच अकाउंटमधून जाईल, हे लक्षात ठेवा. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS)ही सुविधा 24x7 उपलब्ध असावी आणि ग्राहकांना सोयीचं व्हावं, यासाठी NACH ही सेवा आठवड्याचे सगळे दिवस सुरू ठेवावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला असून, एक ऑगस्ट 2021पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, असं रिझर्व्ह बँकेने आपल्या पत्रकात म्हटलं आहे. त्या पत्रकाचा हवाला देऊन ‘ईटी नाऊ डिजिटल’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) या संस्थेकडून चालवली जाणारी NACH ही बल्क पेमेंट सिस्टीम (Bulk Payment System) आहे. एका खात्यातून अनेक खात्यांत पैसे पाठवण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग केला जातो. त्यात डिव्हिडंडचं पेमेंट, व्याज, पगार, पेन्शन आदींचा समावेश आहे. RBI चे आर्थिक धोरण जाहीर, रेपो रेट ‘जैसे थे’ तसंच पेमेंट कलेक्शनसाठीही ही सेवा वापरली जाते. त्यात वीज, गॅस, टेलिफोन, पाणी आदींची बिलं, कर्जांचे हप्ते, म्युच्युअल फंडांतली (Mutual Fund) गुंतवणूक, इन्शुरन्सचा प्रीमिअम आदींचा समावेश आहे. आपल्याला मिळणारं पेन्शन किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं पेमेंट किंवा आपल्याकडून जाणारे कोणत्याही प्रकारचे हप्ते यांच्या वेळापत्रकात आता बँक हॉलिडेमुळे (Bank Holiday) अडचण येणार नाही. तुमच्याकडे नाही हा PF चा नंबर? घरबसल्या कसा काढायाचा PF खात्याचा UAN? NACH ही यंत्रणा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्सच्या (SIP) नोंदणीसाठीही वापरली जाते. सध्या NACHच्या माध्यमातून SIPची नोंदणी करण्यासाठी दोन-तीन आठवडे लागू शकतात. गुंतवणूकदाराची बँक कोणती आहे, यावर हा वेग अवलंबून असतो. छोट्या बँका किंवा राष्ट्रीयीकृत बँकांना (Nationalised Bank) जास्त वेळ लागतो. आता NACH ही सेवा सातही दिवस उपलब्ध झाली, तर हा वेग वाढू शकतो. कारण त्यासाठीच्या प्रक्रियेला लागणारा वेळ कमी होईल, असं म्युच्युअल फंड या विषयातले तज्ज्ञ सांगतात. एक मे 2016 रोजी ECSची जागा NACHने घेतली. ECS म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस. बँक खात्यातून ऑटो डेबिट इन्स्ट्रक्शन अर्थात पैसे आपोआप वळते करून घेण्याची सूचना द्यायची असेल, तर NACH ही सेवा वापरण्यावाचून पर्याय नसतो. त्यामुळेच म्युच्युअल फंडात SIPसाठी केला जाणारा ECSचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करून तिथे NACHचा वापर केला जाऊ लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.