मुंबई, 11 जानेवारी: तुम्ही देखील पंजाब नॅशनल बँकेचे (Punjab National Bank) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेने त्यांच्या खातेधारकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने सामान्य बँकिंग सेवांचे शुल्क वाढवले आहे. पीएनबीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार हे नवीन शुल्क 15 जानेवारीपासून लागू होणार आहे. या माहितीनुसार, बँकेने बचत खाती, लॉकर्स, डिमांड ड्राफ्ट आणि करंट अकाउंटशी संबंधित नियमात बदल केला आहे. बचत खात्यामध्ये निश्चित मिनिमम बॅलन्सपेक्षा (Minimum Balance in PNB Saving Account) कमी रक्कम असल्यास लागणारा चार्ज दुप्पट करण्यात आला आहे. याशिवाय बँकेने लॉकर विझिट कमी केली आहे आणि डिमांड ड्राफ्ट रद्द केल्यास आता 50 रुपये जास्त द्यावे लागतील.
बचत खात्यात ठेवावे लागणार 10000 रुपये
मेट्रो शहरात ग्राहकांच्या खात्यामध्ये क्वार्टर्ली मिनिमम बॅलेन्सची सध्याची कमीतकमी मर्यादा 5000 रुपये आहे, ती वाढवून 10000 रुपये करण्यात आली आहे. शहरी आणि मेट्रो भागात 10 हजारांपेक्षा कमी शिल्लक असल्यास 600 रुपये शुल्क लागू होईल. आत्तापर्यंत मिनिमम बॅलन्सपेक्षा कमी रक्कम असल्यास शुल्क 300 रुपये होते. हे शुल्क तिमाहीने आकारले जाईल. ग्रामीण आणि निमशहरी भागात किमान शिल्लक न ठेवल्यास 400 रुपये प्रति तिमाही शुल्क आकारण्यात येईल, जे की आधी 200 रुपये होते. दरम्यान बँकेने ग्रामीण आणि निमशहरी किमान शिल्लक मर्यादा 1000 रुपये ठेवली आहे.
हे वाचा-IOCL ने जारी केले नवे दर, तुमच्या शहरात 1 लीटरसाठी किती पैसे मोजावे लागतील?
लॉकर चार्ज मध्ये बदल
एक्स्ट्रा लार्ज आकाराचे लॉकर वगळता सर्व क्षेत्रांसाठी आणि सर्व प्रकारच्या लॉकर्ससाठी लॉकर फी वाढवण्यात आली आहे. शहरी आणि मेट्रो भागात लॉकरच्या शुल्कात 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. छोट्या आकाराच्या लॉकरचे शुल्क पूर्वी ग्रामीण भागात एक हजार रुपये होते, ते आता 1,250 रुपये केले जाणार आहे. तर शहरी भागात हे शुल्क 1,500 रुपयांवरून 2,000 रुपयांपर्यंत वाढले आहे. मध्यम आकाराच्या लॉकरचे शुल्क ग्रामीण भागात 2 हजार रुपयांवरून 2,500 रुपये आणि शहरी भागात 3 हजार रुपयांवरून 3,500 रुपये झाले आहे. मोठ्या लॉकरचे शुल्क ग्रामीण भागात 2,500 रुपयांवरून 3,000 रुपये करण्यात आले आहे. तर शहरी भागात ते 5 हजारांवरून 5,500 रुपयांपर्यंत वाढले.
हे वाचा-आधी होतं एक दुकान आता 400 कोटींची होते उलाढाल; वाचा Ferns N Petals ची यशोगाथा
लॉकर व्हिजिट झाली कमी
पीएनबीने लॉकर व्हिजिटची संख्या देखील कमी केली आहे. एका वर्षात तुम्ही 12 वेळा लॉकरसाठी व्हिजिट करू शकता. त्यानंतर केल्या जाणाऱ्या प्रत्येक व्हिजिटसाठी तुम्हाला प्रत्येकी 100 रुपये मोजावे लागतील. आतापर्यंत ही सेवा 15 व्हिजिटसाठी मोफत होती.
चालू खाते बंद करणं महागणार
आता पीएनबीमधील चालू खातं (Current account in PNB) उघडल्यानंतर 14 दिवसांनी आणि एका वर्षाच्या आत तुम्ही बंद केलं तर तुम्हाला 800 रुपये शुल्क द्यावे लागेल, जे की आधी 600 रुपये होतं.
याशिवाय, 1 फेब्रुवारीपासून, जर तुमच्या कोणत्याही हप्त्याचे किंवा गुंतवणुकीचे पैसे खात्यात शिल्लक नसल्यामुळे डेबिट झाले नाही तर त्यासाठी 250 रुपये भरावे लागतील. आतापर्यंत हे शुल्क 100 रुपये होते. तुम्ही डिमांड ड्राफ्ट शुल्क रद्द केल्यास, आता तुम्हाला 150 रुपये द्यावे लागतील. यासाठी ग्राहकाला केवळ 100 रुपये द्यावे लागत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pnb, Pnb bank, Saving bank account