मुंबई, 20 ऑगस्ट : मोदी सरकार चालवत असलेली प्रधानमंत्री वय वंदना योजना (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana) ही निवृत्तीनंतर पेन्शन मिळावी यासाठी विशेष योजना आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास मासिक पेन्शनची हमी मिळते. ही योजना मोदी सरकारनं 26 मे 2020 रोजी सुरू केली होती. या योजनेत 31 मार्च 2023 पर्यंत गुंतवणूक करता येईल. तुमच्या गुंतवणुकीवर निश्चित व्याज असते, ज्याच्या आधारे मासिक पेन्शन ठरवली जाते. जर पती-पत्नी दोघांची इच्छा असेल तर वयाच्या 60 नंतर ते याचा लाभ घेऊ शकतात. या योजनेद्वारे पती-पत्नी मिळून दरमहा 18500 रुपयांच्या हमी पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे 10 वर्षांनंतर तुमची संपूर्ण गुंतवणूक देखील परत केली जाईल. PMVVY योजना काय आहे? प्रधानमंत्री वय वंदना योजना ही एक सामाजिक सुरक्षा योजना आणि पेन्शन योजना आहे. ही योजना भारत सरकारने सुरू केली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे (LIC) ती चालवली जाते. प्रधानमंत्री वय वंदना योजनेंतर्गत गुंतवणूकीची कमाल मर्यादा 15 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. जर पती-पत्नी दोघांनी वयाची 60 वर्षे ओलांडली असतील, तर कोणीही स्वतंत्रपणे 15 लाखांची गुंतवणूक करू शकतात. यापूर्वी एका व्यक्तीची गुंतवणूक मर्यादा 7.5 लाख रुपये होती, जी नंतर दुप्पट करण्यात आली. या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना इतर योजनांच्या तुलनेत गुंतवणुकीवर अधिक व्याज मिळते. या योजनेत 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक मासिक किंवा वार्षिक पेन्शन योजना निवडू शकतात. 18500 रुपये पेन्शन कशी मिळेल- जर पती-पत्नी दोघांनाही या योजनेचा स्वतंत्र लाभ घ्यायचा असेल, तर दोघांनाही प्रधानमंत्री वय वंदना योजनेत 15 लाख रुपये, म्हणजेच एकूण 30 लाख रुपये गुंतवावे लागतील. या योजनेवर वार्षिक 7.40 टक्के व्याज आहे. या दरानुसार, गुंतवणुकीवर वार्षिक व्याज 222000 रुपये असेल; जर ते 12 महिन्यांत समान प्रमाणात विभागलं गेलं तर ते 18500 रुपये होईल, जे मासिक पेन्शनच्या रूपात तुम्हाला मिळेल. जर त्याच व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 15 लाख गुंतवणुकीवर वार्षिक व्याज 1,11,000 रुपये आणि मासिक पेन्शन 9,250 रुपये असेल. हेही वाचा- SBI Rules: एसबीआयच्या व्यवहारासंबंधीचे नियम बदलले? तुमच्यापर्यंत आलाय का ‘हा’ मेसेज? 10 वर्षांनंतर पूर्ण परतावा- प्रधानमंत्री वय वंदना योजना 10 वर्षांसाठी आहे. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या जमा केलेल्या पैशांवर मासिक पेन्शन मिळत राहील. तुम्ही 10 वर्षांच्या पॉलिसी टर्मपर्यंत प्लॅनमध्ये राहिल्यास, 10 वर्षांनंतर तुमची संपूर्ण गुंतवणूक परत मिळेल. योजना सुरू झाल्यानंतर, तुम्ही कधीही त्यामधून बाहेर पडू शकता. तुम्ही अशी गुंतवणूक करू शकता- तुम्ही प्रधानमंत्री वय वंदना योजनेमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकता. तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. पेन्शनचा पहिला हप्ता 1 वर्ष, 6 महिने, 3 महिने किंवा तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर एक महिन्यानंतर मिळेल. पेन्शन तुम्ही कोणता पर्याय निवडता यावर ते अवलंबून आहे. गुंतवणुकीनुसार दरमहा 1000 ते 9250 रुपये पेन्शन दिली जाते. सर्व सामान्य विमा योजनांमध्ये, मुदतीच्या विम्यावर 18 टक्के जीएसटी आकारला जातो. परंतु प्रधानमंत्री वय वंदना योजनेवर जीएसटी आकारला जात नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.