नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : कोरोनाच्या (Coronavirus)काळात देशामध्ये कॅशलेस व्यवहार (Cashless Transaction) वाढले आहेत. या दरम्यान क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर देखील वाढला आहे. दरम्यान या परिस्थितीत फसवणुकीची प्रकरणे देखील वाढली आहेत. ग्राहकांच्या खात्यातून पैसे लंपास केल्याची प्रकरणे रोज समोर येत आहेत. ग्राहकांना अचानक पैसे काढले गेल्याचा मेसेज आल्यास ते गोंधळून जातात. त्यांना काय करावे हे अशावेळी लक्षात येत नाही. इथे जाणून घ्या, तुमच्याबरोबर अशी फसवणूक झाल्यास तुम्ही कुठे तक्रार करू शकता.
बँकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा
अशाप्रकारे कोणत्याही व्यवहाराचा तुम्हाला मेसेज आला, जो व्यवहार तुम्ही केला नाही आहे तर त्वरित बँकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून सूचना द्या. त्याचप्रमाणे सर्व ट्रान्झॅक्शन ब्लॉक करा. कारण एकदा फसवणूक झाल्यावर पुन्हा हा प्रकार घडू शकतो.
(हे वाचा-2000 च्या नोटेसंदर्भात मोठी बातमी! RBI बंद करणार ही नोट? वाचा सविस्तर)
प्रत्येक बँकेने हेल्पलाइनसाठी विविध फोन नंबर जारी केले आहेत. याठिकाणी फोन करून तुम्ही व्यवहाराबाबत तक्रार करू शकता त्याचप्रमाणे कार्ड ब्लॉक करण्यासंदर्भात देखील संपर्क करू शकता.
पोलिसात दाखल करा तक्रार
बँकेशी संपर्क केल्यानंतर त्वरित पोलिसात तक्रार दाखल करा. तुमच्या बँकेच्या पासबुकची कॉपी देखील सांभाळून ठेवा. त्याचप्रमाणे बँकेच्या रेकॉर्डप्रमाणे आयडी आणि पत्त्याचा पुरावा देखील ठेवा. ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला जवळच्या पोलीस ठाण्यात जावे लागेल. शक्य असल्यास यावेळी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरची कॉपी देखील तुमच्याकडे असू द्या.
मुख्य शाखेमध्ये लेखी तक्रार द्या
यानंतर तुमच्या बँकेच्या होम ब्रँचमध्ये जाऊन यासंदर्भात तक्रार करा. याठिकाणी एक फॉर्म भरावा लागेल. सर्व माहिती घेतल्यानंतर बँकेला देखील तुमचे पैसे नेमके कसे काढण्यात आले हे शोधणे सोपे होईल. काही बँका जोपर्यंत तपास सुरू आहे, तोपर्यंत ग्राहकांच्या खात्यामध्ये जेवढे पैसे आहेत त्या रकमेचा शॅडो बॅलेन्स जनरेट करते. शॅडो बॅलेन्स अशी रक्कम असते जी तुमच्या खात्यामध्ये दिसते पण जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ती काढू शकत नाही.
(हे वाचा-जागतिक स्तरावर सोन्याचे दर पुन्हा उतरले, देशांतर्गत बाजारात 5000 रुपयांची घसरण)
तपास पू्र्ण झाल्यावर जर बँकेच्या लक्षात आले की तुमच्या खात्यातील रक्कम एटीएम किंवा हॅकिंगच्या माध्यमातून काढण्यात आली आहे तर ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये पुन्हा टाकण्यात येते.