• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • IT क्षेत्रात रोजगार कमी झाल्याचा दावा चुकीचा, 2021 मध्ये 1.38 लाख जणांना मिळाल्या नोकऱ्या- अहवाल

IT क्षेत्रात रोजगार कमी झाल्याचा दावा चुकीचा, 2021 मध्ये 1.38 लाख जणांना मिळाल्या नोकऱ्या- अहवाल

2021 या आर्थिक वर्षात एक लाख 38 हजार जणांना या क्षेत्रात नोकरी मिळाली आहे. 'दी नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज' अर्थात 'नासकॉम'ने (NASSCOM) हे स्पष्टीकरण दिलं आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 18 जून: भारतीय माहिती तंत्रज्ञान आणि बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (IT-BPM Sector) क्षेत्रात नेहमीच कुशल मनुष्यबळाला संधी दिली जात असून, 2021 या आर्थिक वर्षात एक लाख 38 हजार जणांना या क्षेत्रात नोकरी मिळाली आहे. 'दी नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज' अर्थात 'नासकॉम'ने (NASSCOM) हे स्पष्टीकरण दिलं आहे. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजने (BofA) नुकताच एक अहवाल सादर केला होता. भारतीय आयटी क्षेत्रातल्या आउटसोर्सिंग कंपन्यांमध्ये (Outsourcing) रोबॉटिक प्रोसेस ऑटोमेशनमुळे (Robotic Process Automation) जागतिक पातळीवर 2022 पर्यंत तीस लाख जणांच्या रोजगारावर गदा येईल, असा अंदाज त्या अहवालात व्यक्त करण्यात आला होता. त्या अहवालाला प्रत्युत्तर म्हणून 'नासकॉम'ने आपलं स्पष्टीकरण प्रसिद्ध केलं आहे. 'तंत्रज्ञानात क्रांती होत असून, ऑटोमेशन वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक आयटी जॉब्ज आणि रोल्समध्येही बदल होऊन रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. स्किल्ड टॅलेंट अर्थात कुशल मनुष्यबळाला (Skilled Talent) नेहमीप्रमाणेच या उद्योगात संधी मिळत राहील. 2021मध्ये 1,38,000 जणांना संधी मिळेल. या क्षेत्राने 2.5 लाख कर्मचाऱ्यांना डिजिटल कौशल्यांचं प्रशिक्षण देऊन त्यांची प्रगती घडवली आहे. तसंच 40 हजार फ्रेशर्सनाही (Freshers) संधी दिली आहे. 2025पर्यंत आयटी-बीपीएम क्षेत्र 300 ते 350 अब्ज डॉलर उलाढालीचं होणार आहे,' असं 'नासकॉम'ने स्पष्टीकरणात म्हटलं आहे. सध्या हे क्षेत्र 194 अब्ज डॉलरचं आहे. हे वाचा-सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ दवडू नका; आजच्या दरांमध्ये झाली मोठी घट, पाहा रेट गेल्या तीन वर्षांपासून ऑटोमेशनमध्ये (Automation) सुधारणा होत आहे. त्यातून बीपीएम क्षेत्रात नव्या रोजगारांची निर्मिती झाली आहे. नासकॉम-किन्सेच्या अहवालानुसार बीपीएम क्षेत्र 180 ते 220 अब्ज डॉलरपर्यंत विस्तारण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवे रोजगार आणि विकासाची संधी आहे. महामारीच्या काळात भारतीय आयटी क्षेत्राला मोठा फायदा झाला. या काळात विक्रमी करार झाले. 2020-21च्या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत टीसीएसने 9.2 अब्ज डॉलरचे करार केले. संपूर्ण आर्थिक वर्षात केलेले करार 31.5 अब्ज डॉलरचे होते. इन्फोसिसला 14 अब्ज डॉलर्सची डील्स मिळाली. विप्रोने 12 मोठ्या डील्सवर सह्या केल्या. या कंपनीच्या 2020-21च्या शेवटच्या तिमाहीतल्या काँट्रॅक्टचं मूल्य 1.4 अब्ज डॉलर एवढं होतं. हे वाचा-EPFO New Rule: तुमच्या PF वर कसं आणि किती मिळतं व्याज; असं तपासा शेकडो नव्या रोजगार संधी या क्षेत्रात उपलब्ध असून, नव्या आणि दर्जेदार, कुशल मनुष्यबळासाठी आणि असलेलं मनुष्यबळ टिकवण्यासाठी कंपन्या चांगलं वेतन देण्यासही तयार आहेत. 'मनीकंट्रोल'ने पूर्वी दिलेल्या वृत्तानुसार, आघाडीच्या आयटी फर्म्स 2021-22मध्ये लाखभर फ्रेशर्सना संधी देऊ शकतील. त्याशिवाय अनुभवी प्रोफेशनल्सची संख्या वेगळीच आहे. महामारीमुळे अनेक कंपन्यांनी डिजिटायझेशनवर भर दिला आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर सर्व्हिसेसची मागणी वाढली आहे. त्यामुळे रोजगार संधी वाढत आहेत.
Published by:Janhavi Bhatkar
First published: