मुंबई, 28 डिसेंबर : सध्या भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) अस्थिरतेचं वातावरण आहे. ओमिक्रॉनच्या (Omicron) सावटाचाही परिणाम जाणवत आहे. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात तेजी बघायला मिळाली त्याचप्रमाणे निर्देशांक गडगडल्याचंही पहायला मिळालं. मात्र या सगळ्या चढ-उतारांमध्ये काही छोट्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगला फायदा दिल्याचेही दिसून आलं. गुंतवणूकदारांना भरभरून परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये एका सरकारी कंपनीच्या शेअरचा समावेश आहे. सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी महानगर टेलिफोन निगम लिमिटेडने (एमटीएनएल-MTNL) डिसेंबर महिन्यात तब्बल 117 टक्क्यांची वाढ नोंदवत गुंतवणूकदारांना भरभक्कम नफा कमावण्याची संधी दिली आहे. मंगळवारी सलग चौथ्या दिवशी या शेअरच्या किमतीत मोठी वाढ झाली. अखेर या शेअरला अप्पर सर्किट (Upper Circuit) लागलं. हा शेअर आज 10 टक्क्यांच्या वरच्या सर्किटसह 38.95 रुपयांवर पोहोचला. जून 2014 नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे. त्यानंतर तो 39.10 रुपयांवर पोहोचला. या महिन्यात आतापर्यंत हा शेअर 117 टक्क्यांनी वधारला असून, या काळात मुंबई शेअर बाजाराचा (BSE)निर्देशांक सेन्सेक्स (Sensex)1.28 टक्क्यांनी वधारला आहे. यंदाचं वर्ष IPO नी गाजवलं, पुढील वर्षातही सज्ज; यावेळी गुंतवणुकीची संधी हुकवू नका, वाचा सविस्तर सोमवारी, दूरसंचार विभागाने (Telecom Department) 2022 मध्ये देशातील 13 शहरांमध्ये व्यावसायिक 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली. 5G सेवा दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, चंडीगड, लखनौ, अहमदाबाद, गांधीनगर आणि जामनगरमध्ये सुरू होऊ शकते. परिणामी मंगळवारी टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्सचे भाव चांगलेच वधारले. टेलिकॉम क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचं दिसून आलं. टेलिकॉम क्षेत्रातील शेअर्सची मागणी प्रचंड वाढली. त्यामुळं आज एमटीएनएल व्यतिरिक्त टीटीएमएलच्या (TTML) शेअरलाही 5 टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. व्होडाफोन आयडियाचे (Vodafone -Idea) शेअर्स 2.4 टक्क्यांनी आणि भारती एअरटेलचे (Bharati Airtel) शेअर्स जवळपास 1 टक्क्याने वधारले, तर रिलायन्स जिओची (Reliance Jio) प्रवर्तक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 0.5 टक्क्यांनी वाढले. अगदी कमी किंमतीतील या शेअर्सच्या किमतीत चांगली वाढ झाल्यानं गुंतवणूकदारांचा चांगलाच फायदा झाला आहे. Income Tax ची तुमच्यावर नजर, रोखीने केले असतील ‘हे’ व्यवहार तर येईल नोटीस; वाचा नियम शेअर बाजारातील चढ-उतार सुरू राहतात. सरकारने घेतलेल्या निर्णयांचा शेअर बाजारातील किमतींवर परिणाम होतो.पण कायमच तसं होत नाही. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना कायमच विचारपूर्वक व अभ्यास करून ती केली पाहिजे. आता 5G नेटवर्कला परवानगी मिळाली तर व्यवहार अधिक फास्ट आणि सुकर होतील त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांचा व्यवसाय वाढेल परिणामी त्यांच्या शेअर्सनाही तेजी येऊ शकते. अर्थात नेटवर्क सुरू होईपर्यंत वाट मात्र पहायला हवी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







