मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पतीच्या मृत्यूचा धक्का अन् 7000 कोटींचं कर्ज; मालविका हेगडेंनी CCD कंपनीला आणले अच्छे दिन!

पतीच्या मृत्यूचा धक्का अन् 7000 कोटींचं कर्ज; मालविका हेगडेंनी CCD कंपनीला आणले अच्छे दिन!

मालविका हेगडेंनी कर्जात बुडालेल्या CCTV कंपनीला कसं आणलं बाहेर, वाचा सविस्तर...

मालविका हेगडेंनी कर्जात बुडालेल्या CCTV कंपनीला कसं आणलं बाहेर, वाचा सविस्तर...

मालविका हेगडेंनी कर्जात बुडालेल्या CCTV कंपनीला कसं आणलं बाहेर, वाचा सविस्तर...

नवी दिल्ली, 14 जानेवारी : देशात 90च्या दशकात कॉफी कल्चर चांगलंच रुजायला लागलं होतं. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये खास कॉफी शॉप्स (Coffee shops) सुरू होऊ लागली होती. यात एक नाव अल्पावधीतच लोकांच्या ओठांवर रुळलं ते म्हणजे सीसीडी (CCD) अर्थात कॅफे कॉफी डे (Cafe Coffee Day)! कॅफे कॉफी डेच्या शानदार आउटलेट्समध्ये जाऊन मित्र-मैत्रिणींसोबत निवांतपणे कॉफी पिण्याचं प्रस्थ तरुणाईत चांगलंच रुजलं आणि या कॉफी शॉपची साखळी देशभर वाढत गेली.

कंपनीची भरभराट होत असताना अचानक एके दिवशी कंपनीचे संस्थापक आणि सीईओ व्हीजी सिद्धार्थ (VG Siddharth) यांनी आत्महत्या (Suicide) केल्याची बातमी आली आणि कॅफे कॉफी डेचं (Cafe Coffee Day) धक्कादायक वास्तव जगासमोर आलं. तब्बल 7000 कोटी रुपयांच्या कर्जाचं ओझं कंपनीवर असल्याचं स्पष्ट झालं. अशा परिस्थितीत कंपनी बंद पडणार असं वाटत असतानाच सिद्धार्थ यांच्या पत्नी मालविका हेगडे पुढे आल्या आणि त्यांनी या बुडत्या कंपनीची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली. जाणून आश्चर्य वाटेल, पण त्यांनी आपल्या हिमतीच्या आणि जिद्दीच्या बळावर कंपनीचा गाडा सावरला असून, दोन वर्षांत कंपनीची आर्थिक घडी सुस्थितीत आणली आहे. 'टीव्ही9'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

देशात वाढत असलेल्या कॉफी संस्कृतीचा वेध घेऊन 1996 मध्ये कर्नाटकचे (Karnatak) रहिवासी असलेल्या व्हीजी सिद्धार्थ यांनी कॅफे कॉफी डेच्या (Cafe Coffee Day) कॉफी शॉप्सच्या साखळीची सुरुवात केली होती. बघता बघता देशभरात सर्वत्र कॅफे कॉफी डे लोकप्रिय झालं आणि लहान मोठ्या शहरात कॅफे कॉफी डेची आउटलेट्स सुरू झाली. दोन दशकांत कंपनीने देशातला सर्वांत मोठा कॉफी सर्व्हिंग ब्रँड म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. दिल्ली, मुंबई, चंडीगडसह देशातल्या 100 हून अधिक शहरांमध्ये कॅफे, हजारो कॉफी व्हेंडिंग मशीन्स असणाऱ्या या कंपनीत जवळपास 25 हजार कर्मचारी काम करत होते; मात्र दुर्दैवानं कंपनीची पडझड सुरू झाली आणि ती कर्जाच्या ओझ्याखाली (Loan) बुडाली. कर्जाच्या ओझ्यामुळं निराश झालेल्या व्हीजी सिद्धार्थ यांनी 29 जुलै 2019 रोजी आत्महत्या केली. फायदेशीर व्यवसाय मॉडेल तयार करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल माफी मागणारी त्यांची सुसाइड नोट प्रसिद्ध झाली. सीसीडीसारख्या मोठ्या कंपनीच्या मालकाला व्यवसायातला तोटा आणि कर्जामुळे आत्महत्या करावी लागली हा भारतीय उद्योगासाठी मोठा धक्का होता.

(हे ही वाचा-कर्जात बुडालीय कंपनी; पण 2 वर्षांत शेअर्स 12,800 टक्क्यांनी वाढले)

सिद्धार्थ यांच्या निधनामुळे कंपनी आता बंद पडणार अशी भीती निर्माण झाली होती. हजारो कर्मचाऱ्यांचं काय होणार असा प्रश्न पडला होता; पण या सर्वांच्या मागे उभ्या राहिल्या त्या मालविका हेगडे. स्वतःचा हसता-खेळता संसार उद्ध्वस्त झालेला असताना, कंपनीवर कोट्यवधींचं कर्ज असताना सीसीडीला यशस्वी बिझनेस मॉडेल बनवण्याचं पतीचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करून मालविका पुढे आल्या आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. मालविका हेगडे या कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या कन्या (Daughter of SM Krishna) आहेत. बेंगळुरू विद्यापीठातून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या मालविका यांचं 1991 मध्ये व्हीजी सिद्धार्थ यांच्याशी लग्न झालं होतं. त्या CDELच्या नॉन-बोर्ड सदस्या होत्या; पण व्यवसायात त्यांचा सक्रिय सहभाग नव्हता. सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांनी व्यवसायात लक्ष घातलं आणि आपल्या जिद्दीची, कार्यक्षमतेची चमक दाखवून कंपनी गाळातून बाहेर काढली.

31 मार्च 2019 पर्यंत, कॅफे कॉफी डेवर सुमारे 7000 कोटी रुपयांचं कर्ज होते. डिसेंबर 2020 मध्ये, मालविका हेगडे कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडच्या सीईओ बनल्या. सीईओ (CEO) झाल्यानंतर मालविका यांनी सर्वांत प्रथम कंपनीच्या 25 हजार कर्मचाऱ्यांना पत्र लिहून त्यांना कंपनी चांगल्या स्थितीत आणण्यासाठी एकत्र काम करण्याचं आवाहन केलं. कर्मचार्‍यांमध्ये त्यांनी विश्वास निर्माण केला. त्यामुळे कंपनी टिकून राहण्यात यश आलं. दोनच वर्षांत त्यांनी कंपनीचं कर्ज मोठ्या प्रमाणात उतरवलं. मार्च 2021पर्यंत कंपनीवर फक्त 1779 कोटींचं कर्ज उरलं होतं. हे मालविका यांच्या समर्पणाचं आणि परिश्रमाचं फळ आहे. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्या भारतीय उद्योग क्षेत्रात कौतुकाचा विषय ठरल्या आहेत.

(वेळीच सावध व्हा! या 5 App ने उडवली झोप; सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक बाब)

आज सीसीडी हा भारतीय संस्कृतीचा भाग बनला असून, दिल्ली, मुंबई, चंडीगडसह देशातल्या 165 शहरांमध्ये 572 कॅफे, 333 किऑस्क आणि 36,326 व्हेंडिंग मशीन्ससह देशातला सर्वांत मोठा कॉफी सर्व्हिंग ब्रँड आहे. कंपनीची आर्थिक स्थिती बरीच सुधारली असून, कोरोनाकाळ संपल्यानंतर आगामी काळात आणखी सुधारणा होईल असा दावा केला जात आहे. सर्व कर्ज फेडून CCD ला अब्जावधी डॉलर्सची कंपनी बनवण्याचं आणि कॅफे कॉफी डे देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं मालविका यांचं स्वप्न आहे. दोन वर्षांतली त्यांची कामगिरी बघता ते नक्कीच साध्य होईल, यात शंका नाही. निर्धारानं उभी राहिलेली स्त्री काय चमत्कार घडवू शकते याचं हे उत्तम उदाहरण असून, सीसीडीची यशोगाथा नव्यानं लिहिणाऱ्या मालविका हेगडे या नक्कीच अनेकांसाठी प्रेरणा आहेत.

First published:

Tags: Business News, Coffee