मुंबई, 24 डिसेंबर: प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजांनुसार आर्थिक नियोजन करत असते. बचत आणि गुंतवणूक (Savings and Investment) हा याच नियोजनातला महत्त्वाचा घटक असतो. आजच्या काळात बचतीला आणि गुंतवणुकीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. यासाठी अनेक पर्यायदेखील उपलब्ध आहेत. भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीच्या (LIC) विविध योजना सुरक्षित आणि खात्रीशीर समजल्या जातात. एलआयसीची अशीच एक योजना विशेष लोकप्रिय आहे. या योजनेत तुम्हाला कमीत कमी गुंतवणुकीतून चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. या विमा योजनेतून सुरक्षा (Security) आणि बचत (Savings) असे दोन्ही हेतू साध्य होतात. एका रुपयाच्या गुंतवणुकीतूनही तुम्ही मोठा फायदा मिळवू शकता.
एलआयसीच्या जीवन शिरोमणी योजनेच्या (LIC Jeevan Shiromani Scheme) माध्यमातून तुम्ही चांगला फायदा मिळवू शकता. एलआयसी जीवन शिरोमणी योजना 19 डिसेंबर 2017 रोजी सुरू झाली. ही एक नॉन लिंक्ड, मर्यादित प्रीमियम पेमेंट मनी बॅक योजना आहे. या योजनेतून गंभीर आजारांसाठीदेखील विमा सुरक्षा मिळते. तसंच ही मार्केट लिंक्ड प्रॉफिट स्कीम (Market Linked Profit Scheme) आहे. हाय नेट वर्थ असलेल्या ग्राहकांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.
हे वाचा-ऑनलाइन जेवण मागवण्याबाबत महत्त्वाचे अपडेट, सरकार आकारणार 5% GST
या पॉलिसीच्या मुदतीदरम्यान ग्राहक पॉलिसीच्या सरेंडर मूल्यावर आधारित कर्ज (Loan) घेऊ शकतो. परंतु, यासाठी एलआयसीनं काही नियम आणि अटी निश्चित केल्या आहेत. हे कर्ज वेळोवेळी ठरवल्या जाणाऱ्या व्याजदरावर उपलब्ध असेल.
एलआयसी आपल्या ग्राहकांना त्यांचं जीवन सुरक्षित करण्यासाठी अनेक चांगल्या विमा योजना उपलब्ध करून देत असते. त्यापैकी एलआयसीची जीवन शिरोमणी विमा योजना एक नॉन लिंक्ड प्लॅन आहे. यामध्ये संबंधित विमाधारकाला किमान 1 कोटी रुपयांची हमी मिळते. याचा अर्थ या पॉलिसीचा किमान रिटर्न 1 कोटी रुपये आहे. तुम्ही 14 वर्षांच्या कालावधीसाठी एक रुपया जमा केला, तर तुम्हाला एकूण 1 कोटींपर्यंत परतावा मिळेल. हप्त्याविषयीच्या अधिक माहितीसाठी अधिकृत एलआयसी एजंटशी संपर्क साधावा किंवा वेबसाइटवर माहिती पाहावी.
जीवन शिरोमणी प्लॅन पॉलिसी कालावधीदरम्यान विमाधारकाच्या कुटुंबाला डेथ बेनिफिटच्या (Death Benefit) स्वरूपात आर्थिक साह्य मिळतं. पॉलिसी मॅच्युरिटीवेळी एकरकमी परतावा विमाधारकाला मिळतो.
हे वाचा-9 महिन्यात दिला 5000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?
पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर विमाधारक जीवित असल्यास त्याला निश्चित रक्कम दिली जाते. त्यानुसार, 14 वर्षांच्या पॉलिसीसाठी 10 व्या आणि 12 व्या वर्षी विमा रकमेच्या 30-30 टक्के, 16 वर्षांच्या पॉलिसीसाठी 12 व्या आणि 14 व्या वर्षी विमा रकमेच्या 35-35 टक्के, 18 वर्षांच्या पॉलिसीसाठी 14 व्या आणि 16 व्या वर्षी विमा रकमेच्या 40-40 टक्के, 20 वर्षांच्या पॉलिसीसाठी 16 व्या आणि 18 व्या वर्षी विमा रकमेच्या 45-45 टक्के रक्कम विमाधारकाला मिळते.
जीवन शिरोमणी प्लॅन पॉलिसीसाठी एलआयसीनं काही नियम आणि अटी निश्चित केल्या आहेत. त्यात किमान विमा रक्कम 1 कोटी रुपये असेल. कमाल विमा रकमेला कोणतीही मर्यादा नाही. (मूळ विमा रक्कम 5 लाखांच्या पटीत असेल.) पॉलिसीचा कालावधी 14, 16, 18 वर्षे किंवा 20 वर्षांचा असेल. प्रीमियम भरावा लागण्याचा कालावधी 4 वर्षं असेल. पॉलिसी प्रवेशासाठी ग्राहकाचं किमान वय 18 वर्षं असावं. पॉलिसी प्रवेशासाठी ग्राहकाचं कमाल वय हे कालवाधीनिहाय निश्चित करण्यात आलं आहे. त्यात 14 वर्षाच्या पॉलिसीसाठी कमाल वयोमर्यादा 55 वर्षं, 16 वर्षांच्या पॉलिसीसाठी कमाल वयोमर्यादा 51 वर्षं, 18 वर्षांच्या पॉलिसीसाठी कमाल वयोमर्यादा 48 वर्षं आणि 20 वर्षांच्या पॉलिसीसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षं असावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.