नवी दिल्ली, 31 मार्च : कोरोना व्हायरसमुळे देशाची अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे. भारतातील सामान्य नागरिकांना याचा फटका बसू नये याकरता RBI कडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. आरबीआयने EMI वर 3 महिन्यांची सवलत दिली आहे. त्याचप्रमाणे आरबीआयकडून माहिती देण्यात आली होती की, क्रेडिट कार्डची थकबाकी भरण्यास सुद्धा 3 महिन्यांची सूट देण्यात यावी. याआधी हा निर्णय त्या त्या बँकांवर अवलंबून होता. मात्र आरबीआयने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे, की क्रेडिट कार्डच्या थकबाकीवर बँका 3 महिन्याची सूट देऊ शकतात.
(हे वाचा-कोरोनाचा मोठा दुष्परिणाम! 1.10 कोटी लोक गरिबीच्या दिशेने, जागतिक बँकेचा इशारा)
यामध्ये सर्व वाणिज्य बँका- Commercial Banks (प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँक आणि स्थानिक क्षेत्रातील बँकांसह), सहकारी बँका, अखिल भारतीय वित्तीय संस्था आणि एनबीएफसी (गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि मायक्रो-फायनान्स संस्थांसह) समाविष्ट आहेत. आरबीआयने सर्व टर्म लोनवर 3 महिन्यांचा मोरोटोरियम लागू केला आहे. यामुळे बँका त्यांच्या ग्राहकांना 3 महिन्याचा ईएमआय न भरण्याची मुभा देऊ शकतात आणि यामुळे त्यांचा क्रेडिट स्कोर देखील खराब होणार नाही.
(हे वाचा-कोरोना लॉकडाऊन-या 3 महिन्यात वीजबिल भरण्यास विलंब झाला तरी नाही भरावा लागणार दंड)
दरम्यान आरबीआयने जरी सांगितले असलं की, क्रेडिट कार्डचे बिल 3 महिन्यांनी दिलं जाऊ शकतं, तरीही आरबीआयने यासंदर्भात स्पष्टीकरण नाही दिलं आहे की, व्याज द्यावं लागणार नाही. त्यामुळे 3 महिन्यांनंतर पेमेंट करताना 36 ते 42 टक्के व्याज भरावं लागेल. त्यामुळे जर तुमच्याकडे आज पैशांची उपलब्धता असेल, तर वेळेतच क्रेडिट कार्ड बिल भरा.