नवी दिल्ली, 20 मे: नोकरदार मंडळींकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात; पण जेव्हा आपल्याकडच्या उपलब्ध निधीवर अधिक रिटर्न्स/परतावा हवा असतो, तेव्हा स्वैच्छिक भविष्यनिर्वाह निधी अर्थात Voluntary Provident Fund (VPF) हा पर्याय उत्तम ठरू शकतो. भारत सरकारकडून प्रॉव्हिडंट फंड्सची सुविधा दिली जाते, जेणेकरून दीर्घ काळ गुंतवणूक करून आपल्या निवृत्तीपश्चात जीवनासाठी मोठा निधी उभा करता येऊ शकेल. त्यापैकीच एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंड. त्यात गुंतवणूक करून चांगलं व्याज मिळवता येऊ शकतं. या प्रॉव्हिडंट फंडाचा मुख्य उद्देश असतो, तो म्हणजे लोकांना वृद्धावस्थेतल्या गरजांकरिता आवश्यक पैसे उभे करता यावेत. याला व्हॉलंटरी रिटायरमेंट फंड असंही म्हणतात.
VPF काय आहे?
Voluntary Provident Fund म्हणजे खरं तर Employee Provident Fund च (EPF) असतो. पण याचं वेगळेपण म्हणजे 'ईपीएफ'व्यतिरिक्त यात कर्मचाऱ्याला आपल्या रिटायरमेंट फंडसाठी अधिक रकमेचं योगदान करण्याची परवानगी दिली जाते. 'व्हीपीएफ'मध्ये व्याजदर 'ईपीएफ'प्रमाणेच असतो. चालू आर्थिक वर्षासाठी 'ईपीएफ'च्या व्याजदरात कोणताही बदल न करता तो 8.5 टक्क्यांवर कायम राखण्यात आला आहे. हा व्याजदर छोट्या बचत योजनांवर (Small Savings Scheme) दिल्या जाणाऱ्या व्याजाच्या तुलनेत खूप अधिक आहे. छोट्या बचत योजनांमध्ये बँक एफडी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट, पीपीएफ, प्रधानमंत्री वय वंदन योजना आदींचा समावेश होतो.
हे वाचा-शेतकऱ्यांसाठी कमाईची सुवर्णसंधी, मोदी सरकार या योजनेसह देतंय महत्त्वाच्या सुविधा
मिळते सरकारी गॅरंटी
या सगळ्या योजनांमध्ये दिल्या जाणाऱ्या व्याजदराच्या तुलनेत 'व्हीपीएफ'वरच्या गुंतवणुकीवर दिला जाणारा व्याजदर खूप जास्त आहे. शिवाय या योजनेतल्या गुंतवणुकीला सरकारी हमीही मिळते. म्हणूनच 'व्हीपीएफ'मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला अर्थतज्ज्ञांकडून दिला जातो.
'व्हीपीएफ'मध्ये करण्यात आलेल्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर अधिनियम '80 सी'अंतर्गत करसवलतही मिळते. या गुंतवणुकीवर मिळालेल्या व्याजावरही कर द्यावा लागत नाही. किमान पाच वर्षं गुंतवणूक ठेवली आणि पाच वर्षांनी मॅच्युरिटीनंतर पैसे काढले, तरीही त्यावर कर द्यावा लागत नाही. यंदाच्या (2021) बजेटमध्ये केलेल्या नव्या तरतुदीनुसार 'व्हीपीएफ'मध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास त्याच्या व्याजावर कर द्यावा लागतो.
हे वाचा-गुंतवणुकीसाठी नेहमीच्या पर्यायांपेक्षा या 6 ठिकाणी लावा पैसा, होऊ शकता मालामाल!
छोट्या बचत योजनांचे व्याजदर दर तिमाहीला बदलतात. एक जुलैपासून सुरू होणार असलेल्या तिमाहीत हे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. ते व्याजदर पाहिले, की व्हीपीएफचा व्याजदर किती जास्त आहे, हे लक्षात येईल.
सध्याचे व्याजदर
सुकन्या समृद्धी योजना - 7.6 %
ज्येष्ठ नागरिक बचत योजना - 7.4 %
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड - 7.1 %
किसान विकास पत्र - 6.9 %
नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट - 6.8 %
मासिक प्राप्ती खातं - 6.6 %
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.