नवी दिल्ली, 30 जून: सध्या खाद्यतेलांच्या (Edible Oils), तसंच वाहनांच्या इंधनांच्या (Fuel) दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे महागाई वाढली आहे आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पामतेलाच्या (Palm Oil) आयातीवरच्या (Import) सीमाशुल्कात (Customs Duty) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजारातल्या खाद्यतेलांच्या किरकोळ विक्रीच्या (Retail) किमतींमध्येही घट होणार आहे. 29 जून रोजी ‘सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स’ने (CBIC) याबद्दलची अधिसूचना प्रकाशित केली आहे. ‘CBIC’ ने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. या नव्या निर्णयानुसार क्रूड (Crude Palm Oil) अर्थात कच्च्या पामतेलावरची कस्टम्स ड्युटी (सीमाशुल्क) 35.75 टक्क्यांवरून घटवून 30.25 टक्क्यांवर आणण्यात आली आहे. तसंच, रिफाइन्ड पामतेलावरचं (Refined Palm Oil) सीमाशुल्क 49.5 टक्क्यांवरून 41.25 टक्क्यांवर आणण्यात आलं आहे. हे बदल आजपासून (30 जून) लागू होणार असून, ते 30 सप्टेंबरपर्यंत लागू असतील, असं CBIC ने जाहीर केलं आहे. या निर्णयामुळे किरकोळ बाजारातल्या खाद्यतेलांच्या किमती घटणार आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, तसंच शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण झाल्याचं मत या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
To give relief to people, the Government has reduced customs duty on crude palm oil from 35.75% to 30.25% and refined palm oil from 49.5% to 41.25%. This will bring down the retail prices of edible oils in the market.@nsitharaman @ianuragthakur @FinMinIndia @PIB_India
— CBIC (@cbic_india) June 29, 2021
आत्ता वाढलेल्या महागाईतून (Inflation) दिलासा मिळण्यासाठी मध्यमवर्ग आणि गरिबांना या निर्णयाचा लाभ होईल. तसंच ऑक्टोबरपासून पुन्हा सीमाशुल्कात वाढ होईल, तेव्हा देशांतर्गत उत्पादित तेलाला मागणी वाढून देशातल्या शेतकऱ्यांना लाभ होऊ शकेल. आयात शुल्कात कपात करून फारसा काही फरक पडणार नाही, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. हे वाचा- उद्यापासून बदलणार बँकिंग, टॅक्ससंदर्भातील हे नियम; जाणून घ्या काय आहेत हे बदल जगभरात खाद्यतेलाची सर्वाधिक आयात करणारा देश अशी भारताची ओळख आहे. देशाच्या खाद्यतेलाच्या गरजेपैकी दोन-तृतीयांश गरज आयातीच्या माध्यमातूनच भागवली जाते. गेल्या वर्षभरात खाद्यतेलांच्या देशांतर्गत बाजारपेठेतल्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. मे 2020मध्ये भारताने 4 लाख 506 टन पाम ऑइल आयात केलं होतं. मे 2021पर्यंत क्रूड पाम ऑइलच्या आयातीत 48 टक्के वाढ होऊन ती 7,69,602 टन एवढी झाली. मे 2021मध्ये भारताची खाद्यतेलांची एकूण आयात 60 टक्क्यांनी वाढून 12.49 लाख टनांवर पोहोचली. मे 2020मध्ये ही आयात 7.43 लाख टन एवढी होती. एकूण खाद्यतेलांच्या आयातीत पाम ऑइलचं प्रमाण 60 टक्क्यांहून जास्त आहे. हे वाचा- PM Kisan: तुमच्या खात्यातही येतील 4000 रुपये, आजच पूर्ण करा हे महत्त्वाचं काम जून महिन्यातच केंद्र सरकारने खाद्यतेलांच्या टॅरिफवर 112 डॉलरची कपात केली होती. त्यामुळे खाद्यतेलांच्या किरकोळ बाजारातल्या किमती घटतील, असं अनुमान होतं; मात्र त्याचा फारसा परिणाम दिसला नाही. म्हणून आता कस्टम्स ड्युटीत कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.