नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर: देशातील सर्व बँका लोन मोरेटोरियम (Loan Moratorium) योजनेचा फायदा घेणाऱ्या कर्जदारांकडून घेतेलेले व्याजावरील व्याज परत करण्यास सुरुवात करत आहेत. बँका आणि वित्तीय संस्थांकडून 2 कोटी पर्यंतचे कर्ज घेणारे वैयक्तिक कर्जदार ते छोटे व्यापारी सर्वांना कॅशबॅक देण्यास सुरूवात होत आहे. बँकांकडून अशा कर्जदारांना देखील रिफंड मिळत आहे, ज्यांनी लोन मोरेटोरियम योजनेसाठी अप्लाय केले नव्हते.
कोरोनाचे संकट पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या आठवड्यात देशातील सर्व बँका आणि वित्तीय संस्चांना असे सांगितले होते की, 2 कोटींपर्यंतचे कर्ज घेणारे कर्जदार आणि कोरोना काळातही कर्जाचा ईएमआय भरणारे कर्जदार यांनी कॅशबॅक देण्यात यावा. बँकांना 5 नोव्हेंबरपासून ही योजना लागू करण्यास सांगितले होते. कोरोना काळात आरबीआयने 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लोन किंवा क्रेडिट कार्ड थकबाकीचा मासिक हप्ता न देण्याची सूट देण्यात आली होती.
(हे वाचा-कोट्यवधी कर्जदारांना आज मिळणार दिलासा? सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी)
सुप्रीम कोर्टाने दखल घेतल्यानंत केंद्र सरकारने लोन मोरेटोरियम कालावधी दरम्यान कर्जदारांवर लावण्यात आलेल्या चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याज यामधील फरकाइतकी रक्कम कर्जदारांना परत करण्यास मंजूरी दिली आहे. यानंतर केंद्रीय बँकेने सर्व बँका आणि नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपन्यांना 5 नोव्हेंबरपासून व्याजमाफी योजना लागू करण्यास सांगितले होते, सर्व कर्जदात्यांनी ही योजना 4 नोव्हेंबरपासून लागू केली आहे. ही योजना आठ प्रकारच्या कर्जावर लागू होईल. यामध्ये एमएसएमई कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, कंझ्यूमर ड्यूरेबल्स लोन, क्रेडिट कार्ड पेमेंट, ऑटोमोबाइल लोन, वैयक्तिक कर्ज आणि कंझम्प्शन लोन समाविष्ट आहे.
सरकारी तिजोरीवर 7000 कोटींचा भार
व्याजमाफी योजनेचा फायदा अशा लोकांना मिळेल ज्यांनी 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत कधी डिफॉल्ट केले नाही आहे. अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार ही सुविधा 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 पर्यंतच्या लोन मोरेटोरियमवरच मिळेल. यामुळे सरकारी तिजोरीवर 7000 कोटींचा भार पडणार आहे.
(हे वाचा-दिवाळीला खरेदी करू शकता सोन्याचे दागिने! हे प्रसिद्ध ज्वेलर्स देत आहेत खास ऑफर्स)
सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की, 'जर एखाद्या कर्जदाराने मोरेटोरियमचा फायदा घेतला नाही आहे आणि कर्जाचा हप्ता वेळेत भरला आहे, तरी त्याला बँकेकडून कॅशबॅक मिळेल. या स्कीमअंतर्गत या कर्जदारांना सहा महिन्यांचे साधारण व्याज आणि चक्रवाढ व्याज (Simple Interest and Compound Interest) च्या फरकाइतकी रक्कम कॅशबॅक मिळेल.'