नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : शनिवारी संपूर्ण भारताने 74 वा स्वातंत्र्य दिवस (74th Independence Day) साजरा केला. या वर्षांमध्ये भारतामध्ये जवळपास सर्वच गोष्टींमध्ये बदलाव झाला आहे. मात्र त्या काळात जे महत्त्व सोन्याला होते, ते आजही आहे. भारतीयांकडून सोनेखरेदी आजही मोठ्या प्रमाणात केले जाते. राजकीय, आर्थिक संकटांच्या काळामध्ये सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. अशा प्रसंगांमध्ये गुंतवणूक करताना भारतीयांची पहिली पसंती सोनेच असते. मात्र सोन्याच्या बाबतीतही एक गोष्ट आज बदलली आहे ती म्हणजे सोन्याचे भाव! 1947 या वर्षाच्या तुलनेत भारतात आज सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या किंमती आज त्या काळापेक्षा 600 पटींनी वाढल्या आहेत.
सोन्याच्या 15 ऑगस्ट 1947 रोजी असणाऱ्या किंमतीची तुलना करायची झाल्यास आज जेवढे पैसे तुम्हाला दीड लीटर दुधासाठी द्यावे लागतात, तेवढी त्यावेळी सोन्याची किंमत होती. 1947 मध्ये सोन्याचे भाव प्रति तोळा 88.62 रुपये इतके होते. याबाबतचे वृत्त झी न्यूजने दिले आहे.
(हे वाचा-Airtel, Vodafone-Idea ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता हे प्लॅन्स महागणार)
मात्र त्या काळाच्या दृष्टीने ही किंमत देखील जास्तच होती. कारण 1947 मध्ये सामान्य माणसांचे वार्षिक उत्पन्न साधारण 250 रुपये असायचे. आताच्या उत्पन्नामध्ये जमिन आसमानाचा फरक आहे.
आज का वाढत आहेत सोन्याच्या किंमती?
सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. जगभरातील शेअर बाजारांमध्ये होणाऱ्या बदलावांचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर देखील होतो. डॉलरच्या तुलनेत घसरणारे रुपयाचे मुल्य देखील सोन्याच्या किंमतीवर परिणाम करते. कोरोनाच्या संकटकाळात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. सोन्याचांदीच्या किंमतींनी या कालावधीमध्ये रेकॉर्ड रचला होता. मात्र येणाऱ्या काळात या किंमती उतरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोन्याचे नवे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती उतरल्या असल्या तरी देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव (Gold Price Today) वाढले आहेत. अमेरिेकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य घसरल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे. शुक्रवारी सोन्याचे दर प्रति तोळा 730 रुपयांनी वाढले आहेत.
(हे वाचा-आता जुने सोने आणि दागिने विकताना द्यावा लागणार GST? वाचा सविस्तर)
शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारामध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या अर्थात 24 कॅरेट सोन्याचे दर 52,961 रुपये प्रति तोळावरून वाढून 53,691 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. यावेळी सोन्याच्या किंमतीमध्ये 730 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर मुंबईमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत 52,956 रुपये प्रति तोळा आहे.