लॉकडाऊनमध्ये 2000 पेक्षा जास्त रुपयांनी वाढले सोन्याचे भाव, जाणून घ्या भविष्यात काय राहणार किंमत

लॉकडाऊनमध्ये 2000 पेक्षा जास्त रुपयांनी वाढले सोन्याचे भाव, जाणून घ्या भविष्यात काय राहणार किंमत

25 मार्च ते 17 एप्रिलपर्यंत सोन्याच्या किंमती प्रति तोळा 2289 रुपयांनी वाढल्या आहेत तर चांदीची किंमत प्रति किलो 1370 रुपयांनी वाढली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 एप्रिल : भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. सध्या देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. मात्र देशाची आर्थिक घडी सुरळीत ठेवण्यासाठी काही क्षेत्रांमध्ये 20 एप्रिलपासून काम सुरू करण्यात येणार आहे. या लॉकडाऊन दरम्यान बुलियन आणि वायदे बाजारात सोन्याने रोज नवे रेकॉर्ड रचले आहेत. सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 25 मार्च ते 17 एप्रिलपर्यंत सोन्याच्या किंमती प्रति तोळा 2289 रुपयांनी वाढल्या आहेत तर चांदीची किंमत प्रति किलो 1370 रुपयांनी वाढली आहे.

(हे वाचा-कोरोनामुळे ही मोठी कंपनी 2025पर्यंत वर्क फ्रॉम होम सुरू ठेवण्याच्या विचारात)

देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे देशातील सोन्याच्या बाजारपेठा बंद आहेत. दिल्लीतील सराफा बाजारही यावेळी बंद आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा मोठा परिणाम सोने व्यापारावर होत आहे. सध्या लग्नसमारंभ किंवा इतर सोहळे रद्द झाल्यामुळे सोन्याची मागणी देखील कमी झाली आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात सामान्यांना वगळल्यास केंद्रीय बँका, फंड मॅनेजर्स, स्वतंत्र गुंतवणूकदार जगभरातील विविध एक्सचेंजवर सोन्याची खरेदी करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे भारतातही गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे.

(हे वाचा-Lockdown 2.0-देशातील 45 टक्के अर्थव्यवस्था 20 एप्रिलपासून होणार रिस्टार्ट)

25 मार्चला बुलियन मार्केटमध्ये गोल्ड 999 ची किंमत प्रति तोळा 43424 रुपये इतकी होती तर चांदीची किंमत प्रति किलो 40900 रुपये इतकी होती. 9 एप्रिलला सोन्याने प्रति तोळा 45201 रुपये किंमत गाठत नवा रेकॉर्ड रचला. त्यानंतर 13 एप्रिलला प्रति तोळा 46 हजारांपेक्षा जास्त किंमतीवर सोनं होतं. 16 एप्रिलला सोन्याने आणखी एक रेकॉर्ड मोडला. 16 एप्रिलला सोन्याच्या किंमती प्रति तोळा 46928 रुपयांवर होत्या. दरम्यान 17 एप्रिलला सोन्याच्या किंमती काहीशा उतरल्याचे पाहायला मिळाले.

50 हजारांवर जाणार सोनं

हिंदुस्तान.com ने दिलेल्या वृत्तानुसार केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया यांचं म्हणणं असं आहे की, सोनं 50 हजारांपेक्षा जास्त दराने विकलं जाऊ शकेल. सराफा बाजार सुरू झाल्यानंतर साधारण याच दरात सोनं उपलबध होईल असं केडिया यांचं म्हणणं आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: April 19, 2020, 11:07 AM IST

ताज्या बातम्या