नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : जगभरात वाढती महागाई आणि शेअर बाजारातील अनिश्चिततेमुळे सोनेची झळाळी पुन्हा वाढू लागली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोनं 50,400 रुपयांवर गेलं आहे. हा दर मागील एक वर्षाहून अधिक काळातील सर्वोच्च आहे. एक्सचेंजनुसार, सोन्याचा वायदे भाव जानेवारी 2021 नंतर सर्वाधिक झाला. आंतरराष्ट्रीय कमॉडिटी एक्सचेंजवरही सोनं 1,900 डॉलर प्रति औंस किमतीवर पोहोचलं. मागील वर्षी जून 2021 मध्ये हा दर होता. 2022 मध्ये आतापर्यंत सोनं 3.6 टक्के महागलं आहे. ही वाढ 2020 नंतरची सर्वाधिक वाढ आहे. त्यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनं रेकॉर्ड 2,100 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचलं होतं. सोनं महाग होण्यामागे आहेत ही दोन मोठी कारणं - - पहिलं कारण जगभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढते आहे. भारतात किरकोळ महागाईचा दर 6 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. तर अमेरिकेत हा किरकोळ महागाईचा दर 40 वर्षांच्या रेकॉर्ड स्तरावर आहे. - रशिया आणि युक्रेन दरम्यान मोठा तणाव आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणाव इतका वाढला आहे, की आता युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो असा इशाराही अमेरिकेने दिला आहे.
हे वाचा - महागाईला लागणार लगाम! अन्नधान्य, तेलबिया आणि कडधान्यांचे होणार विक्रमी उत्पादन
काय आहे जाणकारांचा अंदाज - जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढत असल्याचा परिणाम भारतीय सराफा बाजारातही पाहायला मिळेल. लवकरचं स्पॉट किमती 50 हजारांचा टप्पा ओलांडू शकतात. जागतिक बाजारपेठेत सोन्याची अंदाजे किंमत 1920 डॉलर ते 1930 डॉलर दरम्यान असू शकते. जोखिम वाढल्यास हा दर 1,970 प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो. त्याचा परिणाम भारतीय बाजारातही दिसू शकतो.
हे वाचा - विमान प्रवास महागण्याची शक्यता, Aviation Turbine Fuel चे दर पुन्हा वाढले
अमेरिकेसह जगभरात वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. कमोडिटी एक्सपर्ट आणि केडिया अॅडव्हायझरीचे डायरेक्टर अजय केडिया सांगतात, की महागाईचा धोका जसजसा वाढेल तसतसा सोन्याच्या किमतीवरही परिणाम होईल. महागाईचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होतो. त्यामुळे येत्या काळात सोन्याचे भाव वाढतील अशी शक्यता आहे.