नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : कोरोना (Corona)संकटाच्या काळात सोन्यात (Gold) गुंतवणूक करणाऱ्यांना सोन्यानं चांगला परतावा (Return) दिला. 7 ऑगस्ट 2020 रोजी एमसीएक्सवर (MCX) सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी तब्बल 55 हजार 922 रुपये झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या भावात 16 टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार संभ्रमात पडले आहेत की गुंतवणूक केलेलं सोनं अजून काही काळ ठेवावं की आता विकून टाकावं. सध्या जगभरातून कोरोना लसीकरणाबाबत सकारात्मक बातम्या येत असल्यानं लोक दुसऱ्या गुंतवणूक पर्यायांचाही विचार करू लागले आहेत.
अमेरिकन डॉलर आणि सोने यांचे कल परस्पर विरोधी -
सध्या सोन्याचे जे दर आहेत, त्या किंमतीला सोन्यात गुंतवणूक करणं योग्य आहे का, असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे. याबाबत इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (India Bullion and Jewelers Association) राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांचं म्हणणं आहे की, सध्या सोन्याच्या दरात झालेल्या चढ-उतारांमागे अनेक कारणं आहेत. यात महत्त्वाचं कारण, म्हणजे अमेरिकी डॉलरमध्ये इतर चलनांच्या तुलनेत झालेली चांगली वाढ. त्यांच्या मते अमेरिकन डॉलर आणि सोनं परस्पर विरोधी कल दर्शवतात. म्हणजे डॉलरचं मूल्य वधारलं, तर सोन्याचे दर कमी होतात. त्याचबरोबर अमेरिकन बॉंडसचे (American Bonds) व्याजदर वाढल्यानंही सोन्याच्या दरात सुधारणा झाली आहे.
त्याशिवाय लोक आता जोखीम असणाऱ्या गुंतवणूक पर्यायांमध्येही गुंतवणूक करू लागले आहेत. यामध्ये शेअर्स आणि क्रिप्टोकरन्सी आदींचा समावेश आहे. सोन्याच्या दरातील ही घसरण अल्प काळासाठी आहे, असं मला वाटतं. त्यामुळे दीर्घकाळाच्या दृष्टीने सध्याच्या किमतीला सोन्यात गुंतवणूक केल्यास त्यातून चांगला नफा मिळवता येईल. याउलट शेअर बाजारात आलेली तेजी दीर्घकाळ टिकून राहण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे शेअर बाजारात नफा कमावून बाहेर पडणं सध्याच्या स्थितीत योग्य ठरेल. कारण शेअर बाजारात घसरण झाली तर लोक पुन्हा सोन्याकडं वळतील आणि सोन्याच्या किंमती पुन्हा वधारतील.
मेहता यांच्या मते, तीन ते चार महिन्यात सोन्याचे दर प्रति औंस 1900 डॉलर्सवर पोहोचण्याची शक्यता आहे. हा दर आताच्या किमतीपेक्षा त्यात 150 डॉलर्सनं अधिक असेल.
अमेरिकन बॉंडस यील्ड वाढल्याने सोन्याचे दर घटले -
क्वांटम म्युच्युअल फंड्सचे वरिष्ठ व्यवस्थापक चिराग मेहता यांच्या मते, अमेरिकन बेंचमार्क बॉंडस यील्डमध्ये (American Benchmark Bonds Yield) वाढ झाल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. या अमेरिकन बेंचमार्क बॉंडस यील्डमधील वाढीने बाजाराला आश्चर्यचकीत केलं आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या बॉंडसवरील व्याजदर 0.6 टक्के इतक्या नीचांकी पातळीवर होता. आता हा दर त्यापेक्षा दुप्पट म्हणजे 1.37 टक्क्यांवर गेला आहे. यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.
अर्थात सोन्यातील ही घट दीर्घकाळ टिकून राहील, असं वाटत नाही, असं मत मेहता यांनी व्यक्त केलं. बॉंडस यील्डमध्ये आणखी वाढ झाल्यास रिझर्व्ह बँकेला(Central Bank) हस्तक्षेप करावा लागेल. यामुळे सोन्याला पाठबळ मिळेल. तज्ज्ञांच्या मते 2021 मध्ये सोन्याचे भाव वधारणार हे निश्चित आहे. तुमच्या गुंतवणुकीत 7 ते 10 टक्के हिस्सा सोन्याचा असेल तर गुंतवणुकीतही वैविध्य (Diversified Portfolio) येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.