नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (Gold ETF) मध्ये जुलै महिन्यात आधीच्या महिन्याच्या तुलनेत 86 टक्क्यांनी गुंतवणूक वाढली आहे. या महिन्यात गुंतवणूक वाढून 921 कोटींवर पोहोचली आहे. सोन्याच्या वाढत्या किंमती पाहत गुंतवणूकदारांकडून ही गुंतवणूक देखील वाढली आहे. या गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदारांमध्ये खूप उत्साह आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार यावर्षीच्या पहिल्या सात महिन्यामध्ये गोल्ड ईटीएमफमध्ये गुंतवणुकीचा शुद्ध प्रवाह वाढून 4,452 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांनी जुलैमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 921 कोटींची गुंतवणूक केली. याआधी जून महिन्यात गुंतवणूकदारांनी 494 कोटींची गुंतवणूक गोल्ड ईटीएफमध्ये केली होती. या गुंतवणूकीनंतर गोल्ड ईटीएफच्या व्यवस्थापनातील मालमत्ता (एयूएम) जुलैच्या अखेरीस 19 टक्क्यांनी वाढून 12,941 कोटी रुपयांवर गेली असून ती जूनअखेर 10,857 कोटी रुपये होती.
(हे वाचा-सोन्याचे भाव रेकॉर्ड स्तरावर पण 1947 मध्ये आजच्या दूधाच्या दरामध्ये मिळायचं सोनं)
महिन्याच्या आकडेवारीनुसार, गुंकवणूकदारांनी जानेवारीमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 202 रुपये टाकले, फेब्रुवारीमध्ये यामध्ये 1,483 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. मार्चमध्ये ही गुंतवणूक घटली होती. मार्चमध्ये केवळ 195 कोटींची गुंतवणूक ईटीएफमध्ये केली गेली. एप्रिलमध्ये या योजनेत शुद्ध गुंतवणूक 731 कोटी रुपये होता तर मे मध्ये 815 कोटींची गुंतवणूक केली गेली.
गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढीचे कारण
मॉर्निंगस्टार इंडियाचे असोसिएट डायरेक्टर-मॅनेजर हिमांशू श्रीवास्तव म्हणाले की अमेरिकन डॉलर, यूएस-चीनमधील तणाव आणि कोव्हिड-19 प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. यामुळे, सोने सातत्याने उच्चांकडे जात आहे.
(हे वाचा-आता जुने सोने आणि दागिने विकताना द्यावा लागणार GST? वाचा सविस्तर)
जीआरओचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) हर्ष जैन म्हणाले की गोल्ड ईटीएफमध्ये वाढती गुंतवणूक करण्याचे मुख्य कारण म्हणजे हेजिंगसाठी (Hedging) गुंतवणूकदार सोन्यात पैसे गुंतवत आहेत.
काय आहे फायदा?
Gold ETF (एक्सचेंज ट्रेडेड फंड) म्युच्यूअल फंडचा एक प्रकार आहे, जो सोन्यामध्ये गुंतवणूक करतो. या म्युच्यूअल फंड योजनेचे युनिट्स स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट केले जातात. तज्ज्ञांच्या मते गोल्ड ईटीएफमध्ये केलेली गुंतवणूक ही सोन्यामध्ये करण्यात येणाऱ्या गुंतवणुकींपैकी आधुनिक, कमी खर्चाची आणि सुरक्षित गुंतवणूक आहे. यामध्ये तुम्ही खरेदी केलेले युनिट डिमॅट खात्यामध्ये जमा होते. गोल्ड ईटीएफच्या किंमतीएवढी रक्कम तुम्हाला मिळू शकते. त्याचप्रमाणे मॅच्यूरिटीच्या वेळी समान मूल्याचे सोने घेण्याचा पर्याय देखील मिळतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold