नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : कोरोनाच्या संकटकाळात सोन्याच्या (Gold Rate) दरानं आभाळ गाठलं होतं. परंतु ऑगस्ट 2020 मध्ये सरकारने ढिल दिल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घट होताना पाहायला मिळत आहे. कोरोनाची लस (Coronavirus Vaccine) आणि कोरोनाच्या लसीकरणामुळे बाजारात उलथापालथ सुरू झाली आहे. यामुळे मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. सोन्याच्या किमती वाढल्यामुळे नागरिकांचा इतर गुंतवणुकीचा देखील ओढा वाढला होता. दरम्यान ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 च्या स्तरावर पोहोचले होते, त्यामुळे या सर्वोच्च स्तरावरुन सोन्याचे दर 10,000 रुपयांनी कमी झाले आहेत. याचबरोबर चांदीच्या दरात देखील मागील काही महिन्यांपासून 10,000 रुपयांची घसरण झाली आहे.
दिल्लीत सराफा बाजारात सोन्याचांदीचे दर कमी झाले आहेत. 'गुड रिटर्न्स'च्या अहवालानुसार सोन्याचे दर 457 रुपयांनी कमी होऊन 46,390 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर 347 रुपयांनी कमी होऊन 67,894 रुपये प्रति किलो झाले आहेत. आधीच्या सत्रामध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) चांदीची किंमत 68,241 रुपये प्रति किलो होती. तर सोन्याचे दर 661 रुपयांनी कमी होऊन 46,847 रुपये प्रति तोळा होते.
ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 च्या स्तरावर पोहोचले होते, तर चांदीने देखील 77,840 प्रतिकिलो इतका भाव गाठला होता. परंतु आतापर्यंत सोन्याच्या भावात 9,810 रुपये प्रतितोळा, तर चांदीच्या भावात प्रतिकिलो 9,946 रुपयांची घसरण झाली आहे.
डॉलर इंडेक्सबरोबर सोन्या चांदीचा व्यापार -
13 फेब्रुवारीला शनिवारी सोन्याचे दर 457 रुपयांनी कमी होऊन 46,390 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर 347 रुपयांनी कमी होऊन 67,894 रुपये प्रति किलो झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1,815 डॉलर प्रति औंस आणि चांदीचे दर 26.96 डॉलर प्रति औंसवर स्थिर आहेत. एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनालिस्ट तपन पटेल यांच्या मते, डॉलर इंडेक्स कमजोर झाल्यामुळे सोन्याच्या दरात असा बदल पाहायला मिळाला आहे.
आयात शुल्कामध्ये कपातीच्या घोषणेनंतर उलाढाल -
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात (import Duty) कपात करण्याची घोषणा केली होती. अर्थसंकल्पात घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी सोन्याच्या आणि चांदीच्या आयात शुल्कात 5 टक्क्यांची कपात केली होती. सध्या या दोन्हींवर साडेबारा टक्के आयात शुल्क द्यावं लागतं. परंतु आता या घोषणेनंतर केवळ साडेसात टक्के आयात शुल्क द्यावं लागणार आहे. यामुळे 1 फेब्रुवारीला सोन्याचा भाव 47,520 प्रतितोळा होता. तर चांदी 72,470 रुपये प्रतिकिलो इतकी होती. पण या घोषणेनंतर मागील काही दिवसांपासून यामध्ये घट होताना दिसून येत आहे.
गुंतवणुकीमध्ये होणार मोठा फायदा -
मागील वर्षी सोन्याचा भाव प्रचंड प्रमाणात वाढला होता. यावर्षी देखील अशाच पद्धतीनं सोन्याचा भाव वाढला तर 60 हजार प्रतितोळा इतका दर होऊ शकतो. यामुळे सोन्याच्या गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळू शकतो. पण कोरोनाची लस बाजारात आल्यानंतर सोन्याच्या भावामध्ये घसरण होताना दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात लक्ष देऊन गुंतवणूक केल्यास नक्कीच मोठा लाभ मिळू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver prices today