नवी दिल्ली, 17 मार्च : गेल्या चार-पाच वर्षांपासून भारतात डिजिटल पेमेंट्सवर भर दिला जात आहे. भाजीवाल्यापासून मोठी हॉटेल्सही डिजिटल पेमेंट्स स्वीकारतात. आणि या डिजिटल पेमेंट्समध्ये क्रेडिट कार्ड पेमेंटचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. क्रेडिट उपलब्ध झाल्यामुळे महागड्या वस्तू गरज नसतानाही क्षणिक मोहासाठी खरेदी केल्या जात असल्याचं चित्र आहे. पण या सवयीमुळे तुमच्या मेंदूला एखादा अंमली पदार्थ घेतल्यासारखं समाधान मिळतं असं सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का? तुमचा विश्वासच बसणार नाही पण हे खरं आहे.
अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीतील (MIT) संशोधकांना याबाबतच्या संशोधनात असं दिसून आलंय, की कोकेन किंवा इतर अंमली पदार्थ घेतल्यानंतर जशी एक नशा त्या व्यक्तीला जाणवते तशीच नशा क्रेडिट कार्डचा सतत आणि अतिवापर करणाऱ्या अतिखरेदी करणाऱ्या व्यक्तीला जाणवते. त्याचं वैज्ञानिक कारण या अभ्यासात लक्षात आलं. अंमली पदार्थांची नशी केल्यावर जी रासायनिक अभिक्रिया मेंदूत घडते तशीच क्रेडिट कार्ड वापरताना घडते.
कसं केलं संशोधन -
डेली मेलच्या वृत्तानुसार, संशोधकांनी दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी रोख रक्कम आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूंचा स्कॅन केला. यातून असे काही निष्कर्ष निघाले की, क्रेडिट कार्डजवळ असताना आपल्याला प्रत्यक्ष चलनी नोटा हाताळणं त्याचा स्पर्श जाणवत नाही. त्यामुळे आपण भरपूर पैसे आहेत अशा एक प्रकारच्या धुंदीतच राहतो. त्या धुंदीत वस्तू किती महाग आहे आणि खर्च किती होत आहे याचं भान राहत नाही. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड वापरल्यावर मिळणाऱ्या कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉइंट्सचा विचारही मनात असतो आणि ते मिळालेले रिवॉर्ड पॉइंट्स पुन्हा खरेदीसाठीच वापरले जातात. तेच दुसरीकडे जे लोक रोखीने व्यवहार करतात त्यांना खर्चाचं, वस्तूंच्या किमतींच आणि गरजेचंही भान राहतं असं या अभ्यासात लक्षात आलं. या संशोधनाचे निष्कर्ष सायंटिफिक जर्नल्समध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
या अभ्यासातले संशोधक प्रा. ड्राझेन पेरेक म्हणाले, 'प्लॅस्टिकचं क्रेडिट कार्ड हातात ठेवून तुम्ही ते वापरत असाल, तर खरेदीचा आनंद आणि त्यातून मिळणाऱ्या रिवॉर्ड्सचं नेटवर्क या गोष्टी आपोआप मेंदूत कार्यान्वित होतात.'
चॅन्सेलर रिषी सुनक म्हणाले, ‘कोरोना विषाणूचा जगभरात प्रसार झाल्यानंतर स्पर्शातून पसरू शकणाऱ्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी जगभर स्पर्शविरहित पेमेंट यंत्रणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. स्पर्शविरहित पद्धतीने एकावेळी पेमेंट करण्याची मर्यादा यूकेमध्ये यंदा वाढवली असून ती 100 पाउंड इतकी करण्यात आली आहे.’ यूकेतील बँकिंग आणि ट्रेडशी संबंधित संस्था यूके फायनान्सने दिलेल्या माहितीनुसार, 2019 च्या ऑक्टोबर महिन्यातील स्पर्शविरहित पेमेंट्सच्या तुलनेत ऑक्टोबर 2020 मध्ये या व्यवहारांचं प्रमाण 16 टक्क्यांनी वाढलं आहे.
आता हे वाचल्यावर साधा प्रश्न पडेल करायचं काय? तर या पुढचे व्यवहार विचारपूर्वक करायचे. गरजेनुसार तंत्रज्ञान वापरणं महत्त्वाचं आहे, पण त्याच्या आहारी जायचं नाही, हे ठरवणं, याचा विचार करणं अधिक महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Credit card, Credit card statements, Digital services, Money, Payment