सामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलांच्या किंमती उतरण्यास सुरुवात

सामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलांच्या किंमती उतरण्यास सुरुवात

खाद्यतेलाच्या किंमती उतरण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्याभरात खाद्य तेलाच्या किंमती कमी होत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जून: गेल्या एका वर्षापासून खाद्यतेलाच्या (Edible Oil) किंमती आसमंताला भिडल्या आहेत. मात्र आता सामान्यांना काहीसा दिलासा मिळू लागला आहे. कारण खाद्यतेलाच्या किंमती उतरण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्याभरात खाद्य तेलाच्या किंमती कमी होत आहेत.

काही तेलांच्या बाबतीत ही घसरण 20 टक्के आहे. खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या कंझ्यूमर अफेअर्स डिपार्टमेंटने (Department of Consumer Affairs) दिलेल्या माहितीनुसार भारतात खाद्यतेलांच्या किंमती कमी होत आहेत. गेल्या एका महिन्यापासून या किंमती कमी होत आहेत. काही तेलाच्या किंमतीत 20 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. मुंबईमध्ये अशाप्रकारे घट दिसून येत आहे.

विविध प्रकारच्या तेलाच्या किंमतीत घसरण

एका अधिकृत वक्तव्यामध्ये असं समोर आलं आहे की, भारतात विविध प्रकारच्या खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये घसरणीची परिस्थिती पाहायला मिळते आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या एक महिन्यात खाद्य तेलांच्या किंमती खाली येत आहेत.

हे वाचा-SBIच्या राहकांसाठी महत्त्वाची बातमी! चुकूनही करू नका ही 3 कामं अन्यथा...

आता इतक्या कमी झाल्या किंमती

उदाहरण देताना सरकारने अशी माहिती दिली आहे की, 7 मे रोजी पाम तेलाची किंमत  (Palm Oil Price) 142 रुपये प्रति किलोग्रॅम होती आणि आता यामध्ये 19 टक्क्यांची घसरण झाली आहे. यानंतर दर 115 रुपये किलो झाले आहेत. त्याचप्रमाणे सूर्यफूल तेलाची किंमत 16 मे रोजी 188 रुपये प्रति किलो होती, त्यात 16 टक्क्यांनी घसरण होऊन दर 157 रुपये प्रति किलो झाले आहेत. 20 मे रोजी सोया तेलाची किंमत 162 रुपये प्रति किलो होती आणि आता ती मुंबईत 138 रुपयांवर आली आहे.

मोहरीच्या तेलाच्या किंमतीत घसरण

निवेदनात म्हटल्यानुसार, मोहरीच्या तेलाची 16 मे 2021 रोजी प्रतिकिलो किंमत 175 रुपये होती. आता ती 10 टक्क्यांनी घसरून 157 रुपये प्रति किलो झाली आहे. 14 मे रोजी शेंगदाणा तेलाची किंमत 190 रुपये प्रतिकिलो होती, ती आता 174 रुपये प्रतिकिलोवर आली आहे.

हे वाचा-दरमहा 240 रुपये देऊन मिळवा 1 कोटींचा विमा, कॅशलेस क्लेम 20 मिनिटात होईल अप्रूव्ह

सरकार करतंय महत्त्वाच्या उपाययोजना

खाद्यतेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारभाव आणि देशातील तेलबियांच्या उत्पादनावरही अवलंबून असतात, असे सरकारने निवेदनात म्हटले आहे. भारतात उत्पादनापेक्षा वापर जास्त आहे. यामुळे भारत सरकारला खाद्यतेलाची गरज भागविण्यासाठी आयातीवर बराच खर्च करावा लागतो. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार मध्यम व दीर्घकालीन उपायांवर काम करत आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: June 18, 2021, 7:13 AM IST
Tags: money

ताज्या बातम्या