Home /News /money /

SBI ग्राहकांना केंद्राकडून अलर्ट; 'या' मेसेजेसना चुकूनही करू नका रिप्लाय, अन्यथा...

SBI ग्राहकांना केंद्राकडून अलर्ट; 'या' मेसेजेसना चुकूनही करू नका रिप्लाय, अन्यथा...

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) या केंद्र सरकारच्या अधिकृत माध्यमाने ग्राहकांना जागरूक राहण्यास सांगितलं आहे.

    नवी दिल्ली, 23 मे : खोट्या संदेशांबाबत सरकारनं खातेधारकांना पुन्हा सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) या केंद्र सरकारच्या अधिकृत माध्यमाने ग्राहकांना जागरूक राहण्यास सांगितलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) खातेधारकांना बँकेच्या नावावर काही खोटे मेसेजेस गेल्या काही दिवसांत येत आहेत. 'तुमचं खातं बंद करण्यात आलं आहे,' अशा आशयाचे ते मेसेज असून खातेधारकांनी असे कोणतेही एसएमएस किंवा ई-मेल्सना रिप्लाय देऊ नये, असं त्यांनी यात आवाहन केलं आहे. खात्याबाबतची, आर्थिक व्यवहारांबाबतची माहिती मागविणाऱ्या मेसेजेसना उत्तर न दिल्यानं फसवणुकीला आळा बसेल, असं त्यांचं म्हणणं आहे. पीआयबी फॅक्ट चेक या ट्विटर अकाउंटवरून तशी पोस्ट करण्यात आली आहे. स्टेट बँक ही देशातली सर्वांत मोठी सरकारी बँक आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातल्या अनेक ग्राहकांची खाती या बँकेत आहेत. काही दिवसांपासून बँकेच्या खातेधारकांना ‘तुमचं अकाउंट बंद झालं आहे.’ असे मेसेजेस येत होते. त्याबाबतची शहानिशा पीआयबी फॅक्ट चेकनं (PIB Fact Check) केली. त्यानंतर त्यांनी हे मेसेजेस चुकीचे असल्याचं सांगितलं आहे. 'तुमची वैयक्तिक किंवा खात्याबद्दलची माहिती मागितली असेल, तर अशा मेसेजेसना उत्तर देऊ नका व लगेचच report.phishing@sbi.co.in या ई-मेलवर त्या खोट्या मेसेजबद्दलची माहिती कळवा,' असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यासंदर्भात रिझर्व्ह बँकही (Reserve Bank of India) वेळोवेळी सूचना देत असते. 'तुमच्या खात्यातून दुसऱ्या कोणी पैसे काढले असतील, तर त्याची तुमच्या बँकेला लगेचच कल्पना द्या,' असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. सेंट्रल बँकेनं (Central Bank) मार्च महिन्यात ग्राहकांना मार्गदर्शन करणारी एक पुस्तिका प्रकाशित केली होती. त्यामध्ये अशा प्रकारे खातेधारकांना फसवणाऱ्या टोळ्या कशा काम करतात याबाबत प्रकाश टाकला होता. ‘ग्राहकांनी सर्च इंजिनवरच्या खोट्या कस्टमर केअर क्रमांकांपासून सावध राहा आणि बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरूनच व्यवहार करा,’ असा मेसेज एसबीआय एन्फोटेक टीमनं ग्राहकांना पाठविला होता. गेल्या महिन्यातही बँकेने त्यांच्या खातेधारकांना खोट्या मेसेजेसपासून (Fake Messages) सावध राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोणत्याही एसएमएसमध्ये आलेला बँकेचा शॉर्ट कोड (Short Code) खरा आहे की खोटा ते तपासा. एम्बेडेड लिंक्स (Embedded Links) ओपन करू नका. अन्यथा खात्यातून पैसे जाऊ शकतात, अशा सूचना दिल्याचं बँकेनं ट्विट करून सांगितलं आहे. त्याचप्रमाणे बँक ई-मेलच्या माध्यमातून खातेधारकाची माहिती मागवत नाही, असंही त्यात नमूद केलं आहे. स्टेट बँक खातेधारकांना एसएमएस किंवा ई-मेल करून माहिती मागवत नाही. असे मेसेजेस किंवा ई-मेल्सना ग्राहकांनी उत्तर न देणं योग्य असतं. या संदेशांना उत्तर दिल्यामुळे इंटनेट बँकिंग युझरनेम, पासवर्ड्स हॅक होऊ शकतात. वारंवार सूचना देऊनही अनेक गैरप्रकार होत आहेत. त्यामुळे खातेधारकांनी बँकेला झाल्या प्रकाराची माहिती देऊन कायम सजग राहण्याची गरज आहे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
    First published:

    Tags: SBI, SMS

    पुढील बातम्या