Home /News /money /

लॉकडाऊनमुळे सोन्याच्या किंमतीवर 6 महिन्यातील सर्वात जास्त सूट, व्यवहार मात्र ठप्पच!

लॉकडाऊनमुळे सोन्याच्या किंमतीवर 6 महिन्यातील सर्वात जास्त सूट, व्यवहार मात्र ठप्पच!

कोरोनाचा परिणाम जगभरातील अनेक उद्योग आणि व्यापारांवर झाला आहे. सोन्याच्या पुरवठ्याची साखळीही कोरोनामुळे खंडित झाली आहे

    नवी दिल्ली, 29 मार्च : या आठवड्यात जगभरात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाचा परिणाम जगभरातील अनेक उद्योग आणि व्यापारांवर झाला आहे. सोन्याच्या पुरवठ्याची साखळीही कोरोनामुळे खंडित झाली आहे. भारतामध्येही लॉकडाऊनमुळे सोन्याचा व्यापार खंडित झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर मध्यापासून ते  या महिन्यातील सर्वात जास्त सूट देण्यात येत आहे. लाईव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार ‘सोन्याचा व्यापार ठप्प झाला आहे, आणि पुढील 3 आठवड्यांपर्यंत यामध्ये काही हालचालही होणार नाही’, अशी प्रतिक्रिया रिद्धीसिद्धी बुलीयन्सचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज कोठारी यांनी दिली आहे. (हे वाचा-घरबसल्या करू शकाल PM CARE Fund मधून गरजूंना मदत,डोनेशनच्या रकमेवर टॅक्समध्ये सूट) गुढीपाडव्याच्या आठवड्यात होणारी खरेदीही न झाल्याचे ते म्हणाले. शुक्रवारी वायदे बाजारात सोन्याची किंमत प्रति तोळा 43,643 वर बंद झाली. देशांतर्गत सोन्याच्या किंमतीमध्ये 12.5 टक्के आयात कर आणि 3 टक्के जीएसटी सामाविष्ट आहे. किंमतीत वाढ झाल्यानंतर सूटही वाढली. मात्र त्याचा व्यापारावर फारसा परिणाम झाला नाही असं मुंबईतील एका व्यापाऱ्याचं म्हणणं आहे. (हे वाचा-लॉकडाऊनमुळे LPGचं 'पॅनिक बुकिंग' नको, देशात पुरेसा साठा असल्याची IOCची माहिती) लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये देखील सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामुळे  सोन्याच्या बाजारातील भागधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाव्हायरसमुळे मौल्यवान धातूंच्या रिफायनरी बंद आहेत. चीनमध्ये देखील सोन्याचे व्यवहार लॉकडाऊन आणि सोन्याच्या किंमतीमधील अनिश्चितता यामुळे ठप्प आहेत. ब्लूमबर्ग मीडिया अहवालानुसार ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे चेअरमन अनंत पद्मनाभन यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी भारतात 690 टन सोन्याची विक्री झाली होती. दरम्यान या आकड्यामध्ये 30 टक्के घट होऊन यावर्षी विक्री होण्याची शक्यता आहे. म्हणजेच यावर्षी 483 टनच सोन्याची विक्री होण्याची शक्यता आहे. 1985 मध्ये सर्वात कमी सर्वात कमी म्हणजे 485 टन सोन्याची विक्री झाली होती. त्यानंतर 25 वर्षानंतर एवढी कमी विक्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold and silver prices today

    पुढील बातम्या