नवी दिल्ली, 21 एप्रिल : अमेरिकन कच्च्या तेलाची किंमत घसरून 0 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. अशावेळी भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील अशी अपेक्षा सर्वांना आहे. कारण इतिहासामध्ये पहिल्यांदा कच्च्या तेलाच्या किंमती एवढ्या खालच्या स्तरावर पोहोचल्या आहेत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मानक असणारे ब्रेंट क्रूडदेखील गेल्या अनेक वर्षांमधील सर्वात खालच्या स्तरावर उतरले आहे. ब्रेंट क्रूडच्या किंमती 26 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्य आहेत.
मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि बेंगळुरूसारख्या मोठ्या शहरांना वगळल्यास इंधन रिटेलर्स एका महिन्यापर्यंत किंमतींमध्ये बदल करत नाहीत. राज्यांमध्ये VAT जास्त आहे, परिणामी मोठ्या शहरांप्रमाणे छोट्या शहरातील रिटेलर्स रोज इंधनाच्या किंमतींमध्ये बदल करत नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये शेवटची कपात 16 मार्च रोजी झाली होती. म्हणजेच गेल्या 36 दिवसांपासून किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये करा या शेअर्समध्ये गुंतवणूक, जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचा सल्ला)
2020 च्या सुरूवातीपासून ब्रेंट कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये एकूण 60 टक्क्यांची घसरण झाली आहे. या तुलनेत 11 जानेवारीपासून पेट्रोलच्या किंमती केवळ 10 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. लॉकडाऊनमुळे देशातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी पेट्रोल-डिझेलची मागणीही 60 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे रिफायनरी कंपन्यांना त्याचा इनव्हेंटरी तोटा टाळण्यासाठी उत्पादन कमी करावं लागत आहे.
कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे आंतरराष्ट्रीय रिफाइंड उत्पादकांच्या किंमतीही घसरल्या आहेत. गॅसोलिन आणि जेट फ्यूएलचे मार्जिन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. तर डिझेलचे मार्जिन गेल्या कित्येक वर्षातील सर्वात खालच्या स्तरावर म्हणजेच 6 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. मात्र अजूनही देशांतर्गत मार्जिन आंतरराष्ट्रीय मार्जिनपेक्षा चांगल्या स्थितीमध्ये आहे.
(हे वाचा-कच्च्या तेलाचे दर घसरल्यामुळे सोन्याच्या किंमती वाढल्या,जाणून घ्या मंगळवारचे भाव)
लाइव्ह मिंटच्या मते सर्वाधिक तेलकंपन्या दोन महिने आधी कच्च्या तेलाची खरेदी करतात. मिंटशी बोलताना रिफायनेटिव्ह ऑइल रिसर्चर डायरेक्टर यान चोंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मार्चच्या सुरूवातीपासून कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत आहेत. या हिशोबाने पाहिल्यास मे महिन्यापासून किंमती कमी होऊ शकतात'. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) ने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे की, भारतातील 2020 मधील इंधनाचे कंजम्प्शन 5.6 टक्क्यांनी कमी होईल. याआधी त्यांनी मार्चच्या अहवालात यामध्ये 2.4 टक्क्यांनी वाढ होईल असे म्हटले होते. IEA च्या अहवालानुसार भारतामध्ये पेट्रोलची मागणी 9 टक्क्यांनी तर डिझेलची मागणी 6.1 टक्क्यांनी कमी होईल
संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.