नवी दिल्ली, 15 जुलै: गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या महागाई भत्त्याच्या निर्णयावर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्र सरकारने लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी खूशखबर दिली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता (Dearness Allowance) देण्यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकाने महागाई भत्ता आणि महागाई सवलत (Dearness Relief) सध्याच्या दरापेक्षा वाढण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी अशी माहिती दिली आहे की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि केंद्रीय पेन्शनर्सना महागाई सवलत बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव डीए 1 जुलै 2021 पासू लागू करण्यात येणार आहे. वाढीव DA संदर्भात महत्त्वाचे 10 मुद्दे- 1. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) आणि केंद्रीय पेन्शनर्सना महागाई सवलत (DR) देण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई भत्ता 17 टक्क्यावरून वाढून 28 टक्के करण्यात आला आहे. 2. माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की डीए आणि डीआरच्या वाढीमुळे सरकारी तिजोरीवर 34,401 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. हे वाचा- सरकारी कर्मचाऱ्यांना बसणार झटका, एकत्र नाही तर 3 हप्त्यात मिळणार DA ची रक्कम 3. ठाकूर यांनी अशी माहिती दिली आहे की या निर्णयामुळे जवळपास 48.34 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65.26 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. आधी 17 टक्के दराने डीए मिळत असे आता यात 11 टक्क्यांनी वाढ होऊन 28 टक्के दराने डीए मिळणार आहे. 4. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना डीएचे तीन हप्ते मिळणं बाकी आहेत. कोरोनामुळे सरकारने ही डीएची रक्कम फ्रीज केली होती. शिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांना डीआरचे हप्ते देखील दिले नव्हते. कर्मचारी आणि पेन्शनर्सचे 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 चे डीए आणि डीआर थकित आहेत. 5. कोरोनाच्या संकटामुळे अर्थ मंत्रालयाने एप्रिल 2020 मध्ये जुलै 2021 पर्यंत केंद्र सरकारच्या 50लाख कर्मचारी आणि 61 लाख निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यातील वाढ थांबविण्याचा निर्णय घेतला होता. 6. सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डीए आणि पेन्शनर्ससाठी डीआर वाढ 1 जुलैपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत बेसिक सॅलरी आणि पेन्शनमध्ये मिळणाऱ्या 17 टक्के DA-DR मध्ये 11 टक्क्यांची वाढ झाली आहे. 7. 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासून मिळणाऱ्या महागाई भत्त्यावरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. हे निर्बंध हटवल्यानंतर तीनही हप्ते मिळून एकूण 11 टक्क्यांची वाढ झाली आहे हे वाचा- Mastercard वर RBI ने आणली बंदी, तुम्ही हे कार्ड वापरत असाल तर काय परिणाम होणार? 8. केंद्र सरकारने जानेवारी 2020 साठी डीएमध्ये 4 टक्के वाढ केली होती. जुलै 2020 मध्ये 3 टक्के आणि जानेवारीमध्ये 4 टक्के अशी वाढ करण्यात आली होती. मात्र कर्मचाऱ्यांना 17 टक्के दरानेच डीए मिळत होता. 9. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलैपासून डीए आणि डीआरचे तीन हप्ते देण्यास मान्यता दिली आहे. 10. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कॅलक्यूलेशननुसार, समजा कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 20000 रुपये आहे. आता वाढीव डीए 28 टक्के मिळणार आहे तर त्याला आधीपेक्षा 2200 रुपये अधिक मिळतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.