नवी दिल्ली, 14 जुलै: केंद्र सरकारने लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना आज मोठी खूशखबर दिली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता (Dearness Allowance) देण्यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा जरी मिळाला असला तरी या कर्मचाऱ्यांचं काही नुकसान देखील होणार आहे. मीडिया अहवालानुसार केंद्र सरकार या कर्मचाऱ्या डीए एकत्र न देता तीन हप्त्यांमध्ये (Installments) देणार आहे. अशावेळी जे कर्मचारी सप्टेंबरमध्ये डीएसह बंपर पगाराची अपेक्षा करत आहेत, त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.
28% डीए देण्यास सरकारची मंजुरी
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा वाढीव डीए बहाल केला आहे. गेल्या दीड वर्षांपासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जो महागाई भत्ता देण्यात येतो तो रोखला होता. दरम्यान आता हे निर्बंध केंद्राने हटवले आहेत. आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 17 टक्क्यांऐवजी 28 टक्के महागाई भत्ता मिळेल.
कोव्हिडमुळे रोखण्यात आला होता महागाई भत्ता
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना डीएचे तीन हप्ते मिळणं बाकी आहे. कोरोनामुळे सरकारने ही डीएची रक्कम फ्रीज केली होती. शिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांना डीआरचे हप्ते देखील दिले नव्हते. कर्मचारी आणि पेन्शनर्सचे 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 चे डीए आणि डीआर थकित आहेत. यामध्ये 1 जुलै 2021 चा हप्ता जोडून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एकूण चार हप्त्यांचं देय मिळणं बाकी आहे. अर्थ मंत्रालयाने जून 2021 पर्यंत 50 लाखापेक्षा जास्त केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 61 लाख पेन्शनधारकांच्या डीए आणि डीआरची वाढ थांबवली होती.
हे वाचा-Mastercard वर RBI ने आणली बंदी, तुम्ही हे कार्ड वापरत असाल तर काय परिणाम होणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता 1 जुलैपासून महागाई भत्ता मिळणार आहे. केंद्र सरकारने जानेवारी 2020 साठी डीएमध्ये 4 टक्के वाढ केली होती. जुलै 2020 मध्ये 3 टक्के आणि जानेवारीमध्ये 4 टक्के अशी वाढ करण्यात आली होती. मात्र कर्मचाऱ्यांना 17 टक्के दरानेच डीए मिळत होता. कोव्हिडमुळे वाढीव डीए रोखण्यात आला होता.
आता किती मिळेल डीए?
सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कॅल्यक्यूलेशननुसार, समजा कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 20000 रुपये आहे. आता वाढीव डीए 28 टक्के मिळणार आहे तर त्याला आधीपेक्षा 2200 रुपये अधिक मिळतील. आधी 17 टक्के दराने डीए मिळत असे आता यात 11 टक्क्यांनी वाढ होऊन 28 टक्के दराने डीए मिळणार आहे.
हे वाचा-Post Office बँकेत खातं असेल तर 1 ऑगस्टपासून होणार हा बदल,मोजावे लागतील अधिक पैसे
3 हप्त्यांमध्ये मिळणार एरिअर
नॅशनल काउन्सिल ऑफ जेसीएम चे शिवगोपाळ मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लास 1 च्या अधिकाऱ्यांना डीए एरिअर 11,880 ते 37,554 रुपयांपर्यंत मिळेल. त्यांनी अशी माहिती दिली की, लेव्हल 13 अर्थात सातव्या सीपीसी बेसिक सॅलरी 1,23,100 ते 2,15,900 रुपये असणाऱ्यांसाठी किंवा लेव्हल 14 च्या पगारासंदर्भात कॅलक्यूलेशन केल्यास एका कर्मचाऱ्याला मिळणारा डीए 1,44,200 रुपये ते 2,18,200 रुपयांदरम्यान असेल. आता कर्मचाऱ्यांना एकत्र डीए मिळण्याऐवजी तीन हप्त्यात मिळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dearness allowance, Dearness relief, Money