मुंबई, 23 एप्रिल : कोरोनाच्या दुसर्या लाटेचा परिणाम (Corona second wave effect) आता दिसू लागला आहे. देशात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यांत लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लागू आहे. व्यवहार ठप्प होऊ लागले आहेत. परिणामी या दुसऱ्या लाटेचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेतही दिसू लागला आहे. या वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसणार आहे. भारताच्या जीडीपी (GDP) घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
क्रेडिट रेटिंग एजन्सी इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने (Credit Rating Agency India Ratings and Research) शुक्रवारी 2021-22 या वर्षातील भारताच्या जीडीपीचा (GDP) अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार जीडीपी आधीच्या 10.4 टक्क्यांवरून 10.1 टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे.
इंडिया रेटिंग्सच्या मते देशातील अनेक भागात कोरोनाची लाट आहे त्यामुळे वैद्यकीय सुविधांवर प्रचंड दबाव पडतो आहे. कोरोनाची ही दुसरी लाट मेच्या मध्यानंतर कमी व्हायला सुरुवात होईल.
हे वाचा - आसामचा हा चहा वाढवतो रोगप्रतिकार शक्ती, आयुष मंत्रालयाची मान्यता
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या महिन्याच्या सुरूवातीला जाहीर केलेल्या पतधोरणाच्या आढाव्यात चालू आर्थिक वर्षात GDP वाढीचा दर 10.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र आरबीआयचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी देशातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला GDP वाढीचा अडथळा म्हटलं आहे. कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेचा विचार करता भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज कमी राहील असा अंदाज इतर ब्रोकरेज कंपन्या आणि विश्लेषकही वर्तवत आहेत. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारताचा जीडीपी दर 7.6 टक्क्यांनी खाली येण्याची शक्यता आहे.
इंडिया रेटिंग्सच्या मते पहिल्या कोरोना लाटेचा जेवढा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसला होता. तेवढा परिणाम यावेळी दिसमार नाही. पहिल्या लाटेपेक्षा अधिक पटीने रुग्णसंख्या वाढीचा दर असला तरी, पहिल्या लॉकडाऊन इतका हा लॉकडाऊन कडक करण्यात आलेला नाही. तो स्थानिक पातळीवर मर्यादित आहे.
हे वाचा - सलग दुसऱ्या दिवशी देशात 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण; 10 दिवसांत 15000+ मृत्यू
याव्यतिरिक्त पहिल्या लाटेवेळी कोरोना लशीची सुरक्षा नव्हती. आता दुसऱ्या लाटेत कोरोना लशीची सुरक्षा देखील आहे. 21 एप्रिलपर्यंत देशात 13.20 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. सरकारने 1 मेपासून सर्व प्रौढांना लस देण्याची घोषणा केली आहे. यासाठी 176.80 कोटी डोसची आवश्यकता असेल. कोरोनाची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी लस उत्पादन आणि लसीकरणाची गती दोन्ही महत्त्वाचे ठरणार आहे. "याच कारणामुळेच इंडिया रेटिंग्जने वित्तीय वर्ष 2021-22 मधील जीडीपी वाढीचा अंदाज आधीच्या 10.4 टक्क्यांवरून 10.1 टक्क्यांवर आणला आहे.", असं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.