नवी दिल्ली, 18 डिसेंबर: शुक्रवारी सोन्याचांदीच्या दरात (Gold Silver Price) घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX - Multi-Commodity Exchange) वर सोन्याचे दर 0.24 टक्केने कमी होऊन 50,270 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. याआधील सलग तीन दिवस या मौल्यवान धातूच्या किंमतीत तेजी पाहायला मिळाली होती. चांदीच्या दरातही शुक्रवारी 0.60 टक्क्यांची घसरणा पाहायला मिळाली, यानंतर चांदी 67,882 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होती. याआधीच्या सत्रात सोन्याचे दर 1.5 टक्के म्हणजे 750 रुपये प्रति तोळाने वधारले होते. चांदी देखील 3.5 टक्के म्हणजे 2,300 रुपये प्रति किलोग्रॅमने वाढली होती.
जाणकारांच्या मते अमेरिकेत प्रोत्साहन पॅकेजबाबत अपेक्षा वाढल्याने आणि कमजोर डॉलरमुळे सोन्याचांदीच्या किंमतीत तेजी पाहायला मिळू शकते. त्यांचा असा अंदाज आहे की MCX वर सोन्याला 49,620 रुपये प्रति तोळा या किंमतीवर सपोर्ट मिळेल.
(हे वाचा-नोकरी गेली तरीही EMI चं नो टेन्शन! आर्थिक सुरक्षा देणारी 'जॉब लॉस पॉलिसी')
गोल्ड ईटीएफमध्ये कमी गुंतवणूक
सोन्याच्या व्यापाऱ्यांच्या नजरा अमेरिकेतील प्रोत्साहन पॅकेजवर खिळल्या आहेत. लवकरच या पॅकेजला अमेरिकन सिनेटकडून मंजुरी मिळू शकतो. अलीकडच्या दिवसात सोन्याचांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. प्रोत्साहन पॅकेज (Stimulus Package) च्या अपेक्षेमुळे सोन्याला सपोर्ट मिळतो आहे. पण ईटीएफ (Gold ETF) मध्ये गुंतवणूकदारांकडून आताही खरेदी पाहायला मिळत नाही आहे. ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यात गुंतवणूकदार फारसा रस दाखवत नाही आहेत. एसपीडीआर गोल्ड ट्रस्ट (SPDR Gold Trust) च्या मते गुरुवारी गोल्ड ईटीएफ होल्डिंग 0.2 टक्क्यांनी घसरून 1,167.82 टन वर आलं आहे.
(हे वाचा-सामान्यांना मोठा दिलासा! पुढील वर्षापर्यंत नाही वाढणार कांद्याची किंमत)
सोन्याच्या किंमती अलीकडच्या काळात वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे जगभरातील अनेक ठिकाणी कोरोना व्हायरसची प्रकरणं वाढली आहेत. वाढणारे संक्रमण रोखण्यासाठी जगभरातील विविध सरकारे कठोर निर्बंध लागू करत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात काय परिस्थिती?
आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलायचं झालं तर आज सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळते आहे. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणीही तेजी होती. याठिकाणी स्पॉट गोल्डची किंमत 0.2. टक्क्यांनी घसरून 1,881.65 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करते आहे. चांदीचे दरही एका टक्क्याने उतरले आहेत.