नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर: देशातील नामांकित उद्योगपती रतन टाटा आणि सायरस मिस्त्री (Ratan Tata and Cyrus Mistry) यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादाने एक वेगळं वळण घेतलं आहे. शापूरजी पालोनजी (Shapoorji Pallonji Group) समूहाचे प्रमोटर्स गुंतवणूकदारांना डिबेंचर्सची विक्री करून 6600 कोटी रुपये गोळा करण्याचं नियोजन करत आहेत. त्यासाठी टाटा ग्रुपची (Tata Group) होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सचे (Tata Sons Shares) शेअर्स गहाण ठेवले जातील. या संदर्भात मिस्त्री परिवाराच्या (Mistry Family) शापूरजी पालोनजी या कंपनीने 25 सप्टेंबर रोजी कंपनी रजिस्ट्रारकडे कागदपत्रं जमा केली आहेत.
मीडिया अहवालांनुसार, शापूरजी पालोनजी समूहाने उचललेलं हे पाऊल विवादास्पद ठरण्याचा संभव असल्याचं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे. टाटा सन्स कंपनीने मिस्त्री यांच्या अशा प्रकारच्या निर्णयावर याआधीही आक्षेप घेतला होता. टाटा सन्स या कंपनीत मिस्त्री परिवाराचे 18 टक्के शेअर्स आहेत. सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर 2016 साली टाटा आणि मिस्त्री यांच्यातल्या वादाची ठिणगी पडली. सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर रतन टाटा अंतरिम अध्यक्ष झाले आणि काही महिन्यांनंतर नटराजन चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. टाटा हे नाव नसलेले सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे केवळ दुसरेच अध्यक्ष होते.
वाचा-बँक एफडीपेक्षाही चांगला रिटर्न देईल पोस्ट ऑफिसची ही स्कीम, वाचा सविस्तर
मिस्त्री कुटुंबाकडून Sterling Investment Corp कंपनी रजिस्ट्रारकडे जी कागदपत्रं जमा करण्यात आली आहेत, त्यातल्या माहितीनुसार Evangelos Ventures या प्रमोटर्स ग्रुप कंपनीच्या माध्यमातून 6600 कोटी रुपये उभारले जातील. त्यासाठी टाटा सन्सचे शेअर्स गहाण ठेवले जातील. मीडिया अहवालानुसार, टाटा सन्समध्ये 9.185 टक्के शेअर्स असलेले स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंटचे प्रमोटर समूहातल्या इव्हेंजेलॉस व्हेंचर्सच्या माध्यमातून टाटा सन्सचे शेअर्स गहाण ठेवून 6600 कोटी रुपये उभे करण्याचं नियोजन करत आहेत.
वाचा-9 कोटी डॉलर्सची Cryptocurrency परत मागतोय CEO, एका बगमुळे मालामाल झाले युजर्स
स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंटकडे असलेले टाटा सन्सचे शेअर्स स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडे (Standard Chartered Bank) गहाण ठेवण्यात आले होते. शापूरजी पालोनजी अँड कंपनीच्या 2800 कोटी रुपयांच्या उर्वरित कर्जासाठी ते शेअर्स गहाण ठेवण्यात आले होते. असं असलं तरी कागदपत्रांवरून हाती आलेल्या माहितीनुसार, हे कर्ज गेल्या महिन्यात मुदतीपूर्वी फेडण्यात आलं होतं. त्यानंतर बँकेने शेअर्स मोकळे केले होते.
दरम्यान, या संदर्भात शापूरजी पालोनजी आणि टाटा सन्स यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पाठवलेल्या ई-मेल्सना कोणतंही उत्तर मिळालेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Tata group