नवी दिल्ली, 18 जून : बहुतांश लोकांसाठी फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) अर्थात मुदत ठेव हा नेहमीच लोकप्रिय गुंतवणूक (Investment) पर्याय राहिला आहे. खात्रीशीर परतावा आणि कमी जोखीम (Risk) अशी कारणं यामागे आहेत. स्थूलमानाने फिक्स्ड डिपॉझिटचे दोन प्रकार आहेत. यात बॅंकांची एफडी योजना (Bank FD Scheme) आणि कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट (Corporate Fixed Deposit) यांचा समावेश होतो. बॅंकांची फिक्स्ड डिपॉझिट योजना ही सर्वांत लोकप्रिय आहे. कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जास्त व्याज (Interest) दिलं जातं. तथापि, बॅंकाच्या तुलनेत यात जोखीम जास्त असते. फिक्स्ड डिपॉझिट वरील परताव्याच्या बाबतीत गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट असतो. परंतु, बहुतेक लोकांना त्याच्याशी संबंधित जोखमींबद्दल फारशी माहिती नसते. या जोखमींबद्दल जाणून घेणं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा तुम्हाला तुमच्या कष्टाचे पैसे बँकेकडून परत मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे फिक्स्ड डिपॉझिटशी संबंधित जोखमीबद्दल जाणून घेऊया. पूर्णतः सुरक्षित नाही सर्वसामान्यपणे लोक बॅंक एफडी पूर्णपणे सुरक्षित मानतात; पण एफडीमधले पैसे सुरक्षित असले तरी बॅंक कोणत्याही कारणामुळे डिफॉल्टमध्ये गेली तर गुंतवणूकदारांची फक्त 5 लाखांपर्यंतची एफडी सुरक्षित राहते. वित्तीय कंपन्यांसाठीदेखील हा नियम लागू आहे. डिपॉझिट इन्शुरन्स अॅंड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) फक्त 5 लाख रुपयांपर्यंतच्या बँक डिपॉझिटवर विमा (Insurance) हमी देते. लिक्विडिटीची समस्या तज्ज्ञांच्या मते, बॅंक एफडीमध्ये लिक्विडिटीची समस्या (Liquidity problem) असते. जर अगदीच गरज असेल तर तुम्ही मुदतपूर्ती पूर्वीच एफडीतून पैसे काढू शकता. परंतु, त्यावर दंड आकारला जातो. एफडीवरील दंडाची रक्कम बँकेनुसार बदलू शकते. जर तुम्ही टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये (Tax Saving FD) गुंतवणूक केली असेल तर तुम्ही त्यातून 5 वर्षांपूर्वी रक्कम काढू शकता. परंतु, अशावेळी तुम्हाला आयकरात सवलत मिळत नाही. महागाईच्या तुलनेत परतावा नाही फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणारा व्याजदर हा पूर्वनिर्धारित असतो. त्याचवेळी महागाई (Inflation) सतत वाढू शकते. अशा परिस्थितीत वाढत्या महागाईच्या तुलनेत एफडीवर मिळणारा परतावा खूपच कमी असतो. सध्या अशीच स्थिती दिसून येत आहे. गेल्या महिन्यातली आकडेवारी पाहिली तर महागाईचा दर किंचित कमी होऊन 7.04 टक्क्यांवर आला आहे. त्या तुलनेत एफडीवर मिळणारा व्याजदर कमी आहे. याचाच अर्थ तुम्हाला सध्या मिळत असलेला परतावा हा निगेटिव्ह आहे. कराचा भार तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसल्यास, एफडीवरील व्याजातून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे करपात्र (Tax) असू शकतं. ज्येष्ठ नागरिकांना 50,000 रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नातून सूट देण्यात आली आहे. तुमचं व्याज उत्पन्न तुमच्या मिळकतीसह एकत्र केलं जातं आणि तुमच्या स्लॅबनुसार कर आकारला जातो. याच कारणामुळे जर तुम्ही 30 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये असाल तर एफडीतून मिळणारं 7 टक्के व्याज तुम्हाला केवळ 4.9 टक्के परतावा देऊ शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.