मुंबई, 15 जून : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील काही बँका लोनवरील व्याजदर वाढवत असताना आणि ठेवींवरील व्याजदर कमी करत असताना एसबीआयने ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) ठेवींच्या दरांमध्ये (Deposit Rates) नवे बदल केले आहेत. SBI मध्ये टर्म डिपॉझिट (Term Deposit) केलेल्या सर्व ग्राहकांना बँकेने केलेल्या या बदलाचा फायदा होईल.
SBI ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरांत 20 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.20 टक्क्यांनी वाढ केली आहे. तसंच SBI ने 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या निवडक मुदतीच्या देशांतर्गत मोठ्या मुदत ठेवींच्या (Domestic Bulk Term Deposit) व्याजदरात 75 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.75 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. डोमेस्टिक बल्क टर्म डिपॉझिटमध्ये मुदतीपूर्वी पैसे काढल्यास 1 टक्के दंड आकारला जाईल. याशिवाय SBI ने MCLR मध्येही 0.20 टक्के वाढ केली आहे. या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय.
Gold Price Today : सोन्याच्या दरात तेजी; सोनं आज किती रुपयांनी महाग झालं?
एचडीएफसी आणि कोटक महिंद्रा बँकेनेही व्याजदरात केली वाढ
HDFC बँक आपल्या ग्राहकांना 33 महिन्यांच्या ठेवींवर 6.75 टक्के आणि 99 महिन्यांच्या ठेवींवर 7.05 टक्के व्याज देणार आहे. तर कोटक महिंद्रा बँकेने 50 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बचत खात्यांवरील व्याजदरांत 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या ज्या ग्राहकांच्या बचत खात्यात 50 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आहे, त्यांना आता 4 टक्के व्याज मिळणार आहे. यापूर्वी कोटक महिंद्रा बँक 50 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बचत खात्यांवर 3.5 टक्के व्याज देत होती. याशिवाय कोटक महिंद्रा बँकेनेही फिक्स्ड डिपॉझिटवरील (Fixed Deposit) व्याजात 0.10 ते 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे.
IDBI बँकेने रिटेल टर्म डिपॉझिटच्या व्याजदरात केली वाढ
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यतिरिक्त आयडीबीआय (IDBI Bank) बँक, एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि कोटक महिंद्रा बँकेनेही त्यांच्या ठेवींच्या दरांमध्ये बदल केले आहेत. आयडीबीआय बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रिटेल टर्म डिपॉझिटच्या व्याजदरात 0.25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. नवीन व्याजदर 15 जून 22 पासून लागू होतील, असं बँकेने सांगितलंय. बँकेने 91 दिवस ते सहा महिने मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर 0.25 टक्क्यांनी वाढवून चार टक्के केला आहे. पूर्वी तो दर 3.75 टक्के होता. तसंच तीन वर्षे ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर व्याजदर 0.10 टक्क्यांनी वाढवून 5.60 टक्के करण्यात आला आहे, जो पूर्वी 5.50 टक्के होता. याशिवाय पाच वर्षे ते सात वर्षांच्या रिटेल टर्म डिपॉझिटवर 5.60 टक्के ऐवजी आता 5.75 टक्के दराने व्याज दिले जाणार आहे.