मनमोहन सेजू, प्रतिनिधी बाडमेर, 25 जून : शेतकऱ्यांचं आपल्या गुरांशी जिव्हाळ्याचं नातं असतं. गुरांना ते जणू बाळाप्रमाणे जपतात. गुरं तंदुरुस्त राहावी यासाठी त्यांची काळजी घेतात. गुरांना योग्य चारा दिला तर त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि अर्थातच त्यांच्या मदतीने शेतकऱ्यांची उत्पादकता वाढते. वर्षानुवर्षे पावसाच्या पाण्यात उगवणारी बाजरी आणि गवाराची सुकलेली देठं गुरांना चारा म्हणून दिली जातात, परंतु आता बदलत्या परिस्थितीनुसार गुरांच्या चाऱ्यातही नावीन्य आलं आहे. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात शेतकरी आपल्या गुरांसाठी नेपियर चाऱ्याचं उत्पादन घेतात. खरंतर शेतकरी नेपियर, बरसीम, जिरका, गिनी आणि पैरा यांसारख्या अनेक प्रकारच्या पशुखाद्यांचं पीक घेतात. मात्र त्यापैकी नेपियर चारा हे गुरांसाठी सर्वाधिक पौष्टिक खाद्य मानलं जातं.
नेपियर गवताची वाढ अगदी झपाट्याने होते. 2 ते 3 महिन्यांतच हे गवत 15 फुटांपर्यंत वाढतं. त्यामुळे त्याला ‘हत्ती गवत’ असंदेखील म्हणतात. नेपियर गवताला वारंवार रुजवण्याची किंवा रासायनिक खतं आणि कीटकनाशकांची गरज नसते. तर, केवळ एकदा रोवल्यानंतर एकाच ठिकाणाहून सलग पाच वर्ष हे गवत उगवतं. या गवताची पहिली कापणी 60 ते 65 दिवसांमध्ये करावी. त्यानंतर दर 30 ते 35 दिवसांनी कापणी करू शकता. या गवताचं प्रत्येक 3 महिन्यांनी 20 टनहून अधिक उत्पादन मिळतं, यातून दरवर्षी शेतकरी लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवू शकतात. पावसाळ्यात ट्यूब लाईटवर भिरभिरतात माशा? हे केलं तर जातील पळून कमी पाणी आणि मातीची आवश्यकता असणारं हे गवत मातीचं संरक्षणदेखील करतं. यात 8 ते 10 टक्के जीवनसत्त्व आणि 0.5 टक्के कॅल्शियम असतं. बाडमेरचे शेतकरी बाळाराम यांनी सांगितलं की, त्यांच्या शेतातून तब्बल 400 शेतकऱ्यांनी नेपियर गवत नेऊन आपापल्या शेतात रुजवलं.