Explainer : पैसे चुकीच्या बँक खात्यात पाठवले गेले तर काय कराल? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया सोप्या शब्दात

Explainer : पैसे चुकीच्या बँक खात्यात पाठवले गेले तर काय कराल? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया सोप्या शब्दात

थेट बँक खात्यात पैसे पाठवण्याचे व्यवहार आता नित्याचे झाले आहेत; पण या व्यवहारात काही चूक झाली आणि भलत्याच खात्यात पैसे पाठवले गेले तर?

  • Share this:

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : सिटीबँक (Citibank) हे बँकिंग क्षेत्रातलं जागतिक पातळीवरचं एक दिग्गज नाव. नुकतीच या बँकेच्या बाबतीत एक अशी घटना घडली, की त्यापासून सगळ्यांनीच बोध घ्यावा. रेव्हलॉन (Revlon) नावाच्या कॉस्मेटिक कंपनीला कर्ज पुरवणाऱ्या संस्था आणि ती कंपनी यांच्यातला कर्जविषयक प्रशासकीय दलाल (Loan Agent) म्हणून सिटीबँक काम करत होती. बँकेने संबंधित कंपनीच्या कर्जपुरवठादारांना 80 लाख डॉलर्स एवढी रक्कम पाठवणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात मात्र बँकेकडून चुकून तब्बल 9000 लाख डॉलर्स (सुमारे 6554 कोटी रुपये) एवढी रक्कम कंपनीच्या कर्जपुरवठादारांच्या खात्यात पाठवली गेली.

चुकून पाठवली गेलेली ही अतिरिक्त रक्कम परत मिळावी, या मागणीसाठी सिटीबँकेने कोर्टात धाव घेतली; मात्र बँकेला अद्याप त्यातले 5000 लाख डॉलर्स परत मिळालेले नाहीत. अमेरिकेतल्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिलेल्या निकालानुसार, सिटीबँक ती रक्कम परत मिळवू शकत नाही. कॉर्पोरेट क्लायंट (Corporate Client) असलेलं अशा प्रकारचं हे एकमेवाद्वितीय प्रकरण आहे.

सिटीबँकेसारख्या मोठ्या बँकेला एवढा मोठा फटका बसलेल्या या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तुमच्याआमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत असं घडलं तर काय? याबाबत काही बँकर्स आणि नियंत्रक यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांनी या प्रश्नांची दिलेली उत्तरं आपण पाहू या.

एवढी मोठी रक्कम चुकीच्या व्यक्तीला पाठवली जाऊ शकते का?

खरं तर असं व्हायला नको. पाठवण्यात येणार असलेल्या रकमेची आणि रक्कम कोणाला पाठवायची आहे त्याच्या माहितीची खातरजमा केल्याशिवाय तो व्यवहार सुरू केला जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी बँकांमध्ये एक काटेकोर पद्धत ठरवलेली असते. खाते क्रमांक(Account Number) , आयएफएससी कोड (IFSC Code) आदींचा त्यात समावेश होतो. शिवाय, व्यवहार सुरू करण्याआधी माहितीची फेरपडताळणीही केली जाते. रक्कम पाठवल्यानंतर पावतीही पाठवली जाते. हे सगळं असूनही चुकून भलत्या व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठवले जाण्याची दुर्मीळ चूक बँकेच्या चुकीमुळे (सिटीबँकेच्या बाबतीत घडलं तसं) किंवा ग्राहकाने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे घडू शकते.

बँकेकडून चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवले गेले तर?

बँकर्सच्या म्हणण्यानुसार, असं घडल्यास स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरनुसार (SOP) तातडीने कार्यवाही सुरू होते. चुकून रक्कम ज्यांना पाठवली गेली आहे, त्यांना बँकेकडून लगेच याची माहिती दिली जाते आणि पैसे शक्य तितक्या लवकर परत पाठवण्याची विनंती केली जाते. पैसे ज्यांना मिळाले आहेत, त्यांनी तसं करण्यास नकार दिला, तर बँक पुढील कार्यवाहीसाठी कायदेशीर सल्ला मागवते. पोलिसांकडे तक्रार दाखल केली जाते किंवा कोर्टात याचिका दाखल केली जाते. मुंबईतल्या एका आघाडीच्या खासगी बँकेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

हे ही वाचा-सामान्यांच्या खिशाला इंधनवाढीमुळे चाप, परभणीमध्ये पेट्रोलने केली शंभरी पार

ग्राहकाकडून अशी चूक घडली तर?

काही वेळा ग्राहकाकडून ऑनलाइन व्यवहार करताना बेनेफिशियरी डिटेल्समध्ये (Beneficiary details) चूक होते. त्यामुळे पैसे भलत्याच व्यक्तीच्या खात्यात जातात. अशा वेळी बँक कोणतीही जबाबदारी घेत नाही. कारण चूक ग्राहकाची असते. असं घडल्यास पैसे चुकून ज्या खात्यात गेले आहेत, त्या खातेदाराशी संपर्क साधून ते परत पाठवण्याची विनंती करावी लागेल. त्या व्यक्तीकडून सहकार्य न मिळाल्यास कायद्याची मदत घ्यावी लागते.

असे प्रकार टाळण्यासाठी ग्राहकाने व्यवहार करताना बेनिफिशियरी डिटेल्स बारकाईने तपासावेत आणि मगच व्यवहार करावेत, असं बँकर्सचं म्हणणं आहे. बेनिफिशियरी डिटेल्स अचूकपणे टाकणं ही ग्राहकाची जबाबदारी आहे, असं बंधन बँकेनं ई-मेलने पाठवलेल्या उत्तरात म्हटलं आहे.

बंधन बँकेच्या म्हणण्यानुसार, आरटीजीएस (RTGS), एनईएफटी (NEFT), आयएमपीएस (IMPS), यूपीआय (UPI) अशा सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये बँक खाते क्रमांकाच्या आधारे स्ट्रेट थ्रू प्रोसेसिंग (STP) केलं जातं.

चुकीच्या खात्यात पैसे पाठवले गेले, तर काय होतं?

'पैसे पाठवणाऱ्या ग्राहकाकडून चुकीच्या खात्यात पैसे पाठवले गेले, तर संबंधित ग्राहकाची विनंती आल्यानंतर पैसे पाठवणारी बँक ग्राहक सेवेचा भाग म्हणून समोरच्या बँकेकडे हे कारण देऊन हे पैसे परत पाठवण्याची विनंती करू शकते,' असं बंधन बँकेकडून सांगण्यात आलं.

ज्या खातेदाराच्या खात्यात पैसे चुकून पाठवले गेले आहेत, ते पैसे खात्यात असतील तर त्याची बँक ते पैसे व्यवहार सुरू करणाऱ्या खातेदाराच्या खात्यात पुन्हा पाठवू शकते; पण खातेदाराचं नाव आणि खाते क्रमांक जुळत असतील किंवा संबंधित व्यवहारात काहीही चूक नाही असं वाटलं, तर संबंधित बँक पैसे परत पाठवत नाही. पैसे परत पाठवायचे झालेच, तर संबंधित खातेदाराची परवानगी घेऊनच ते मागे पाठवले जातात, असंही बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं.

अवश्य वाचा -  सोनं की FD? यंदा या गुंतवणुकीत मिळतोय सर्वाधिक परतावा

पैसे चुकीच्या बँक खात्यात पाठवले गेल्यास काय करायचं, याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेचे नेमके नियम नाहीत. तरीही अशी चूक घडल्यास संबंधित ग्राहक तातडीने आपल्या बँकेशी संपर्क साधू शकतो. बँकेने त्यावर कार्यवाही न केल्यास ग्राहक बँकिंग ओम्बड्समनकडे दाद मागू शकतो.

तुमच्या खात्यात चुकून पैसे जमा झाले असले तर...?

तुमच्या खात्यात चुकून कोणाचे पैसे जमा झाले असतील, तर तात्त्विकदृष्ट्या त्या पैशांवर तुमचा काहीही अधिकार नसतो. चूक लक्षात आल्यावर तुम्ही तातडीने ते ज्याचे कोणाचे असतील, त्याला परत करायला हवेत.

असे प्रकार भारतात घडले आहेत का?

बँकेने पैसे पाठवताना चूक झाल्याच्या घटना दुर्मीळ आहेत. 2012-13मध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या एका आघाडीच्या बँकेकडून (PSU Bank) चुकून अनेक खात्यांमध्ये व्याजाचे पैसे जमा केले गेले. चूक लक्षात आल्यानंतर ते पैसे परत घेतले गेले. ही चूक त्या दिवशी संध्याकाळी उशिरा घडली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चूक लक्षात येऊन ती सुधारली गेली होती. त्यामुळे कोणताही तोटा झाला नाही. त्या वेळी त्या बँकेत कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

First published: February 23, 2021, 8:21 AM IST

ताज्या बातम्या