CM केजरीवालांच्या मुलीची OLX वर फसवणूक, ऑनलाइन सोफा विकताना 34000 रुपयांचा गंडा

CM केजरीवालांच्या मुलीची OLX वर फसवणूक, ऑनलाइन सोफा विकताना 34000 रुपयांचा गंडा

ऑनलाइन व्यवहार करताना खबरदारी घेणं आणि खातरजमा करणं किती आवश्यक आहे हे आणखी एका गोष्टीमुळे स्पष्ट झालं आहे. यावेळी ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांच्या मुलीला हजारोंचा गंडा घातला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी: सरकार, विविध बँका, PIB यांच्याकडून वेळोवेळी सांगण्यात येतं की ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांपासून सावध राहा. याकरता पेमेंट करताना, इ-कॉमर्स साइट्सचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यावी याची सर्व माहितीही दिली जाते. ऑनलाइन व्यवहार (Online Transaction) करताना खबरदारी घेणं आणि खातरजमा करणं किती आवश्यक आहे हे आणखी एका गोष्टीमुळे स्पष्ट झालं आहे. यावेळी ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) करणाऱ्या भामट्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांच्या मुलीला हजारोंचा गंडा घातला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीची OLX वर ऑनलाइन सोफा विकताना ही फसवणूक झाली आहे. या ऑनलाइन चोरांनी 34 हजार रुपये लंपास केले आहेत. जुना सोफा ऑनलाइन विकताना ही घटना घडली आहे. या भामट्यांनी सुरुवातीला ग्राहक म्हणून ओळख करून दिली. खात्री पटावी याकरता सुरुवातीला त्यांनी केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिच्या खात्यात काही पैसे देखील पाठवले. मात्र सोफ्याची विक्री झाल्यानंतर तिच्या खात्यामध्ये पैसे न येता तिच्या खात्यामधून 34,000 रुपये कापले गेल्याचा मेसेज आला. याबाबत तिने रीतसर तक्रार नोंदवली आहे.

(हे वाचा-कोरोनाचा प्रसार कसा झाला? वुहानच्या मार्केटमधून WHO ला मिळाले नवे संकेत)

यावेळी या अज्ञात आरोपीने ऑनलाइन पैसे लंपास करण्यासाठी क्यूआर कोडचा वापर केला होता. अशी माहिती मिळते आहे की, पैसे पाठवण्यासाठी त्याने हर्षिताला एक क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. मात्र त्या खात्यात पैसे येण्याऐवजी तिचेच पैसे कापले गेले. तिने जेव्हा अशी माहिती दिली की चुकीचा क्यूआर कोड पाठवला आहे, तेव्हा त्या भामट्याने आणखी एक क्यूआर कोड पाठवला. असेही सांगितले की हा कोड स्कॅन केल्यानंतर तुमचे पैसे परत येतील आणि तुमच्याबरोबर निश्चित झालेली सोफ्याची किंमतही तुम्हाला मिळेल. हर्षिताने तो कोड स्कॅन केल्यानंतर तिच्या खात्यातून पुन्हा एकदा पैसे कापले गेले.

(हे वाचा-Uttarakhand Disaster: सापडले 26 जणांचे मृतदेह, 171 जण बेपत्ता असल्याची भीती)

दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीबरोबर झालेल्या प्रकाराची तक्रार नोंदवली आहे. अशी माहिती मिळते आहे की दिल्ली पोलिसांच्या नॉर्थ जिल्ह्यातील सायबर सेल या प्रकरणाची चौकशी करत आहे. हे हायप्रोफाइल प्रकरण असल्यामुळे लवकरच यातील आरोपी पकडला जाण्याची शक्यता आहे. रविवारी ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे. डिजिटल इंडियाच्या या काळामध्ये अशा घटना लोकांमध्ये अविश्वास निर्माण करत आहेत. दरम्यान ग्राहकांनीही अशाप्रकारे ऑनलाइन व्यवहार करताना विशेष खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 9, 2021, 8:23 AM IST

ताज्या बातम्या