राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह सुरु आहे. या उत्साहानिमित्ताने आम्ही तरुणांसाठी एक खास सदर आणला आहे. 25 ते 35 या दहा वर्षांचा कालावधी हा आपल्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा असतो. या दहा वर्षात आपण जे काम करतो त्या आधारावर आपलं पुढचं आयुष्य अवलंबून असतं. या काळात अनेकजण यशस्वी होतात. अनेकजण प्रचंड खस्ता खातात. पण शेवटी यशस्वी होतात. विशेष म्हणजे यश सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी खूप तडफडत, झुंजत, जीव ओतून मेहनत करावी लागते. पण जेव्हा यश मिळतं तेव्हा ते सोबत भरपूर सारा आनंद घेवून येतं. आपल्या आयुष्याला एका वेगळ्या उंचीवर घेवून जातं. अशाच यशस्वी प्रतिभावंतांची माहिती आम्ही तुम्हाला आमच्या लाईफ@25 या सदरातून देत आहोत. या सदरचा आमचा आज दुसरा दिवस. याआधी आम्ही आयएएस प्रांजल पाटील यांची प्रेरणादायी कहाणी सांगितली होती. त्यानंतर आज आम्ही आयएएस डॉ. राजेंद्र भारुड यांची कहाणी सांगणार आहोत.
एखादा कलेक्टर, डॉक्टर किंवा वकील हा जन्मत: त्या पदवी घेवून जन्माला येत नाही. याशिवाय कलेक्टर किंवा सनदी अधिकारी बनण्यासाठी तुमच्याकडे प्रचंड अफाट पैसा असावा, तुमच्या आई-वडिलांनी तुम्हाला खूप महागड्या क्लासेस किंवा शाळा-महाविद्यालयांमध्ये टाकावं असं आवश्यकच नसतं. आवश्यक असते ती फक्त तुमची जिद्द, कामातलं समर्पण आणि आत्मविश्वास. याच जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आज देशभरात शेकडो गरिबांची मुलं आयएएस, आयपीएस, पीएसआय, तहसीलदार सारखे अधिकारी बनले. अशा अधिकाऱ्यांमध्ये नंदुरबारचे आयएएस अधिकारी राजेंद्र भारुडे यांचं नाव अग्रस्थानी आहे. राजेंद्र भारुडे यांचा प्रवास प्रचंड प्रेरणा देणारा आहे. एक भील समाजाचा तरुण आएएस अधिकारी बनतो आणि आदिवासी-भील समाजाच्या कल्याणासाठी स्वत:ला वाहून घेतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. भारुडे यांनी 2020 मध्ये लॉकडाऊन काळात तब्बल 60 हजार नागरिकांची मनोरेगा योजनेच्या माध्यमातून रोजगाराची व्यवस्था केली होती. भारुडे यांनी अनेक योजनांमधून लोकपयोगी कामे केली आहेत. त्यांची ही कामे अवितरतपणे सुरु आहेत. ते आज जनतेची सेवा करत आहेत. त्यांच्या या सेवाभावी स्वभावामागे एक कारण आहे. ते म्हणजे त्यांनी स्वत: गरिबीतून दिवस काढले आहेत. गरिबाच्या यातना त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांचा गरिबांसाठी जीव तुटतो हे खरं आहे. ( नियतीने नेत्र हिरवले, मनाने दुनिया पाहिली, डोळ्यांमधून टचकन पाणी आणणारी IAS प्रांजल पाटील यांची कहाणी ) राजेंद्र भारुडे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या सामोडे गाव इथे 1988 साली झाला. सामोडे गावापासून थोडसं दूर भिलाटी वस्ती होती. या भिलाटीत राहणाऱ्या नागरिकांचे दोन व्यवसाय होते. एक म्हणजे मजुरी करायची आणि दुसरी म्हणजे हातभट्टीची गावटी दारु विकायची. भारुडे यांच्या आईदेखील मजुरी आणि दारु विक्रीचा व्यवसाय करायच्या. भारुडे यांच्या नशिबात जन्मापासून संघर्ष लिहिलेला होता. ते आईच्या पोटात होते तेव्हाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. भारुडे यांना दोन मोठी भावंडं होती. त्यामुळे त्यांच्या आईवर सासरच्या मंडळींकडून तिसऱ्या मुलाचा गर्भपात करावा, यासाठी दबाव टाकला जात होता. पण त्यावेळी भारुडे यांच्या मोठ्या मावशींनी मध्यस्थी केली. आपण तिसऱ्या मुलाचं संगोपन करु असं म्हटलं. त्यानंतर भारुडे यांच्या आईला घेवून मावशी स्वत:च्या घरी आली. तिथेच भारुडे यांच्या आई आणि ते आपल्या इतर भावंडांसह राहिले. राजेंद्र भारुडे यांच्या घरची परिस्थिती खूप बेताची होती. दोन वेळचं जेवण मिळणंही कठीण होतं. भारुडे जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी जावू लागले. तिथे त्यांना खायला सुगळी आणि दूध प्यायला मिळायचं. त्या आशेने ते रोज शाळेत जायचे. पण शाळेत गेल्यावर गुरुजींची छडी देखील खावी लागे. त्यामुळे गुरुजींच्या छडीला घाबरुन भारुडे अभ्यास करु लागले. त्यातून त्यांना अभ्यासाची गोडी निर्मण झाली. भारुडे यांनी चांगला अभ्यास केल्याने इयत्ता पाचवीत त्यांची नवोदय विद्यालयात निवड झाली. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. भारुडे दहावीत 95 तर बारावीत 90 टक्के गुणांनी ते विजयी झाले. त्यांनी 2006 मध्ये सीईटीची परीक्षा उत्तीर्ण होत मुंबईच्या सेठ जी एस मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केलं. एमबीबीएसचं शिक्षण घेत असताना लोक भारुडे यांना टोमणे मारायचे. दारु विकणाऱ्याचा मुलगा डॉक्टर काय होणार, दारुच विकणार, अशा टोकदार शब्दांनी भारुडे यांना हिणवलं जायचं. हे शब्द भारुडे यांच्या जीवाला लागायचे. अखेर त्यांनी जिद्दीन डॉक्टर होवून दाखवलं. डॉ. राजेंद्र भारुडे यांनी एमबीबीएस झाल्यानंतर आपल्या समाजासाठी काम करण्याचा निश्चय केला. आदिवासी भील समाजाचा विकास व्हावा, असा विचार त्यांना सारखा खात असे. यासाठी त्यांनी यूपीएसची परीक्षा देण्याचा निश्चय केला. त्यांनी आपल्या मित्रांकडून पुस्तकांच्या झेरॉक्स कॉपी मिळवल्या आणि अभ्यासाला सुरुवात केली. त्यांनी स्वत:ला अभ्यासात झोकून दिलं. त्यांच्या अभ्यासातील समर्पणामुळे त्यांना पहिल्याच प्रयत्नात भरघोस यश मिळालं. त्यांचा देशात 709 वा क्रमांक लागला. तर कॅटेगरीच्या हिशोबाने ते 20 व्या रँकने आयपीएश झाले. पण भारुडे यांचं स्वप्न वेगळं होतं. त्यांना आयएएस व्हायचं होतं. त्यांनी पुन्हा यूपीएससी दिली आणि आपलं स्वप्न साकार केलं. ते 2023 मध्ये आयएएस झाले. त्यांची पहिली पोस्टिंग ही नांदेड जिल्ह्यातील किनलट इथे असिस्टर कलेक्टर आणि आयटीडीपी प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून झाली. त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून बदली झाली. तिथे त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक योजनांची अंमलबजावणी केली. सोलापूर जिल्हा परिषदेनंतर त्यांची नंदूरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. नंदुरबारमध्ये भारुडे यांच्या कामांचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं आहे. राजेंद्र भारुडे आज आयुष्यात यशस्वी आहेत. पण त्यांच्या या यशामागे खूप मोठा संघर्ष दडला आहे. असा संघर्ष प्रत्येकाच्या वाटेला येत असतो. पण भारुडे यांचं जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन हा अतिशय सकारात्मक होता. त्यामुळे ते प्रचंड यशस्वी झाले. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास आपण त्यांच्या ‘मी एक स्वप्न पाहिलं’ या पुस्तकातूनही वाचू शकतो. ते पुस्तक त्यांनी स्वत: लिहिलं आहे. त्यांचं हे पुस्तकही प्रचंड लोकप्रिय झालं आहे.