मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नियतीने नेत्र हिरवले, मनाने दुनिया पाहिली, डोळ्यांमधून टचकन पाणी आणणारी IAS प्रांजल पाटील यांची कहाणी

नियतीने नेत्र हिरवले, मनाने दुनिया पाहिली, डोळ्यांमधून टचकन पाणी आणणारी IAS प्रांजल पाटील यांची कहाणी

आयएएस प्रांजल पाटील

आयएएस प्रांजल पाटील

तुमच्याकडे पैसा, संपत्ती, पद काहीच नसलं तरी चालेल, पण तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी नक्कीच हवी. जिद्द, चिकाटीमुळे कामात झोकून देणं शक्य होतं. आणि तुमच्याकडून असं काहीतरी घडतं की आख्खं जग तुमच्यापुढे नतमस्तक होतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 30 ऑगस्ट : 25 ते 35 वयोगट हा आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा काळ मानला जातो. हे दहा वर्ष म्हणजे आपल्या तरुणपणाचं उमदं वय. या वयात आपल्याकडे तारुण्याची ताकद असते. आपण काहीही करु शकतो. आपण लात मारु तिथून पाणी काढू शकतो. या कालखंडात प्रत्येक तरुण आपल्या आयुष्यात स्थिर स्थावर होण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक तरुणाचं आपल्या स्वप्नांचं एक वेगळ जग असतं. आपण आयुष्यात या पदावर पोहोचावं, आपण इतके पैसे कमवावेत, विशिष्ट अधिकारी व्हावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. विशेष म्हणजे अनेकजण जिद्दीने मेहनत करतात आणि आयुष्यात यशस्वी होतात. या दरम्यान काही जणांना प्रचंड मेहनत केल्यानंतरही त्यांना लवकरच यश मिळत नाही. तर काहींना खूप मेहनत केल्यानंतर उशिराने यश मिळतं. पण यश नक्कीच मिळतं. अशा यशस्वी तरुणांच्या कहाण्या आजपासून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या तरुणांची कहाणी प्रचंड प्रेरणादायी आहे. त्यांचा जगण्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आपणही अंगीकारला तर कदाचित आपलंही आयुष्य बदलू शकतं.

तुमच्याकडे पैसा, संपत्ती, पद काहीच नसलं तरी चालेल, पण तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी नक्कीच हवी. जिद्द, चिकाटीमुळे कामात झोकून देणं शक्य होतं. आणि तुमच्याकडून असं काहीतरी घडतं की आख्खं जग तुमच्यापुढे नतमस्तक होतं. आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणी येतात, अनेकदा आपल्याला अपयशही येतं. पण या अपयशाला पचवत पुढे जायला हवं. परिस्थितीशी झगडत संघर्ष करत लढत राहायला हवं. कारण तुमचे प्रयत्न कधीच निरर्थक ठरणार नाहीत. तुम्हाला त्याचा फायदाच होईल. विशेष म्हणजे कामात झोकून दिल्यामुळे तुम्हाला हवं असणारं यश प्राप्त होईल आणि एकदा आयुष्यात यश आल्यानंतर संपूर्ण जग तुम्हाला सलाम करेल. या गोष्टीचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे देशाच्या पहिल्या महिला अंध आयएएस अधिकारी प्रांजल पाटील.

प्रांजल पाटील आज 33 वर्षांच्या आहेत. खरंतर प्रांजल पाटील यांची लहानपणीच दृष्टी गेली होती. नियतीने त्यांची दृष्टी हिरावून घेतली, पण त्यांच्या जिद्दीने नियतीलाही हरवलं. प्रांजल यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं होतं. त्यांनी यूपीएसीत 783 वा रँक मिळवला होता. त्यावेळी त्यांना रेल्वेत नोकरी मिळणार होती. पण प्रांजल यांना दृष्टी नसल्याने नोकरीसाठी खूप संघर्ष करावा लागला. त्यांना दृष्टी नसल्याने अनेकांनी त्यांच्या क्षमतांवर संशय व्यक्त केला. त्यावेळी प्रांजल पाटील खूप लढल्या. विशेष म्हणजे त्यांनी लोकांच्या या संशयाला आपल्या कर्तृत्वाने सडेतोड उत्तर दिलं. त्यांनी पुन्हा एकदा यूपीएसची परीक्षा दिली आणि यावेळी त्या थेट देशात 123 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष प्रांजल पाटील यांच्याकडे वळलं होतं. एक पंचवीशीतली नेत्रहीन तरुणी आपल्या गुणांच्या जोरावर यूपीएसी परीक्षेत 123 वा क्रमांक आणते ही गोष्ट अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी होती. विशेष म्हणजे जे लोक प्रांजल यांच्या क्षमतांवर अविश्वास दाखवत होते त्यांना हे सडेतोड उत्तर होतं. त्यानंतर प्रांजल पाटील या केरळमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या. तेव्हापासून प्रांजल पाटील यांचा प्रगतीचा आलेख हा चढताच राहिलेला आहे.

(हसणं शारिरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर; काय सांगतात संशोधक?)

प्रांजल पाटील यांचा जन्म 1 एप्रिल 1988 रोजी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात झाला होता. खरंतर प्रांजल यांची दृष्टी जन्मत: अधूर होती. पण वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची दृष्टी कायमचीच गेली. त्यावेळी प्रांजल आणि त्यांच्या आई-वडिलांपुढे प्रचंड अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. विशेष म्हणजे प्रांजल ज्या शाळेत शिक्षण घेत होत्या त्या शाळेनेदेखील त्यांना शिक्षण देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना दादरच्या कमला मेहता शाळेत प्रवेश घ्यावा लागला. कमला मेहता ही शाळा खरंतर नेत्रहीन विद्यार्थ्यांचीच शाळा होती. प्रांजल त्यावेळी इयत्ता चौथीत होत्या. प्रांजल लहान असल्याने त्यांना दररोज उल्हासनगर ते दादर प्रवास करणं शक्य नव्हतं. त्यामुळे प्रांजल दादरमध्ये हॉस्टेलमध्ये राहिल्या. घरापासून लांब राहण्याची प्रांजल यांची ती पहिली वेळ होती.

कमला मेहता शाळेत शिक्षण घेताना प्रांजल यांनी सुरुवातीला ब्रेनलिपी शिकली. त्यांना अभ्यासात तितका रस नव्हता. पण त्यांना पुस्तकं वाचणाची प्रचंड आवड होती. प्रांजल यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण दादरच्या कमला मेहता शाळेतून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी आर्ट्समधून अकरा-बारावीचं शिक्षण उल्हासनगरच्या चांदीबाई महाविद्यालयातून पूर्ण केलं. प्रांजल बारावीत 85 टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्या होत्या. बारावीनंतर प्रांजल यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून बी.ए.चं शिक्षण घेतलं. याच दरम्यान त्यांनी यूपीएसीत यश मिळवलेल्या एका अधिकाऱ्याचा लेख वाचला आणि त्या लेखामुळे प्रभावित झाल्या. त्यांनी मनाशी ठाम निश्चय केला आणि अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहिलं. पण त्याबाबत त्यांनी कोणाकडे वाच्यता केली नाही.

प्रांजल यांनी पदवीधर झाल्यानंतर दिल्लीतील जे एन यू महाविद्यालयातून एम.ए.चं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी प्रचंड मेहनत घेवून यूपीएससीची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्या 783 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. पुढील वर्षी त्यांनी आपल्या रॅकिंगमध्ये सुधारणा करत 123 वा क्रमांक पटकावला. आपल्या ट्रेनिंगच्या दरम्यान त्यांनी केरळमधील अर्नाकुलम जिल्ह्याचं असिस्टंट कलेक्टर म्हणूनही काम पाहिलं. केरळ कॅडरमध्ये त्या रुजू झाल्या. त्यानंतर त्यांची विशिष्ट वेळेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत राहिली. त्यांनी प्रत्येक ठिकाणी, मिळालेल्या पदावर आपल्या क्षमतेने स्वत:ला सिद्ध केलं. त्यामुळे संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटतो.

आयुष्य हे आज आव्हानांनी भरलेलं आहे. कोणतंही क्षेत्र असो, प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. आयुष्यातील सर्व आव्हानांना तोंड देत आपण पुढे गेलो, संघर्ष करत लढलो तर आपल्याला यश मिळू शकतं हे आपल्याला प्रांजल पाटील यांच्या संघर्षमय प्रवासातून शिकायला मिळतं. त्यांच्या या प्रवासाने अनेक तरुणांना अधिकारी बनण्यासाठी प्रेरित केलंय. विशेषत: आपण अंध आहोत, आपल्या आयुष्यात आपण काय करु शकतो? असा विचार करणाऱ्या तरुणांसाठी तर त्यांनी आशेचा वेगळा किरण निर्माण केलाय. अशा तरुणांसाठी प्रांजल या रोल मॉडेल आहेत. याशिवाय इतर विद्यार्थ्यांसाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रांजल यांचा प्रेरणादायी प्रवास हा खूप काही शिकवणारा आहे. आयुष्यात कोणतंही संकट आलं तर तक्रारी करु नका. तुम्ही संकट आणि अडचणींना सामोरं जा, लढा आणि जिंका. यश तुमच्या पायाभोवती लोटांगण घालेल, हेच प्रांजल यांच्या प्रवासाकडे बघून शिकायला मिळतं.

First published:

Tags: Digital prime time, Ias officer