मुंबई, 13 मार्च : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये आम्ही जे काही ठरविले होते, त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फारकत घेतली. त्यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी फारकत घेतली, असं धक्कादायक विधान माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
आमच्या चुकीचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला, असा घरचा आहेर मुनगंटीवार यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना दिला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पावर सुरू असलेल्य़ा चर्चेत मुनगंटीवारांनी हे धक्कादायक विधान केलं आहे. महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.
हे वाचा -पुण्यातील गाडगीळ सराफ 50 कोटी खंडणी प्रकरण, अजित पवारांच्या निकटवर्तीयांची चौकशी
मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप अध्यक्ष अमित शहा व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जे ठरले तो शब्द आमच्याच पक्षातील नेत्यांकडून फिरवला गेला. नाहीतर आज शिवसेनेसोबत आम्ही सत्तेत असतो. आम्ही त्यांना फसवले ही आमची चूक झाली. आमच्या चुकीचा फायदा तुम्हाला झाला. पण एक ना एक दिवस ती चूक आम्ही सुधारू, असं ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तुमची तीन महिन्यांची मैत्री असेल पण आमची मैत्री तब्बल 30 वर्षे जुनी आहे, अशा शब्दात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्रात शिवसेना व भाजप युतीचं सरकार येऊ शकलं नाही. त्यावेळी झालेल्या राजकीय नाट्यात महाविकास आघाडीने बाजी मारत सत्ता स्थापन केली. याच्या पार्श्वभूमीवर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विधान राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
हे वाचा - मध्य प्रदेशचा महाराष्ट्रात परिणाम, काँग्रेसने युवा नेत्याला दिली संधी