मुंबई, 22 जून : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shiv sena Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ३३ आमदारांना घेऊन बंडखोरी केली आहे. यामुळे महाविकास आघाडी (MAHAVIKAS AGHADI) सरकारला धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. यावर एकनाथ शिंदे (eknath shinde) म्हणाले आपण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) आणि आनंद दिघे (anand dighe) यांचं हिंदुत्व सोडलं नाही. हेच हिंदुत्व घेऊन राजकारण करणार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत पडद्याआड असलेला भाजप आता समोर आला आहे.
दरम्यान 2014 ते 2019 साली भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात समृद्धी महामार्ग ड्रीम प्रोजेक्ट (samrudhi Highway Dream Project) होता. याच समृद्धीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यातील जवळीक वाढली होती. किमान 1 हजार कोटींची समृद्धी महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधीच्या माध्यमातून शिंदेंनी औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांना दिली. त्यामुळे बंडात ते त्यांच्या गळाला लागले, असे स्पष्ट दिसत असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा : सुरतमधून निघतानाचा एकनाथ शिंदे यांचा पहिला व्हिडीओ समोर
दरम्यान एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गाच्या निमीत्ताने औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेच्या सर्व आमदारांशी जवळ आले होते. शिंदेंशी सर्वाधिक जवळीक असलेले आमदार म्हणून आमदार संजय शिरसाट यांची ओळख आहे. 2019 मध्ये त्यांना रस्त्यांच्या दुरवस्थेवरून लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. निवडून आल्यावर त्यांना शिंदे यांनी बीड बायपाससाठी ३७१, सातारा देवळाई ड्रेनेज २००, रस्त्यांसाठी १०० कोटी दिले. आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात रस्त्यांसाठी निधी हवा आहे, असे कळल्यावर शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत त्यांना तो मिळवून दिला अशी माहिती दिव्य मराठीने दिली आहे.
एकनाथ शिंदे हे औरंगाबादचे पालकमंत्री होते त्यावेळी त्यांनी रमेश बोरनारे यांना जवळ केले होते. वैजापूर नगरपालिकेला 30 कोटी 2019 मध्ये शिंदे औरंगाबादचे पालकमंत्री असताना रमेश बोरनारे तालुकाप्रमुख होते. तेव्हापासून त्यांच्यात चांगले संबंध तयार झाले. बोरनारेंना उमेदवारी देण्यात शिंदेंनी महत्त्वाची भूमिका असल्याचेही बोलले जात आहे. गेल्या अडीच वर्षांत त्यांनी वैजापूर नगरपालिकेला 30 कोटींचा निधी मिळवून दिला. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा निधी देण्यात आला. पंधरा एप्रिल रोजी वैजापूर बाजारपेठेतील रस्त्याच्या भूमिपूजनात बोरनारेंशी शिंदे यांचे सख्य अधिक लक्षात आले.
हे ही वाचा : मोठी बातमी! आदित्य ठाकरे 'मंत्रिपद' सोडणार? प्रोफाइलमध्ये केला बदल
आठ जूनला विक्रमी सभा आणि 21 जूनला आमदार फुटले : आठ जून रोजी उद्धव ठाकरे यांची औरंगाबादला सभा झाली. त्यात सभेची गर्दी दिल्लीच्या तख्ताला धडकी भरवणारी असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. प्रत्यक्षात सभेनंतर 13 दिवसांत शिवसेनेलाच धडकी भरावे असे बंड झाले.
भुमरेंच्या जाण्याने सर्वांनाच धक्का रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्या शिंदेंसोबत जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. मंत्रिपद मिळाल्यावर भुमरेच शिवसेनेने मला कसे सर्व काही दिले, याचा उल्लेख वारंवार भाषणात करत होते. तरीही ते बंडात सामील झाल्याने शिवसैनिकांत त्यांच्याविषयी नाराजीचा सूर उमटला आहे.
फडणवीसांनीच सत्तार यांना शिवसेनेत पाठवले
काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर सत्तार कुठे जाणार याची चर्चा सुरू होती. रावसाहेब दानवे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या संबंधामुळे ते भाजपात जाणार हे निश्चित झाले होते. मात्र फडणवीसांच्या सल्ल्यानेच ते शिवसेनेत गेले. त्यामुळे सत्तार शिंदेंसोबत गेल्याचा धक्का शिवसेनेच्या नेत्यांना बसलेला नाही. जिकडे सत्ता तिकडे सत्तार, असे समीकरण असल्याचे या नेत्यांनी सांगितले. 1996 मध्ये शिवसेनेकडून खासदार झालेले प्रदीप जैस्वाल एकदा अपक्ष आमदार झाले. त्यामुळे त्यांच्यासाठी शिवसेनेतून बाहेर पडणे नवीन गोष्ट नाही, अशी चर्चा भाजप-सेनेच्या वर्तुळात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Aurangabad News, Eknath Shinde, Rebel Abdul Sattar expelled from Congress