राहुल खंदारे, प्रतिनिधीबुलडाणा, 04 जुलै : बुलडाणा (buldhana) जिल्ह्याकील बेलाड इथं एका 40 वर्षीय महिलेवर रानडुक्कराने (wild boar attack) प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात महिलेचा हातच शरीरापासून वेगळा झाला आहे. त्यामुळे बेलाड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेला रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहे.
बेलाड शिवारात हिंसक प्राण्यांचा सुळसुळाट वाढला आहे. मोकाट हरणांच्या कळपामुळे हतबल असणाऱ्या शेतकऱ्यांना वनविभागाकडून कोणताही दिलासा नाही. त्यातच आता हरणासोबतच हिंसक रानडुक्करे सुद्धा या शिवारात मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.
रानडुकरांच्या हिंसक हल्ल्यात बेलाड येथील 40 वर्षीय महिला सुनिता अर्जुन संबारे ही महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सुनिता या शेतात काम करत असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला. सुनिता यांनी आपला जीव वाचवण्यासाठी रानडुक्कराला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला पण यात त्यांना अपयश आलं. रानडुक्कराने केलेल्या भीषण हल्ल्यात सुनिता यांचा हातच शरिरापासून वेगळा झाला.
सुनिता यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सदर घटनेमुळे बेलाड व आजूबाजूच्या परिसरातील व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आधीच शेतीवर दुबार पेरणीचे संकट असताना त्यातच या मोकाट हिंसक प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे व श्रमिकांचे जीवन भितीदायक बनले असून वन विभागाबाबत प्रचंड जन आक्रोश नागरिकांमध्ये दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.